संगमनेर पोलिसांकडून चोर सोडून वाहनांचा शोध! कागदपत्र नसलेले सगळेच संशयित; वाहने ताब्यात घेण्याचा सपाटा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
चोर आणि पोलीस हा विषय प्राचीन आणि सर्वसामान्यांसाठी खूप कुतूहलाचा असतो. अनेकदा कोणताही पुरावा हाती नसतानाही चाणाक्ष अधिकार्‍यांनी गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना गजाआड केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही यापूर्वी अशा कौतुकास्पद घटना समोर आल्या आहेत. मात्र गेल्याकाही दिवसांत गुन्ह्यांचा तपास केवळ कथांमध्येच स्थिरावल्याने त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी आता चोर सोडून संन्याशांनाच फासावर लटकवण्यास सुरुवात केल्याचे अजब चित्र सध्या संगमनेरात बघायला मिळत आहे. अशाप्रकारच्या ‘उलट्या’ कारवायांनी सामान्यांचा संताप होण्यासह पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

संगमनेर तालुक्याच्या सगळ्याच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोटारसायकल आणि सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार नवीन नाहीत. दररोज तालुक्यातून किमान एकतरी दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडतच असते. खरेतर वारंवार घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी आणि संगमनेरात कायद्याचे राज्य भासवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत संगमनेरच्या विविध रस्त्यांवर आणि चौकात लाखो रुपयांचा खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. वास्तविक वाढत्या शहरीकरणात वाहतुकीच्या प्रत्येक रस्त्यावर अशाप्रकारे तिसर्‍या डोळ्यांची नजर असणं क्रमप्राप्तच आहे, अनेक गुन्ह्यांची उकल करण्यातही त्याचा यंत्रणांना खूप फायदा झाल्याचीही शेकडो उदाहरणे सापडतात. मात्र संगमनेर शहर त्याला अपवाद ठरलंय की काय अशी गेल्या तीन-चार वर्षातील स्थिती आहे.

शासनाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीच्या मार्गासह तीनबत्ती चौक, बसस्थानक चौक, अकोले बायपास चौफुली, मोमीनपुरा व 132 के.व्ही. उपकेंद्र इत्यादी ठिकाणी हमरस्त्यावर लक्ष्य ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणच्या कॅमेर्‍यांमधून 24 तास रस्त्यांवर लक्ष्य ठेवले जाते व त्याचे थेट प्रसारण शहर पोलीस ठाण्यात ‘खास’ तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात होते. याठिकाणी कायमस्वरुपी हजर कर्मचार्‍याने नियंत्रण कक्षातून रस्त्यांवरील हालचालींवर लक्ष्य ठेवणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात मात्र तसे अभावानेच घडत असल्याचे वाढत्या दुचाकींच्या चोर्‍यांमधून दिसून येते.

विशेष म्हणजे जवळपास दररोज एकट्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच दुचाकी लांबविण्याच्या एक-दोन घटना घडतच असताना आणि त्यातील बहुतेक घटना कॅमेरे असलेल्या परिसरातूनच समोर येत असतानाही आजवर पोलिसांना या कॅमेर्‍यांचा प्रभावी वापर करता आला नाही. त्यामुळे शहरातून नागरी खद्खद् समोर येत असताना त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी आपले लक्ष्य दुचाकी चोरांवर केंद्रीत करणे सोडून अजब कारवाई सुरु केल्याने नागरी संतापात भर पडली आहे. तपासणी मोहिमेच्या नावाखाली पोलीस रस्त्यारस्त्यावर थांबून दुचाकीस्वारांचीच झाडाझडती घेत आहेत.

संगमनेर व अकोले तालुक्यातील ग्रामीण भागासाठी संगमनेर हे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे कामकाजाच्या निमित्ताने दररोज संगमनेरात मोठ्या संख्येने येणार्‍यांमध्ये शेतकरी, चाकरमाने, कामगार, मजूर व विद्यार्थ्यांचा अधिक भरणा असतो. ग्रामीण भागात कधीतरी दोन-चार वर्षांनी एखाद्या पोलीस अधिकार्‍याला लहर आली की वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी होते, मात्र गेल्या अनेक वर्षात अशाप्रकरची तपासणी झाल्याचे उदाहरण नाही. अशा स्थितीत संगमनेर पोलिसांनी नागरीकांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम सुरु केली आहे.

या मोहिमेत वाहन चालविण्याच्या परवान्यासह वाहनांची कागदपत्रेही तपासली जात आहेत. विनापरवाना वाहन चालविणार्‍या मात्र वाहनाची कागदपत्रे अद्ययावत असलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांना सोडले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे वाहनाची कागदपत्रे नाहीत अशांना मात्र मनःस्ताप देणार्‍या कारवाईचा सामना करावा लागत असून पोलिसांकडून कागदपत्र सोबत नसलेल्या दुचाकीस्वारांची वाहनेच ताब्यात घेतली जात आहेत व कागदपत्रे दाखवून वाहन घेवून जाण्याचा अजब सल्लाही दिला जात आहे. पोलिसांनी अचानक सुरु केलेल्या अशाप्रकारच्या कारवाईने शेतकर्‍यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वचजण त्रस्त झाले आहेत.

वास्तविक पोलिसांना मोटारसायकल चोर सापडत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, पण त्यासाठी सरसकट कामकाजाच्या गडबडीत असलेल्या नागरिकांनाच चोर समजून कागदपत्र नाहीत म्हणून त्यांच्या ताब्यातील वाहने ताब्यात घेण्याचा प्रकारही समर्थनीय होवू शकत नाही. अशा कारवाईमधून अनेकांचा गडबडीत असतानाही वेळेचा अपव्यय होतोय तर अनेकांना नाहक मनःस्तापही सहन करावा लागतोय. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी मात्र त्यातून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे. सध्या पोलिसांकडून सुरु असलेली तपासणी मोहीम चोरीची वाहने शोधण्यासाठी असल्याचा नागरी समज असल्याने हा प्रकार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा असल्याचीही चर्चा आहे.

खरेतर गुन्हेगारी घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमांची आवश्यकता असतेच, मात्र त्यातून थेट वाहने ताब्यात घेण्याचा प्रकार नागरिकांना अडचणीचा वाटत आहे. कागदपत्रांशिवाय असलेली वाहने रस्त्यावर येवूच नये अशी पोलिसांची भूमिका असेल तर त्यासाठी आधी जनजागृती करुन विनाकागदपत्र वाहने चालविल्यास अशाप्रकारची कारवाई होईल याबाबत सामान्यांना पूर्वकल्पना दिल्यानंतरच अशा कठोर कारवाया होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात त्या सर्व गोष्टींना तिलांजली वाहून सरसकट शेतकरी, चाकरमानी, कामगार, मजूर व विद्यार्थ्यांना भररस्त्यातच अडवून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातोय.


मागील काही महिन्यांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सरासरी दररोज एक-दोन दुचाकी वाहनांच्या चोर्‍या होत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत होवून पोलिसांकडून चोरांचा बंदोबस्त होण्याची अपेक्षा बाळगून असताना पोलिसांनी चोर शोधण्याचे काम सोडून चोरीला गेलेली वाहनेच हुडकायला सुरुवात केल्याने सर्वसामान्यांचा रोष खद्खद्त आहे. पोलिसांनी कारवाई जरुर करावी, मात्र कागदपत्रांशिवाय वाहने घेवून शहरात आल्यास अशाप्रकारे वाहने ताब्यात घेतली जावू शकतात याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. थेट कारवाईचा बडगा उगारला गेल्याने अनेकांना महत्त्वाचे काम असतानाही पोलिसांशी हुज्जत घालावी लागत असल्याने असे प्रकार टाळण्यासाठी मध्यम उपाय शोधण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

Visits: 101 Today: 2 Total: 1412667

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *