साईनगरी पुन्हा हादरली; अनोळखी महिलेचा खून पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्यासह आरोपीचा घेताहेत शोध


नायक वृत्तसेवा, शिर्डी
शहरातील पानमळा रस्त्यावरील चिकूच्या बागेत शुक्रवारी (ता.2) एका अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप करत खून केलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर मृत महिलेचे वर्णन अंगात लाल रंगाचा चुडीदार व निळ्या रंगाची लेगीज, पांढर्‍या रंगाची ओढणी, नाकात व कानात धातुची रिंग, पांढरी स्लिपर असे आहे. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, संजय सातव व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या महिलेचा गळा आवळून खून झाला असावा व मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तिच्या चेहर्‍यावर दगड टाकून चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला असावा असा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे.

सदर खून हा रात्रीच्या वेळी झाल्याची चर्चा आहे. सदर महिलेची चेहरापट्टी व पेहराव बघता ही स्थानिक नसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जेथे घटना घडली तेथे ओळख पटेल असा कोणता पुरावा मिळून येतो का? त्या अनुषंगाने देखील प्रयत्न सुरू आहेत. तसेच मृतदेह सापडला त्या रस्त्याजवळ असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. सदर महिलेला शिर्डी शहरात कोणी बघितले का यादृष्टीनेही पोलीस शोध घेत आहे. सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी व शवविच्छेदन करण्यासाठी शवगृहात ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

Visits: 192 Today: 1 Total: 1112445

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *