खासगी वादातून दोन गटांत तुफान धुमश्चक्री! जनतानगरमधील प्रकार; दोन महिलांसह चौघे जखमी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘खासगी’ कारणातून वारंवार होणार्‍या शाब्दिक चकमकीचे रुपांतर शुक्रवारी लाठ्या-काठ्या आणि कोयता घेवून हल्ला करण्यात झाले. तर दाखल प्रकरणातील फिर्यादीच्या सासरकडील मंडळींनी रात्री उशिराने संगमनेरात येवून आधी घरात घुसून मारहाण करणार्‍यांमधील दोघांना घुलेवाडीजवळील म्हसोबा मंदिराजवळ गाठून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणाची अद्याप तक्रार दाखल झालेली नाही, मात्र नाशिकहून आलेल्या टोळक्याने ‘त्या’ दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली आहे, उर्वरीत आरोपी मात्र पसार झाले आहेत. या दोन्ही घटनेत दोन्ही बाजूच्या प्रत्येकी दोघांना दुखापती झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात दुसर्‍या बाजूनेही गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शुक्रवारी (ता.2) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जनतानगरच्या जाणताराजा चौकात घडला. या घटनेत ‘खासगी’ कारणातून वारंवार शाब्दिक भांडणे करणार्‍या वरद लक्ष्मण लोहकरे याने धीरज राजेंद्र पावडे, विक्रम रामनाथ घोडेकर, राज ओड (पूर्ण नाव माहिती नाही.) व अन्य सहाजणांना सोबत घेत फिर्यादी 21 वर्षीय विवाहित महिलेच्या आईच्या घरासमोर तिचा पती व भावाला लाठ्या-काठ्या, कोयता व गजाने मारहाण केली. या घटनेनंतर ‘ती’ विवाहित महिला, तिची बहीण, पती व भावासह शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले असताना वरील आरोपींनी पुन्हा त्यांच्या आईचे घर गाठले. यावेळी त्या आठ ते दहा जणांनी ‘तुमचा मुलगा व मुलगी आमची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले आहेत का?’ असे म्हणत शिवीगाळ करुन घरातील टीव्ही., गॅस, कूलर व शोकेसची तोेडफोड केली. या दोन्ही घटनेत सदर विवाहितेची आई व पती दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी नाशिकरोड येथील सासर असलेल्या 21 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरुन वरील चार जणांसह एकूण दहा जणांवर भारतीय दंडसंहितेचे कलम 452, 324, 323, 504, 506, 427, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

यातील दुसरा प्रकार रात्री उशिराने घुलेवाडी शिवारातील म्हसोबा मंदिराजवळ घडला. यात पहिल्या प्रकरणातील विवाहितेच्या नाशिकरोड येथील सासरकडील मंडळींनी संगमनेरात येवून वरील प्रकरणातील धीरज राजेंद्र पावडे व विक्रम रामनाथ घोडेकर यांना पुणे-नाशिक महामार्गावरील म्हसोबा मंदिराजवळ गाठून नाशिक व संगमनेरच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी अद्याप त्यांचा जवाब नोंदविलेला नसून त्यांच्याकडूनही या प्रकरणात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराने जनतानगरमधील वातावरण काहीकाळ खराब झाले होते.

Visits: 113 Today: 1 Total: 1113205

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *