ऐतिहासिक! संगमनेरच्या व्यापार्यांची कामधेनू अखेर ‘बिनविरोध’! उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या प्रयत्नांचे फलीत; आर्थिक संस्थेतील राजकारण टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरच्या व्यापार क्षेत्राची कामधेनू समजल्या जाणार्या संगमनेर मर्चंट्स सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात अखेर यश आले आहे. बँकेचे संस्थापक स्व.ओंकारनाथजी मालपाणी यांचा आर्थिक संस्थांमधील कामकाज राजकारणविरहित असावे असा नेहमीच आग्रह असतं, त्याचे अनुकरण करतांना उद्योगपती राजेश मालपाणी यांनी जवळपास अडतीस इच्छुकांशी सातत्याने समन्वय साधून त्यातील काहींना पॅनलमध्ये स्थान दिले, तर काहींना भविष्यात संधी देण्याच्या प्रयत्न करु असे सांगत अखेर ही निवडणूक टाळण्यात यश मिळवले आहे. बँकेच्या स्थापनेनंतर गेल्या 58 वर्षांच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याने या निमित्ताने नवा इतिहासही लिहिला गेला आहे. जिल्ह्यात लौकीक असलेल्या मर्चन्ट्स बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याने संस्था व उमेदवारांच्या खर्चासह यंत्रणांचा वापर व मनुष्यबळही वाचले आहे.
आर्थिक सहकार क्षेत्रात गेल्या सहा दशकांपासून दबदबा असलेल्या संगमनेर मर्चंन्ट्स बँकेची निवडणूक जाहीर झाली होती. 17 मे या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत संस्थेच्या सतरा जागांसाठी एकूण 39 उमेदवारांनी 56 अर्ज दाखल केले होते. त्यातील अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात व्यापारी एकता पॅनेलचे उमेदवार राजेंद्र कारभारी वाकचौरे यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची सुरुवातीलाच बिनविरोध निवड झाली होती. तर सर्वसाधारण गटाच्या बारा जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 15 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक लागणारच अशी स्थिती होती.
मात्र निवडणूक टाळण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील असलेल्या उद्योगपती राजेश मालपाणी यांनी अखेरपर्यंत सर्वच्या सर्व उमेदवारांशी वारंवार शिष्टाई केली. त्याला प्रतिसाद देत सर्वसाधारण गटातील प्रवीण सिद्राम दिड्डी व सुनिता मनीष मणियार यांनी आपले अर्ज माघारी घेतले. मात्र जुगलकिशोर जगदीश बाहेती यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिल्याने ऐनवेळी व्यापारी एकता पॅनेलचे प्रमुख, उद्योगपती राजेश मालपाणी यांनीच आपला अर्ज मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला, मात्र त्याला तीव्र विरोध करीत व्यापारी एकता मंडळाचे ज्येष्ठ सदस्य, संस्थेचे माजी चेअरमन श्रीगोपाळ रामनाथ पडताणी यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाहेती यांच्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली.
त्यामुळे सर्वसाधारण गटात राजेश ओंकारनाथ मालपाणी, प्रकाश सुरेश राठी, संतोष मोहनलाल करवा, सम्राट श्यामसुंदर भंडारी, संदीप श्रीनिवास जाजू, प्रकाश विश्वनाथ कलंत्री, मधुसूदन सुभाषचंद्र नावंदर, मुकेश रमणलाल कोठारी, महेश बिहारीलाल डंग, वैभव सुनील दिवेकर, संजय शंकरलाल राठी व जुगलकिशोर जगदीश बाहेती यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्वसाधारण महिला गटातही शेवटपर्यंत दोन जागांसाठी चार अर्ज शिल्लक राहीले होते. मात्र सुनिता मनीष मणियार व सिमा संजय अंत्रे यांनी मालपाणी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले अर्ज मागे घेतल्याने या गटात किर्ती राजेश करवा व उषा किशोरकुमार नावंदर या दोन महिला प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली.
नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी व्यापारी एकता पॅनेलच्या रविंद्र रत्नाकर पवार यांच्यासह ज्ञानेश्वर बाबुराव करपे, अजित रंगनाथ ताजणे व अरुण माधवराव शहरकर अशा चार उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते. मात्र व्यापारी एकता मंडळाने सुरुवातीपासून राजकारण विरहित संस्था रहावी यासाठी आपल्या गटातील अनेक दिग्गजांच्या इच्छेला मुरड घालण्यात यश मिळवल्याने या गटातील तिघांनीही मनाचा मोठेपणा दाखवत आपले अर्ज माघारी घेतले. भटक्या विमुक्त जाती/विशेष मागास प्रवर्गातही व्यापारी एकता मंडळाच्या श्याम विजय भडांगे यांच्यासह गुरुनाथ भिकन बाप्ते, संदीप दत्तात्रय चोथवे, सदानंद अशोक सिसोदे, प्रवीण सिंद्राम दिड्डी व सोमनाथ सदाशिव कानकाटे यांनी अखेरच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेत यंदाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना बळ दिले.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील तिघांसह एकूण 12 उमेदवारांनी माघार घेतल्याने एका बिनविरोधसह प्रत्यक्ष सोळा जणांचे अर्ज शिल्लक राहीले. त्यामुळे संगमनेरच्या व्यापार्यांची कामधेनू असलेल्या संगमनेर मर्चंट्स बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास 22 उमेदवारांनी माघार घेवून ही निवडणूक बिनविरोध केल्याने राज्यातील सहकारी संस्थांसमोर नवा आदर्श निर्माण झाला आहे.
1965 साली दिवंगत उद्योगपती ओंकारनाथजी मालपाणी यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहीलेल्या संगमनेर मर्चन्ट्स बँकेने गेल्या 58 वर्षात बारा निवडणूका पाहिल्या आहेत. यावर्षी मात्र उद्योगपती राजेश मालपाणी यांनी ‘आर्थिक संस्थांमध्ये राजकारण विरहित कामकाज’ या बँकेच्या संस्थापकांच्या मूलमंत्रावर काम करतांना सर्व इच्छुक उमेदवारांशी योग्य संवाद आणि समन्वय साधल्याने यंदा बँकेने इतिहास रचला असून सहा दशकांत पहिल्यांदाच संस्थेच्या सर्वच्या सर्व संचालकांची निवड बिनविरोध झाली आहे.