‘रासेयो’ स्वयंसेवकांनी केली प्रत्यक्ष भात लागवड संगमनेर महाविद्यालयाने राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम
नायक वृत्तसेवा, अकोले
‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजाबद्दल आदर निर्माण व्हावा, विद्यार्थी जीवनात शेतीविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच श्रमप्रतिष्ठामध्ये वाढ व्हावी म्हणून प्रत्यक्ष भात लागवड करण्यासाठी संगमनेर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक थेट सावरकुटे (ता.अकोले) येथील विवेक धिंदळे यांच्या भात खाचरात उतरले.
विद्यार्थ्यांनी पुस्तकातून भात लागवड अभ्यासली होतीच. मात्र प्रात्यक्षिकातून भात लागवडीचा हा धडा मिळाल्यानं त्यांच्या चेहर्यावर एक आत्मिक समाधान होतं. सध्या सगळीकडेच पुस्तकी ज्ञान दिलं जातं, त्यामुळे मुलांना बाहेरच्या जगाची माहिती फार कमी प्रमाणात दिली जाते. त्यात शेती किंवा पर्यावरणासारखे विषय हे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊनच शिकले तर उत्तम कळतात. त्यामुळे हे सर्व स्वयंसेवक निसर्गाच्या कुशीत भात शेतीत उतरले. रोजच्या जेवणात येणारा भात नेमका कसा पिकतो अन त्यासाठी भात शेतकर्यांना किती काबाडकष्ट घ्यावे लागतात हा धडा प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत खरात, डॉ. अशोक तांबे, डॉ. रोशन भगत व डॉ. सुजाता डेंगळे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.
विद्यार्थ्यांना अनेकदा अनेक गोष्टी पुस्तकात शिकून कळत नाही. ज्या गोष्टी पुस्तकातून शिकता येतात त्या शिकवाव्यात मात्र ज्या गोष्टी प्रात्यक्षिक करुनच शिकवायला हव्या त्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना बंद खोल्यांच्या बाहेर काढणं गरजेचं असतं. या बंद खोल्यांच्या बाहेरच्या शाळेत मुलांना वेगवेगळे धडे दिले पाहिजेत. याच हेतूने प्रेरीत होऊन संगमनेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविला. यातून विद्यार्थ्यांनी भातशेती लावणीचा आनंद घेतला.