शिवसेनेच्या आंदोलनाचा वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना धसका! एकामागून एक आक्रमणाने कंपनी हादरली; आंदोलनापूर्वीच मागण्या मान्य करीत घेतली माघार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुढील आठवड्यात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर दांडुके मोर्चा काढणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट) देण्यात आले होते. मात्र तत्पूर्वीच वीज कंपनीने या आंदोलनाचा धसका घेवून सेनेच्या सर्व मागण्या मान्य करीत असल्याचे पत्र शिवसेनेला सोपविले. संगमनेरकरांच्या मनात वीज कंपनीबाबत खदखदणार्‍या रोषाला दैनिक नायकने शब्दरुपी वाट करुन दिली होती. त्यातून निर्माण झालेल्या संतापाच्या दाबातून सावरत असतांनाच व्यापारी असोसिएशनचे निवेदनास्त्र आणि आता शिवसेनेचा हातात ‘दांडू’ घेवून ‘हल्लाबोल’ करण्याचा इरादा यामुळे आजवर ग्राहकांना नागवणार्‍या वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना आपल्या कर्तव्याची उपरती झाली. मनमानी यंत्रणेविरोधात संगमनेरकर कधीही सहनशील राहीलेला नाही याचा प्रत्ययही गेल्या पंधरा दिवसांपासून धगधगणार्‍या या रोषातून प्रकट झाला. यातून बोध घेवून वीज कंपनीच्या अधिकार्‍यांनी कामात सुधारणा केली तर खरं, नाहीतर त्यांना या रोषाचा सामना करावाच लागेल.

संगमनेरची वीज वितरण कंपनी सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍यांनी आपल्याला मिळालेल्या पगारी जबाबदारीला ‘वतन’ समजून ओरबाडायला सुरुवात केल्याने वीज कंपनीत अनागोंदी माजली. त्यातही संगमनेर शहर उपविभाग आणि त्यात काम करणार्‍या एका दुय्यम कार्यकारी अधिकार्‍यासह त्याच्या हाताखालील आठ शिलेदारांचे आणि ठेकेदारीतल्या ‘सागर’चे आर्थिक किस्से आणि त्यासाठी नागवणारी नियोजनबद्ध यंत्रणाही समोर आली. प्रत्येक अधिकार्‍याने आपापली मनमानी करीत सगळा कारभारच दलालांच्या माध्यमातून हाकायला सुरुवात केल्याने ग्राहकांच्या जिव्हाळ्याच्या सेवाकेंद्रातच ‘मस्ती’ माजली होती. त्यामुळे कोणतीही समस्या घेवून पावण शमीगणपतीच्या प्रांगणात विस्तारलेल्या या छळछावणीतून बाहेर पडणारा सामान्य ग्राहक यांच्याप्रती रोष ओकीतच बाहेर पडायचा.

संगमनेरातील व्यापारी श्रीगोपाळ पडताणी यांच्या लग्नघराची वीज परस्पर कापण्याच्या विषयावरुन दैनिक नायकने जनहिताची बांधिलकी लक्षात घेवून नागरी मनात खदखदणार्‍या रोषाच्या विस्तवाला शब्दरुपी इंधनाची रसद पोहोचवली, त्यातून त्याचा भडाग्नी होवून संगमनेरात वीज कंपनीविरोधात जनआंदोलन आंदोलन उभे राहू लागले. संगमनेर व्यापारी असोसिएशनने विभागीय कार्यालयात जावून कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांची भेट घेतली. त्यावर उपकार्यकारी अधिकार्‍यांनी लेखी पत्रान्वये दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतरही वीज कंपनीतील मनमानी अधुनमधून उफाळतच असल्याने शिवसेनेने ‘दांडूका’ हाती घेवून ‘हल्लाबोल’ करण्याचा इशारा दिला. त्याचा मात्र कंपनीने धसकाच घेतला.

वीज ग्राहकांच्या विविध मागण्यांची त्वरीत पूर्तता करावी या मागणीसाठी शहर शिवसेनेच्यावतीने 22 डिसेंबर रोजी आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यासाठी शहर पोलीस ठाण्यात परवानगीचा अर्जही देण्यात आला होता. त्यांच्याकडून वीज कंपनीला आंदोलनाची सूचना मिळाल्यानंतर कंपनीच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. त्यांनी आंदोलनाच्या आठवड्यापूर्वीच सोमवारी (ता.12) शिवसेनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले व एकाच बैठकीत शिवसेनेने उपस्थित केलेल्या सगळ्या मागण्या मान्य करुन टाकल्या. मात्र हा सगळा प्रकार ‘बोलाचा भात, अन् बोलाच्या कढीं’सारखा ठरु नये म्हणून शहरप्रमुख अमर कतारी यांनी लेखी पत्राची मागणी केली होती.

काल बुधवारी (ता.14) संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना याबाबतचे पत्र दिले असून त्यात पर्यायच नसेल फक्त अशाच ग्राहकांचे वीज बिल मागील वर्षभराच्या सरीसरीने काढले जाईल, प्रत्येक मीटरचे अचुकतेने वाचन व्हावे यासाठी उंचावरील किंवा घरातील मीटर दर्शनी भागात लावण्याच्या मागणीवर तत्काळ कारवाई सुरु होईल, वीज बिलाबाबतच्या तक्रार दाखल असेल व तशी पावती असणार्‍या ग्राहकाची दुरुस्तीपर्यंत वीज कापली जाणार नाही, वीज कंपनीतील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा लोकसेवक आहे. त्यामुळे त्यांनी लोकांशी सौजन्याने वागण्याचा मुद्दाही मान्य करण्यात आला आहे, ग्राहकांच्या तक्रारींचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना आणि कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाईल,

उपविभागातील अनेकांचे मीटर नादुरुस्त असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र वारंवार मागण्या करुनही त्यांना मीटर मिळत नाहीत. या मागणीवर उपलब्धतेनुसार मीटर बदलण्याचे काम सुरु असल्याचे उत्तर देण्यात आले असून नवीन कनेक्शन व मीटरच्या संबंधी तक्रारींना प्राधान्य देण्याचे वचनही या पत्राद्वारे संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. आता त्यांचे हे पत्र केवळ परिस्थिती टाळणारे की खरोखरी कर्तव्याला जागणारे आहे हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. भ्रष्टाचार आणि अनागोंदी हे विषय घेवून वृत्तमालेतून सुरु झालेली वीज मंडळाची चर्चा शिवसेनेच्या दांडुका मोर्चाच्या इशार्‍याने अखेर कर्तव्याच्या जाणीवेपर्यंत पोहोचवली आहे.

संगमनेर उपविभागाचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांनी शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे पत्र सोपविले त्यावेळी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष मुजिब शेख, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, उपशहर प्रमुख दीपक वनम, इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शीतल हासे, संगीता गायकवाड, आशा केदारी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शहरप्रमुख अमोल डूकरे, अक्षय बिल्लाडे, अक्षय गाडे, राजू सातपुते, सचिन साळवे, सुनील रुपवते, प्रशांत खजुरे, एस.पी.रहाणे, गोविंद नागरे, सदाशिव हासे, हर्ष कतारी, फैजल सय्यद, दानिश पारवे, संभव लोढा, त्रिलोक कतारी, फिरोज कतारी, भगवान पोपळघट, माधव फुलमाळी आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी लेखीपत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. मात्र ग्राहकांच्या संबंधी तक्रारींबाबत यापुढेही शिवसेना सतत या विषयाकडे लक्ष देणार आहे. वीजबिलांच्या तक्रारी हा मोठ्या मनस्तापाचा विषय आहे, त्यासंबंधी कंपनीला शिस्त लागावी यासाठी आम्ही पुढील आठवड्यात वीज कंपनीसमोर मांडव घालून तक्रार निवारण केंद्रही चालविणार आहोत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभियंत्यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे बदल झाले नाहीत तर शिवसेना कोणत्याही क्षणी विनासूचना दांडुका घेवून हल्लाबोल करेल.
– अमर कतारी
शिवसेना शहरप्रमुख, संगमनेर

एकीकडे कार्यकारी अभियंता झुकल्याचे दिसत असले तरीही दुसरीकडे दैनिक नायकच्या वृत्तमालेने ‘डिप्रेशन’मध्ये गेलेला वीज मंडळातील ‘कसाब’ मात्र आता पुन्हा सक्रिय होवून मोकाट सुटल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या वृत्तमालेनंतर झालेल्या चौकशीचा अहवाल अद्यापही मुख्यालयात ‘सीलबंद’ आहे. सदरची चौकशीही खुद्द कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः न करता एका दुय्यम अधिकाऱ्याकडून करवून घेतली. तो अधिकारी तर ‘कसाब’चा पक्का ‘साथीदार’ अशी दबकी चर्चा आता वीज मंडळाच्या वर्तुळात सुरु झाली आहे. मुख्यालयात गेलेले कागदी गुंडाळ्यांचे पाकिटं उघडून वास्तव समोर येताच ‘कसाब आणि कंपनीचा’ पर्दाफाशही होईल.

Visits: 22 Today: 1 Total: 117544

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *