बडेजाव खुंटीला ठेवून प्रत्येक कामाला कर्तव्य मानणारा अधिकारी! संगमनेर पोलीस उपअधीक्षकांच्या चपळाईने उपविभागीय पोलीस दलात चैतन्य..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षभरापासून कोविड आणि त्यापासून नागरिकांचे बचाव करण्यासाठीची बंधने यात गुरफटलेल्या संपूर्ण यंत्रणेत पोलीस दलाची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांकडून सक्तीने नियमांचे पालन करण्यासह आपल्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकामी गेल्या वर्षभरापासून पोलिसांना अतिरीक्त काम करावे लागत आहे. या प्रक्रियेत वरीष्ठ अधिकार्‍यांपेक्षा कर्मचार्‍यांचे अधिक हाल होत असल्याच्या चर्चा देशभरातून कानावर येत असतांना संगमनेर उपविभाग मात्र त्याला अपवाद ठरला आहे. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी येथील नियुक्तीपासूनच आपल्या कार्यक्षमतेची छाप उपविभागावर टाकली असून आजच्या स्थितीत शहर पोलीस निरीक्षकांच्या गैरहजेरीतही ते अधिकाराचा बडेजाव खुंटीला ठेवून ‘कर्तव्य सर्वोपरी’ या भावनेतून दुहेरी भूमिका बजावित आहेत. त्यामुळे कोविड.. कोविड.. आणि कोविडने वैतागलेल्या पोलीस कर्मचार्‍यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी श्रीरामपूरहून संगमनेर उपविभागात बदलून आलेले उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने क्रीडा क्षेत्रातून पोलीस दलात पोहोचलेले अधिकारी आहेत. मैदानात गोळाफेक करुन भल्याभल्यांना पराजयाची धूळ माखीत राष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्त्व करणार्‍या मदने यांना क्रीडा क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीच्या बळावर विक्रीकर निरीक्षकाची जागा चालून आली. मात्र त्यांना पंखा, एसी असलेल्या वातानूकुलीत दालनात बसण्यापेक्षा प्रत्यक्ष माणसांमध्ये, त्यांची संकटं कमी करण्यासाठी काम करण्याची लहानपणापासून मनोमन इच्छा असल्याने त्यांनी चालून आलेली संधी सोडून स्वतःसाठी स्वतःच्या जीवावर पोलीस उपअधीक्षकांची कवाडे उघडली. पोलीस दलाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची दुसरीच पोस्टिंग अहमदनगर जिल्ह्यात झाली. श्रीरामपूरातातील काही कटू-गोड अनुभवानंतर ते संगमनेरात रुजू झाले.

संपूर्ण देशासह अहमदनगर जिल्हा गेल्या 14 महिन्यांपासून कोविड नावाच्या अदृष्य शत्रूशी चारहात करीत आहे. या लढाईत आरोग्य, पालिका, महसूल, पंचायत समिती अशा कितीतरी विभागांचे योद्धे लढत आहेत, लढता लढता जायबंदी होवून रुग्णालयातही दाखल होत आहेत आणि पुन्हा लढायला सज्जही होत आहेत. या कालावधीत काहींना पराभव पत्करुन या जगाचा निरोप घेण्याच्या दुर्दैवी घटनाही समोर आल्या आहेत, याला संगमनेर उपविभागही अपवाद राहिला नाही. मात्र गेल्या दीर्घकाळापासून सुरु असलेल्या या लढाईत एकाच बाजूचे नुकसान आणि तेच तेच सावरण्याचे काम करुन यंत्रणेतील घटकांमध्ये काहीशी मरगळ आल्याचेही चित्र दिसत आहे. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सध्या तातडीच्या रजेवर असल्याने उपविभागात पाच-पाच पोलीस निरीक्षक असतांनाही वरीष्ठतेचा बडेजाव बाजूला सारुन उपअधीक्षक मदने यांनी परिस्थितीनुरुप लढाईचे नेतृत्त्व स्वतःच्या खांद्यावर घेतले आहे. आता वरीष्ठ अधिकारीच शड्डू ठोकून कर्मचार्‍यांसोबत मैदानात उतरले म्हंटल्यावर पोलीस कर्मचार्‍यांच्या मनातील मरगळ हटून त्याजागी चैतन्याचा संचार सुरु झाला आहे.

उपअधीक्षक मदने गेल्या आठ दिवसांपासून 24 तासांतले 16 ते 18 तास कर्तव्य बजावत आहेत. या दरम्यान संगमनेर शहरा व्यतिरीक्त संगमनेर तालुका, आश्वी व घारगाव आणि अकोले व राजूर पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व व्यवस्थेवरही त्यांना नजर ठेवावी लागत आहे. मात्र आत्तापर्यंत त्यातही ते लिलया यशस्वी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यातील कोविड संक्रमण भरात आहे. त्यातच या सर्वच पोलीस ठाण्यातील काही अधिकारी, काही कर्मचारी आजही कोविड बाधित होवून उपचार घेत आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या पोलिसांवरील कामाचा ताणही वाढला आहे, त्यातून नैराश्याचा जन्म होत असल्याने उपअधीक्षक मदने यांनी कर्मचार्‍यांचा उत्साह दुणावण्यासाठी आपली भूमिकाच बदलली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या अनुपस्थितीत शहरातील फिक्स पॉईंटचा बंदोबस्त असो, अथवा रात्रीची गस्त. या दरम्यान घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा तपास असो, अथवा कोविडबाबत नियमांची सक्ति प्रत्येक ठिकाणी ते स्वतः हजर रहात आहेत. सोमवारी स्थानिक प्रशासनाने विनाकारण भटकणार्‍यांची ‘एंटीजेन’ चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अशा काही भटक्यांना चाचणी केंद्रावरही आणले गेले, मात्र त्यांच्यात चाचणीविषयी भीती असल्याने ती घालवण्यासाठी चक्क उपअधीक्षक मदने यांनी आपलीच चाचणी करुन नागरिकांच्या मनातील भीती घालवण्याचा अभिनव प्रयोग केला आणि त्यानंतर मात्र दिवसभरात शंभर आणि आज दिडशे जणांच्या चाचण्या सुरळीत पारही पडल्या.

गेल्या आठ दिवसांत त्यांनी तीनबत्ती प्रकरणातील 14 आरोपींना अटक करुन पोलिसांवरील हल्ला खपवून घेणार नसल्याचा संदेश देत कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावले आहे. यादरम्यान अकोल्यातील जनता कर्फ्यू असो, अथवा राजूरमधील धान्य घोटाळा, तेथेही त्यांनी अजिबात दुर्लक्ष होवू दिले नाही. आज (ता.18) सकाळी तर संगमनेर शहरातील विविध भागातील भटक्यांचा शोध घेवून त्यांची अँटीजेन चाचणी करण्यासाठी त्यांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि चक्क आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांसह त्यांनी गावात गस्त घालीत अशा दीडशे भटक्यांचा शोधही घेतला आणि त्यांच्या चाचण्याही करुन घेतल्या. त्यांच्यातील कामाची स्फूर्ती आणि कर्तव्याप्रति त्यांचा प्रचंड उत्साह पाहून संगमनेर उपविभागातील पोलीस दलातील मरगळ आपोआप झटकली गेली असून कर्मचार्‍यांमध्ये चैतन्याचा झरा प्रवाहित झाला आहे.


जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये सोमवारपासून (ता.17) जिल्ह्यातील प्रादुर्भाव अधिक असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी निर्बंध झुगारुन भटकंती करणार्‍यांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या सुरु करण्यात आल्या. त्यानुसार संगमनेरातही सकाळच्या सत्रात जवळपास चाळीस जणांना बस्थानकावर थांबवण्यात आले होते. मात्र अनेकांमध्ये चाचणीबाबत भीतीचे वातावरण असल्याने कोणी आधी पुढे जावे यावरुन भटक्यांची चलबिचल पाहून पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी तेथेही पुढाकार घेवून सर्वप्रथम स्वतःची चाचणी करुन घेतली. ते पाहून वाहनचालकांच्या मनातील भीती गेल्याने त्यांनतर दिवसभरात कोठेही अडथळा निर्माण झाला नाही. त्यांच्या या समर्पित वृत्तीतून कर्तव्यासाठी काहीपण करण्याची तयारी असलेला अधिकारी अशी नवी ओळखही त्यांनी निर्माण केली आहे.

Visits: 39 Today: 1 Total: 436019

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *