खुनाचा संशय असलेल्या तरुणाला बेलवंडी पोलिसांकडून क्लिनचीट! उपनिरीक्षक चाटेंचा चाणाक्ष तपास; संगमनेरातील सीसीटीव्ही फूटेजवरुन गुन्ह्याची उकल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अनेक प्रकरणात पोलीस संशयावरुन काहींना ताब्यात घेतात आणि चौकशीअंती सोडूनही देतात. काही प्रकरणात केवळ संशय म्हणून ताब्यात घेतलेली व्यक्तिच आरोपी आहे असाही समज होवून त्याला सोडल्यानंतर पोलिसांकडे संशयाने पाहिले जाते. चालू महिन्याच्या सुरुवातीला कोंची घाटात सापडलेल्या मृतदेहाबाबतही असेच घडले होते. श्रीगोंदा तालुक्यातील रहिवाशी असलेला तरुण आपल्या मित्रासोबत गुजरातला गेला, मात्र माघारी येताना त्याचा मित्र तर आला पण ‘तो’ तरुण काही आला नाही. मित्राने सांगितलेल्या घटनाक्रमावरुन बेलवंडी पोलिसांनी ‘मिसिंग’ दाखल करुन तपास सुरु केला. त्याच दरम्यान कोंची घाटात सापडलेला मृतदेह श्रीगोंदे तालुक्यातील राजापूरच्या सचिन जगतापचा असल्याचे समोर आले. त्यामुळे मयत तरुणाच्या मित्रावरील संशय बळावला, मात्र पोलीस उपनिरीक्षक राजेश चाटे यांनी केलेल्या चाणाक्ष तपासातून या प्रकरणाची उकल झाली आणि संशय म्हणून ताब्यात घेतलेल्या तरुणाची सुटका झाली.
याबाबत गेल्या ४ डिसेंबर रोजी मयताचा छोटा भाऊ नितीन मनोहर जगताप याने बेलवंडी पोलीस ठाण्यात हरविल्याची खबर दिली होती. त्याचा तपास करताना बेलवंडीचे पोलीस उपनिरीक्षक राजेश चाटे यांनी या प्रकरणाची उकल करताना खुनाचा संशय व्यक्त झालेल्या आरोपी संतोष गुलाब मोरे याच्यासह मयताच्या नातेवाईकांना सोबत घेत त्यांना या प्रकरणामागील सत्य दाखवले. त्यानंतर त्यांची खात्री पटल्यानंतर संशयावरुन चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या संतोष मोरेला सोडून देण्यात आले. या प्रकरणाकडे ओझरत्या नजरेने पाहिले असता मयताच्या मृत्यूला सदरील संशयितच जबाबदार असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र प्रत्यक्षात वास्तव वेगळेच होते. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केला नसता तर कदाचित खुनाचा गुन्हा दाखल होवून ताब्यात घेतलेल्या संशयिताला अटक आणि त्यानंतरच्या अडचणींचा सामना करावा लागला असता.
या प्रकरणाची सुरुवात गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ३० नोव्हेंबर रोजी झाली. श्रीगोंदा तालुक्यातील राजापूरचा रहिवासी असलेला संतोष गुलाब मोरे हा वाहनचालक मालट्रक घेवून गुजरातला जाण्यास निघाला होता. यावेळी त्याने गावातील आपला मित्र सचिन मनोहर जगताप (वय ३५) यालाही सोबत घेतले. त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते दोघेही उक्कडगाव येथे असताना मोटारसायकलवरुन बेलवंडीला निघालेल्या नितीन जगतापची आपल्या भावाशी गाठ पडली. यावेळी त्याने आपण मित्रासोबतच गुजरातला जात असल्याचे आपल्या लहान भावाला सांगितले.
त्यानंतर चौथ्या दिवशी ३ डिसेंबररोजी संतोष मोरे आपल्या राजापूर येथील घरी परतला, मात्र त्याच्यासोबत गेलेला सचिन जगतापचा थांगपत्ता नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी मोरेकडे चौकशी केली असता तो आपल्यासोबत गुजरातला आलाच नसल्याचे धक्कादायक उत्तर त्याने दिले. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांचा मोरेवरील संशय वाढला, मात्र अशाप्रकरणात हरवलेल्या व्यक्तीचा नेमका ठावठिकाणा समोर आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नाही. त्यामुळे बेलवंडी पोलिसांनी हरविल्याची नोंद करीत तपास सुरु केला असता संशयित मोरे याने दिलेल्या माहितीत तथ्य असल्याचे समोर आले. मात्र मयताचे नातेवाईक आपल्या भूमिकेवर ‘ठाम’ असल्याने त्यांच्या मनातील शंका दूर न करता संशयिताला सोडल्यास वेगळाच समज होईल असे ताडून पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली.
बुधवारी (ता.२७) बेलवंडीचे पोलीस निरीक्षक ठेंगे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश चाटे व हवालदार झुंजार यांनी मयत सचिन जगताप याच्या भावासह त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सोबत घेतले. यावेळी संशयित संतोष मोरेही सोबत होता. पोलिसांनी मोरे सांगत असलेला संपूर्ण घटनाक्रम जुळवला. ३० नोव्हेंबर रोजी दोघेही संगमनेरात आल्यानंतर मनसोक्त दारु प्यायले. दुसर्या दिवशी सकाळी पुन्हा उतारही झाला. त्यानंतर सचिन जगतापने संगमनेरातच घरी जाण्याचा हट्ट धरल्याने गुलाब मोरे याने त्याला संगमनेर बसस्थानकात जावून स्वतः त्याला ‘संगमनेर-नगर’ बसमध्ये बसवले. त्यानंतर तो अकोले नाक्यावरील पेट्रेालपंपावर आला व तेथून आपला मालट्रक घेवून एकटाच गुजरातच्या दिशेने गेल्याचे सिद्ध झाले.
हा सर्व प्रकार डोळ्यांनी पाहिल्यानंतर मयताच्या नोतवाईकांच्या मनातील संशयाचे मळभ हटले आणि खुनाचा संशय ठेवून ताब्यात घेतलेल्या संतोष मोरे या वाहनचालकाला बेलवंडी पोलिसांनी क्लिनचीट देत त्याला सोडून दिले. कोंची परिसरात काही हॉटेल्स आहेत, तेथे राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही थांबतात. मयत सचिन जगताप जेवणासाठी बस थांबल्यानंतर खाली उतरला आणि काही कारणास्तव रस्त्यावरुन जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याला मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे तथ्यही या तपासातून स्पष्ट झाले. सदर प्रकरणी गेल्या १ डिसेंबर रोजीच संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, त्याचे रुपांतर आता अपघाताच्या गुन्ह्यामध्ये केले जाईल.
केवळ आसपासची परिस्थिती संशय निर्माण करते किंवा त्याच्यावर आरोप केला जातो म्हणून एखाद्याला थेट अटक करुन त्यालाच आरोपी समजण्याचे प्रकार यापूर्वीही जिल्ह्यात घडलेले आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पाटील घारगावचे (ता.संगमनेर) निरीक्षक असताना एका प्रकरणात त्यांनी काही निष्पाप तरुणांना अनेक दिवस तुरुंगात सडवले होते. मात्र बेलवंडीचे पोलीस उपनिरीक्षक राजेश चाटे यांनी या प्रकरणाचा मूळापर्यंत छडा लावताना ‘सत्य’ समोर आणण्यासोबतच मयताच्या नातेवाईकांच्या मनातील संशयाचे ढगही हटवले आहे.