कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन मुले जखमी पालिकेने मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची होतेय मागणी


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरामध्ये मोकाट श्वानांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. हे श्वान लहान बालकांसह नागरिकांना देखील लक्ष्य करत आहेत. गुरुवारी (ता.16) सकाळी आयशा वसाहतीमध्ये घराजवळ बसलेल्या एका तीनवर्षीय बालकावर श्वानाने हल्ला करत गालाचा लचका तोडला. तर याच भागातील सहावर्षीय मुलाच्या मानेवर चावा घेतल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे. यानंतर हनुमानगर भागातील एका चारवर्षीय मुलाच्या गालाचेही लचके तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, पालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

मोकाट श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयशा वसाहतीमध्ये जखमी झालेल्या बालकाचे जावेद अत्तार आणि याच भागातील हल्ला झालेल्या दुसर्‍या मुलाचे इम्रान तांबोळी अशी नावे आहेत. तर हनुमाननगर भागातील मोसीन शेख यांच्या मुलाचे नाव समजू शकले नाही. सध्या या तिन्ही जखमी बालकांवर उपचार सुरू आहे.

या घटनेची माहिती मिळताच भाजप नेते पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी, माजी नगरसेवक महेमूद सय्यद, जितेंद्र रणशूर, अल्ताफ कुरेशी, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष इम्तियाज अत्तार, खलील कुरेशी, फकीर महम्मद आदिंनी रुग्णालयात जाऊन जखमी बालकांची भेट घेतली. त्यानंतर संतप्त नागरिकांसह भाजप पदाधिकार्‍यांनी पालिका कार्यालय गाठत अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. तत्काळ मोकाट श्वानांचा बंदोबस्त करा, नागरिकांना सुविधा देता येत नसतील तर वसुली पथकाची गाडी फिरु देणार नाही, असा इशारा दिला.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू केली की, प्राणीमित्र त्यास विरोध करतात. त्यामुळे जनावरांना सोडून द्यावे लागत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर पराग संधान म्हणाले, नागरिकांच्या हिताचा विचार न करता जो कोणी प्राणीमित्र आडवा येत असेल तर आम्ही सर्वपक्षीय कोपरगावकर प्रशासनाच्या बाजूने उभे राहू. भटक्या जनावरांच्या हल्ल्यात जखमी होवून हजारो रुपये रुग्णालयात भरावे लागत असल्याने पालिकेने तत्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. याकामी राजकीय पक्ष प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील असे सांगितले.

Visits: 16 Today: 1 Total: 115109

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *