योगासनांचा संघ महाराष्ट्राला मोठे यश मिळवून देईल ः बिले ध्रुव ग्लोबलमधील प्रशिक्षण शिबिराचा समारोप; राज्याचा योगासन संघ गुजरातला रवाना


नायक वृत्तसेवा, संगमनेर
खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या योगासन संघाचे प्रशिक्षण शिबिर संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये पार पडले आणि त्याचा परिणाम राज्याच्या संघाने घवघवीत यश मिळवण्यात झाले. यावेळीही गुजरातमध्ये सुरु असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी होणार्‍या राज्याच्या वरीष्ठ संघातील बारा खेळाडूंना याच ठिकाणी दहा दिवस प्रशिक्षण दिले गेले. त्यामुळे हा संघ आपल्या कौशल्याच्या जोरावर नक्कीच महाराष्ट्राला मोठे यश मिळवून देईल असा विश्वास जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी व्यक्त केला.

गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील बारा योगासन खेळाडूंची निवड झाली. त्या सर्वांना संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये स्पर्धा पूर्व प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराचा समारोप आणि त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिले बोलत होत्या. महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनचे सचिव डॉ. संजय मालपाणी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी सुधीर चपळगावकर, विशाल गर्जे, ध्रुव ग्लोबलच्या प्राचार्या अर्चना घोरपडे व नीलेश पठाडे आदी मंचावर उपस्थित होते.

ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतलेले स्पर्धक हमखास यशस्वी होतात याचा प्रत्यय मागील स्पर्धांमध्ये आल्याचे सांगताना बिले यांनी योगासन प्रशिक्षकांचे विशेष कौतुकही केले. खेळाडूला नकोसं वाटावं इतकी मेहनत त्यांच्याकडून करवून घेतल्याशिवाय यश मिळणार नाही याची कल्पना असल्याने या सर्व प्रशिक्षकांनी जीवतोड परिश्रम घेवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी या सर्वांची तयारी करवून घेतली आहे. त्यामुळे हा संघ गुजरातला पोहोचल्यानंतर महाराष्ट्रावर पदकांचा वर्षाव होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.

डॉ. मालपाणी यांनी आपल्या प्रास्तविकात गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनच्या माध्यमातून देशभरात झालेल्या कामाचा आढावा घेतला. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनने उदीत सेठ व डॉ. जयदीप आर्य यांच्या नेतृत्त्वाखाली योगासनांच्या क्षेत्रातील विविध संघटनांना एका छत्रात आणण्याचे काम केले. त्या माध्यमातून राज्यात विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करुन महाराष्ट्रातील प्रतिभावंत खेळाडू शोधून काढले व अशा प्रकारच्या प्रशिक्षण शिबिरांमधून त्यांना प्रशिक्षण दिले गेल्याने अवघ्या तीन वर्षातच त्यांनी महाराष्ट्राला विविध पारितोषिके मिळवून दिली आहेत.

खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक सुवर्ण व रौप्यपदकांसह जनरल चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला होता. तर, पंचकुला येथे झालेल्या यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दहातील सहा सुवर्ण, चार रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई करीत राज्याला मोठे यश मिळवून दिल्याचे सांगत डॉ. मालपाणी यांनी गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय खेळांच्या स्पर्धेतही पदतालिकेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी या खेळाडूंनी सादर केलेल्या योगासनांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थित अवाक् झाले होते. ध्रुव ग्लोबलमध्ये झालेल्या प्रशिक्षण शिबिरातील अनुभवही या खेळाडूंनी मांडले. येथील वातावरण, समर्पित वृत्तीने प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक व अन्य सुविधा यामुळे दहा दिवसांचा कालावधी कसा गेला हे समजले नसल्याचेही या खेळाडूंनी सांगितले. आज दुपारी हे सर्व खेळाडू महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून गुजरातकडे रवाना होणार असून तत्पूर्वी या सर्वांना बिले व डॉ. संजय मालपाणी यांनी त्यांच्यासह त्यांना प्रशिक्षण देणार्‍या मंगेश खोपकर, संदेश खरे, सुहास पवळे, श्वेता पाटील व प्राजक्ता खवले या प्रशिक्षकांना पुष्पगुच्छ देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Visits: 4 Today: 1 Total: 29410

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *