आमदार सत्यजीत तांबेंचं ‘मिशन कमळ’ की केवळ सदिच्छा? पालिका विजयाचा गुलाल मुंबईत उधळला; नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, तर तांबेंची तावडेंशी बंद खोलीत चर्चा..!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘गुढ’ बनून राहिलेले नाशिक पदवीधरचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांचे राजकीय विमान नेमके कोणत्या धावपट्टीवर उतरणार, याबाबतच्या चर्चांनी आता टोक गाठले आहे. संगमनेर पालिकेत महायुतीचा धुव्वा उडवून सत्ता राखल्यानंतर तांबे यांनी नूतन नगरसेवकांना घडवलेली ‘मुंबापुरीची सफर’ केवळ अभ्यासापुरती मर्यादित नव्हती, तर त्यामागे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी जवळीक साधण्याचे मोठे ‘पॉलिटिकल टायमिंग’ असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे. विशेषतः नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांच्या कॅमेर्यासमोर उभे करुन स्वतः मात्र भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याशी ‘बंद दाराआड’ खलबते केल्याची चर्चा समोर आल्याने आमदार तांबे यांच्या भविष्यातील राजकीय खेळीचे संकेतही आता मिळू लागले आहेत.

काँग्रेसच्या विचारांचा वारसा, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे मार्गदर्शन आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांची राजकीय पुण्याई पाठीशी असतानाही सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधरच्या निवडणुकीत ‘बंडखोरी’चा पॅटर्न राबवला, तो आजही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. वडिलांची अधिकृत उमेदवारी डावलून स्वतःचा अपक्ष अर्ज भरणे आणि भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर निवडून येणे, यातूनच तांबे यांचा भाजपच्या दिशेने झुकणारा कल स्पष्ट झाला होता. काँग्रेसने निलंबनाचा बडगा उगारला, मात्र त्यानंतरही तांबे यांनी ‘घरवापसी’साठी फारसे प्रयत्न न करता सत्ताधारी महायुतीतील नेत्यांशी वाढवलेली जवळीकही बरंच काही सांगून जाणारी आहे.

दरम्यानच्या काळात संगमनेरच्या स्थानिक राजकारणातही अजब समीकरणे पाहायला मिळाली. विखे-पाटील आणि थोरात-तांबे या पारंपरिक संघर्षाच्या भिंती पाडून, विखे परिवाराने तांबे यांना केलेली मदत राजकीय तज्ज्ञांना अचंबित करणारी होती. विधानसभा निवडणुकीत थोरातांचा पराभव झाल्यानंतर या संपूर्ण गटाची धुरा आता आमदार सत्यजीत तांबे यांच्या खांद्यावर आली आहे. पालिका निवडणुकीत ‘फॉरवर्ड ब्लॉक’च्या चिन्हाचा आडोसा घेत त्यांनी आपली सत्ता तर राखली, पण ती टिकवण्यासाठी त्यांना भविष्यात भाजपच्या ‘बळकट’ खांद्याची गरज लागणार, हे त्यांनी ओळखले आहे.

नुकत्याच झालेल्या मुंबई दौर्यात एकीकडे नगरसेवकांसोबत त्यांच्या पत्नींना आणि महिला नगरसेवकांसह त्यांच्या पतींना कौटुंबिक सहलीचा आनंद दिला गेला, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून नगरसेवकांवर आपला प्रभाव बिंबवण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, या सगळ्या गदारोळात आमदार सत्यजीत तांबे यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्रातून राज्यसभेचे भाजप उमेदवार विनोद तावडे यांची घेतलेली भेट सर्वात महत्वाची ठरली आहे. विनोद तावडे हे भाजपच्या हाय-मॅनेजमेंटमधील प्रमुख चेहरा असून, त्यांच्याशी होणारी चर्चा केवळ सदिच्छा भेट असू शकत नाही. जेव्हा एखादा नेता तावडेंच्या स्तरावरील नेत्याला भेटतो, तेव्हा त्यामागे आगामी निवडणुकांचे गणित आणि पक्षांतराच्या हालचालींचे संकेत दडलेले असतात असे राजकीय वर्तुळात सांगितले जाते.

सिटीझनविल या अनुवादीत पुस्तकाच्या प्रकाशनापासून आमदार तांबे यांचे शरीर तांत्रिकदृष्ट्या अपक्ष असले, तरीही त्यांचा आत्मा मात्र भाजपच्या धोरणांशी आणि नेत्यांशी एकरुप होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. मतदारसंघातील कामाच्या निमित्ताने सरकारमधील मंत्र्यांची भेट घेतली जाणं कामाचा भाग असू शकतो, पण एखाद्या पक्षाशी संबंध नसताना त्या पक्षाच्या बड्या नेत्याशी एकांतात भेट घेणं ही ‘पक्ष प्रवेशा’ची पूर्वतयारी मानली जाते. कारखाना आणि पालिका निवडणुकीत विखेंनी घेतलेली मवाळ भूमिका आणि त्यातून आमदार तांबेंना मिळालेले यश एका मोठ्या राजकीय समझोत्याचे ‘रिटर्न गिफ्ट’ही असू शकते अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे. यापूर्वीही त्यांच्या ‘गुढ’ राजकीय वागण्यातून अशा चर्चांना उधाणही फूटले आणि कालांतराने त्या फोलही ठरल्या, यावेळी मात्र त्यांच्या राजकीय वाटेत विनोद तावडे यांची नव्याने ‘एन्ट्री’ झाल्याने येणार्या काळात संगमनेरच्या राजकारणात उलटफेर झाल्यास आश्चर्य निर्माण होणार नाही.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या भोवती निर्माण झालेले राजकीय संशयाचे ‘गुढ’ आता अधिक गडद झाले आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर त्यांनी अभ्यासाच्या नावाखाली आयोजित केलेला महापालिका दौरा केवळ निमित्त असून, विनोद तावडेंशी झालेली त्यांची चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीचा ‘मास्टर प्लॅन’ही असू शकतो. त्यातूच येणार्या काळात आमदार तांबे यांच्या ‘राजकीय घरवापसी’चे किंवा ‘नव्या पक्ष प्रवेशा’चे मुहूर्त जाहीर झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

