पोलीस निरीक्षकांच्या संयमी भूमिकेने जातीय तणावाचा डाव उधळला! दबावतंत्रासमोर न झुकता कायद्याचे रक्षण; अफवांच्या सागरातही घडले कौशल्याचे दर्शन..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आंतरधर्मीय तरुण-तरुणीच्या प्रेमप्रकरणावरुन गेल्या 24 तासांपासून संगमनेरात निर्माण झालेला तणाव अखेर निवळला आहे. भावनांचा कल्लोळ, नातेवाईकांचा संताप आणि त्यातच भर पडलेली राजकीय-सामाजिक अफवांची धग, अशा चक्रव्यूहात अडकलेल्या या प्रकरणाला पोलीस प्रशासनाने अत्यंत संयमाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून हाताळले. विशेषतः पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घेतलेल्या कायदेशीर आणि मानवी भूमिकेमुळे शहरात पेटू पाहणारा जातीय तणावाचा वणवा सुदैवाने विझला असून, सध्या शहरात शांतता आहे.

सोमवारी (ता.9) सायंकाळी जेव्हा हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हापासूनच शहरातील वातावरणात धुसफूस सुरु झाली होती. मुलगी सज्ञान असल्याने तिला कोणाच्या ताब्यात द्यायचे, हा तांत्रिक प्रश्न नसून तिच्या जिवाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा होता. पोलिसांनी तिला सुधारगृहात सुरक्षित ठेवले, मात्र मंगळवारी (ता.10) सकाळी नातेवाईकांनी तिथे जाऊन केलेला गोंधळ आणि मारहाणीचा प्रयत्न हा कायद्याला आव्हान देणारा होता. अशा वेळी ‘पोलीस खाकी’ने दाखवलेला हिसका हा कोण्या एका समाजाविरुद्ध नसून, कायद्याचे उल्लंघन करणार्या प्रवृत्तींविरुद्ध होता, हे आता स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी सकाळी सुधारगृहात घडलेल्या घटनेचे अर्धवट आणि सोयीस्कर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करुन शहरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न झाला. पोलिसांनी नातेवाईकांना मारले किंवा मुलीला गायब केले अशा अफवा पसरवून तीनबत्ती चौकात जमाव जमवण्यात आला. काहीकाळ संगमनेरची मुख्य बाजारपेठ आणि वाहतूक ठप्पही झाली. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे यांनी वेळीच अतिरिक्त कुमक मागवून आंदोलकांना शांत केले.

नातेवाईकांकडून मुलीवर आणि मुलावर हल्ला होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्यानेच पोलिसांनी त्यांना खाजगी वाहनातून सुरक्षित स्थळी हलवले होते. यावरुन पोलिसांनी ‘पक्षपात’ केल्याचा आरोप झाला, मात्र वस्तुस्थिती वेगळीच होती. जर पोलीस दप्तरी पोहोचलेल्या ‘त्या’ जोडप्याला काही झाले असते, तर शहराचे सामाजिक वातावरण गढूळ झाले असते. हा संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी घेतलेला ‘अज्ञात स्थळाचा’ निर्णय या प्रकरणात ‘मास्टरस्ट्रोक’ ठरला.

दिवसभर चाललेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर, मुलगी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. तिने सक्षम अधिकार्यांसमोर तिला कोणाच्याही दबावाखाली राहायचे नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. कायद्यानुसार सज्ञान व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याने, पोलिसांनी तिला तिच्या इच्छेनुसार पाठवून दिले. ज्या पोलीस निरीक्षकांच्या निलंबनाची मागणी जमावाकडून केली जात होती, त्याच बारवकर यांनी दाखवलेली कणखरता शेवटी शहराच्या शांततेसाठी पूरक ठरली. त्यांच्या या भूमिकेचे आता शहरातून कौतुकही होत आहे.

संगमनेर हे शांतताप्रिय शहर आहे. वैयक्तिक प्रेमप्रकरणांना जातीय किंवा धार्मिक रंग देऊन शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टवर विश्वास ठेवू नका किंवा त्या फॉरवर्ड करु नका. कायद्याने सज्ञान असलेल्या व्यक्तींना त्यांचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे, त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांप्रमाणेच सुजाण नागरिकांचीही आहे, पोलिसांनी आपली भूमिका चोखपणे बजावली आहे, आता कर्तव्यपूर्तीची जबाबदारी नागरिकांची आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

