‘हरीत’ संगमनेरच्या स्वप्नांना ‘घरभेद्यां’चीच आग! निसर्ग संपवण्याचा अघोरी घाट; स्वच्छतेच्या नावाखाली झाडांची पद्धतशीर विल्हेवाट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकीकडे जागतिक तापमानवाढीच्या संकटाचा सामना करण्यासाठी अवघे जग झाडे लावण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे निसर्गाने भरभरुन दिलेल्या संगमनेरात मात्र काही ‘घरभेदी’ प्रवृत्तींकडूनच हिरवाईवर घाला घातला जात आहे. संगमनेर नगरपालिकेने शहर हिरवेगार करण्यासाठी ‘मियावाकी’ सारखे स्त्युत्य उपक्रम राबवून लाखों रुपये खर्च केले आहेत. मात्र, प्रशासनाच्या याच प्रयत्नांना पालिकेचेच काही ‘कामचुकार’ सफाई कर्मचारी पद्धतशीरपणे सुरुंग लावत आहेत. रोजचा पालापाचोळा गोळा करण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा त्रास नको, म्हणून काही ‘निसर्गद्रोही’ बहरलेल्या झाडांच्या बुंध्याशीच कचरा पेटवून देत असल्याचा संतापजनक प्रकार शहरात राजरोसपणे सुरु आहे. प्रशासनाचे नाक कापून निसर्गाचे हत्याकांड घडवणार्या अशा कर्मचार्यांना ओळखून वेळीच त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे, अन्यथा येणारा काळ संगमनेरकरांना माफ करणार नाही.

अमृतवाहीनी प्रवरा आणि म्हाळुंगी नद्यांच्या संगमाने पावन झालेल्या संगमनेर शहराचे नाव कधीकाळी दंडकारण्याचा भाग म्हणून अभिमानाने घेतले जात असे. दुर्दैवाने, वाढत्या शहरीकरणाचा आणि विकासाचा फटका येथील हिरवाईला बसला आहे. गेल्या दोन दशकांत इमारतींच्या उभारणीसाठी आणि रस्ते रुंदीकरणासाठी शेकडो पुरातन झाडांचा बळी घेतला गेला. त्याला पर्याय म्हणून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ‘दंडकारण्य’ अभियानाच्या माध्यमातून निसर्गाची हानी भरुन काढण्याचा संकल्प सोडला. त्यांच्या या चळवळीने नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण केली, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत, गेल्या दोन दशकांपासून संगमनेर नगरपालिकेनेही शहरातील उद्याने, मोकळ्या जागा आणि रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे.

मध्यंतरी पालिकेत प्रशासकाचे राज्य असताना तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी शहराचे सौंदर्य आणि पर्यावरणात भर घालण्यासाठी विशेष मेहनत घेतली. चंद्रशेखर चौक ते संगमनेर खुर्द आणि जाजू पेट्रोल पंप ते स्वामी समर्थ मंदिराकडे जाणार्या रिंगरोडवर त्यांनी मियावाकी पद्धतीने दाट झाडी लावून दोन्ही रस्ते हिरवेगार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या दूरदृष्टीचा परिणाम आज बघायलाही मिळतो. सध्या पालिकेची सत्ता हाती असलेल्या संगमनेर सेवा समितीनेही आपल्या जाहीरनाम्यातून ‘हरीत संगमनेर’च्या स्वप्नांना अधिक बळ देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच दिसत आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी एकीकडे झाडे लावत असताना, त्याच पालिकेचे कर्मचारी दुसरीकडे हिरवाईला आगीच्या स्वाधीन करीत आहेत. एकाच संस्थेत दिसणारा हा विरोधाभास पर्यावरणप्रेमींसाठी मात्र संतापजनक ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून म्हाळुंगी आणि प्रवरा नद्यांच्या काठाने जाणार्या रिंगरोडवर एक अत्यंत संतापजनक आणि निसर्गद्रोही प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील रोजची सफाई गोळा करण्याची जबाबदारी असलेल्या सफाई कर्मचार्यांपैकी काही ‘कामचुकार’ कर्मचार्यांनी स्वतःचे काम सोपे करण्यासाठी एक वेगळीच ‘शॉर्टकट’ पद्धत शोधून काढली आहे. रोज सकाळी जमा होणारा पालापाचोळा आणि कचरा योग्य ठिकाणी टाकून त्याची विल्हेवाट लावण्याऐवजी, हे कर्मचारी तो कचरा सरळ बहरलेल्या झाडांच्या बुंध्यापाशीच जमा करतात. कचरा जाळण्याला मनाई असतानाही, तो जाणीवपूर्वक त्याच ठिकाणी पेटवून दिला जातो. या आगीत केवळ कचराच जळत नाही, तर त्या झाडाचा बुंधा आणि खोडही भाजून निघते. या अघोरी प्रकारामुळे रिंगरोडवरील काही बहारदार वृक्ष पद्धतशीरपणे वाळवून मारले जात आहेत. त्यातून ‘ना होईल पानगळ, ना राहील पालापाचोळा’ ही अघोरी मानसिकता स्पष्टपणे दिसत आहे.

शहरातील या दोन्ही रस्त्यांवर बिनबोभाट सुरु असलेल्या या निसर्ग हत्याकांडाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. मात्र, या रस्त्यावरुन ये-जा करणार्या काही जागरुक नागरिकांना हा प्रकार पाहवला गेला नाही. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण, म्हणतात ना; ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशीच सध्याची स्थिती आहे. या गंभीर विषयावर पालिकेच्या नगराध्यक्षांसह मुख्याधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

एकीकडे करदात्यांच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्च करुन झाडे लावली जातात, त्यांचे संगोपन केले जाते. त्याचवेळी पालिकेकडून पगार घेणारे कर्मचारी, स्वतःच्या कामचुकारपणासाठी त्याच झाडांना आगीच्या स्वाधीन करीत आहेत. या प्रकाराला केवळ पालिकेचे सफाई कर्मचारीच नव्हेतर, त्यांच्या कामाचे परिक्षण करणारे आरोग्य अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. केवळ कागदोपत्री ‘हरीत संगमनेर’चे स्वप्नं दाखवून काहीही साध्य होणार नाही, त्यासाठी निसर्गाचे शत्रू ठरु लागलेल्या अशा ‘आगीच्या’ प्रवृत्तींना ठेचून काढल्याची गरज आहे.

पालिकेकडून पगार घेऊन पोट भरणारे कर्मचारी जर बहरलेल्या झाडांचा जीव घेत असतील, तर अशा कर्मचार्यांना कायम ठेवणे शहराच्या पर्यावरणीय वातावरणासाठी धोक्याचे ठरेल. पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी अशा कामचुकार आणि निसर्गद्रोही कर्मचार्यांचा वेळीच शोध घेऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा, पालिका दरवर्षी वृक्षारोपण करीत राहील आणि त्याच पालिकेत काम करणारे कर्मचारी मात्र त्यांना आगी लावून ती मारत राहतील. संगमनेरकरांच्या कररुपी पैशांची ही राखरांगोळी वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे, अन्यथा काळ सोकावण्यासही वेळ लागणार नाही.

