इन्फ्लुएंझाच्या वाढत्या प्रादुर्भावात आरोग्य विभागाचा संप! जनता वार्यावर; प्रशासनाकडून ‘दक्षता हाच उपाय’ असल्याचा मंत्र..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाचा भयानक काळ सोसणार्या नगर जिल्ह्यासमोर आता नव्याने दाखल झालेल्या कोविड सदृष्य इन्फ्लुएंझाचे संकट उभे राहिले आहे. या विषाणूजन्य रोगाची लागण झाल्याने राज्यातील पहिला बळीही जिल्ह्यातूनच गेल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे एकीकडे आरोग्य विभाग सजग झाला असला तरीही दुसरीकडे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी मात्र संपावर असल्याने सर्वसामान्यांसाठी दक्षता हाच उपाय शिल्लक राहिला आहे. या रोगाची लागण झालेल्या व्यक्तीला कोविडप्रमाणेच लक्षणे दिसत असल्याने नागरिकांनी असे प्रकार आढळल्यास अंगावर आजार न वाढवता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाकडून करण्यात आले आहे.
राज्यात सध्या झपाट्याने पसरत असलेला एन्फ्लुएंझा हा कोविडसदृष्य विषाणूजन्य आजार असून याची लागण झालेल्या व्यक्तीला सर्दी, विचित्र प्रकारचा खोकला, ताप, अंगदुखी व घसादुखीची लक्षणे आढळून येतात. सध्या या रोगाची लागण झालेल्या संशयित रुग्णाची स्राव तपासणी करणं खर्चिक असून संगमनेरात काही खासगी वैद्यकीय तपासणी शाळांमध्ये त्याची तपासणी केली जाते. संगमनेर तालुक्यात सुदैवाने अद्याप एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही, मात्र लोकांना या रोगाबाबत अधिक माहिती नसल्याने त्याकडे होणारे दुर्लक्ष या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरु शकतो.
गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारी अशा सलग दोन महिन्यांत लहान मुलांना या रोगाची मोठ्या प्रमाणांत लागण झाली, त्यातून त्याचा प्रसार वाढल्याचे आता समोर येत आहे. सद्यस्थितीत राज्याच्या आरोग्य यंत्रणेकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात असून लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना तत्काळ घरातच विलगीकरणात ठेवण्याच्या व त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींच्या स्राव चाचण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तूर्ततः संशयित असलेल्या आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचीच तपासणी केली जात आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर अहमदनगर जिल्हा रुग्णालय किंवा पुण्यात स्राव चाचणीची व्यवस्था आहे.
स्वाईनफ्ल्यू व कोविडप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसर्याकडे, खोकल्याने अथवा शिंकल्याने आणि हातावरील पृष्ठभागाला चिकटल्याने या आजाराची लागण होते. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी कोविडप्रमाणेच शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड रुमालाने अथवा कापडाने झाकावे, नियमितपणे साबणाने स्वच्छ हात धुवावेत, वारंवार डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे, टिश्यू पेपरचा पुनर्वापर टाळावा, एकमेकांशी हस्तांदोलन टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, भरपूर पाणी प्यावे. ताप, खोकला, अंगदुखी, घसा दुखणे, धाप लागणे यासारखी लक्षणे असलेल्या रुग्णाने परस्पर औषधे न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) या रोगाचे एच 1 – एन 1, एच 2 – एन 2 व एच 3 – एन 2 असे तीन उपप्रकार असून गर्भवती महिला, लहान बाळ, ज्येष्ठ नागरिक, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्ती, वैद्यकीय आणि सर्जिकल आजार असलेले रुग्ण आणि दीर्घकाळापासून औषधे घेणार्यांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा अधिक धोका असून अशांनी काळजी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. लागण झालेल्या रुग्णाने विलगीकरणातच राहावे, कुटुंबातील अन्य सदस्यांच्या संपर्कात येवू नये. घरातील आजारी व्यक्तीपासून दूर राहावे, ब्लिच पावडरचे द्रावण करुन लागण झालेल्या रुग्णाचा सहवास असलेल्या टेबल, खुर्ची, सोफा अशा वस्तू त्याद्वारे स्वच्छ कराव्यात, दिवसातून किमान दोनवेळा गरम पाण्यात मीठ व हळद घालून त्याच्या गुळण्या कराव्यात व वाफ घ्यावी असे आवाहन घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयासह तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.
इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) ही कोविडची सुधारित आवृत्ती आहे आणि त्याचा पसरण्याचा वेगही अधिक आहे. कोविड व स्वाईन फ्ल्यू प्रमाणेच या रोगाची लक्षणे दिसतात. अशाप्रकारची लक्षणे आढळून आल्यास रुग्णाने हलगर्जीपणा न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. शासकीय पातळीवर अद्याप या आजाराच्या स्राव तपासणीची सोय नाही, मात्र गरज भासल्यास संशयिताचा स्राव घेवून तो नगर अथवा पुण्याला पाठविला जाईल. आपल्याला काही होणार नाही अशा भ्रमात न राहता प्रत्येक नागरिकाने गर्दी टाळून मास्क वापरावा, वारंवार हात स्वच्छ धुवावेत व भरपूर पाणी प्यावे. काळजी घेतल्यास या आजाराला घाबरण्याचे कारण नाही.
– डॉ. संदीप कचेरिया
वैद्यकीय अधिकारी – ग्रामीण रुग्णालय, घुलेवाडी