आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून संगमनेरात तणाव! नातेवाईकांकडून गंभीर आरोप; संतप्त नातेवाईकांसह जमावाचा रास्तारोको..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरानजीकच्या ग्रामीणभागात दोन भिन्न समाजातील तरुण-तरुणीच्या प्रेमप्रकरणातून संगमनेरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. या प्रकरणातील मुलगी सोमवारी सायंकाळपासून पोलीस संरक्षणात आहे. आज सकाळी तिला भेटण्याच्या निमित्ताने सुधारगृहाच्या परिसरात तिच्या नातेवाईकांची गर्दी वाढल्यानंतर पोलिसांनी सुरक्षितता म्हणून खासगी वाहनातून दोघांनाही ‘अज्ञात‘ ठिकाणी हलवले. मात्र या दरम्यान पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा आरोप झाल्याने त्याचे पडसाद सुरुवातीला शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमाव वाढण्यात आणि नंतर तीनबत्ती चौकात वाहतूक रोखण्यात झाला. या प्रकराने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांनी अतिरीक्त कुमक मागवत बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे.

याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरालगतच्या एका गावात राहणार्या एका तरुणीचे भिन्न समाजाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध आहेत. या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर तिच्या घरच्या मंडळींनी दोघांची समजूत घालून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही दोघांमधील प्रेमाची धग कायम असल्याने अखेर सोमवारी (ता.9) सायंकाळी सदरचे प्रकरण शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कायद्याने वयात असलेल्या तरुणीला घरी परतण्याबाबत विचारणा केली असता तिने नातेवाईकांसोबत जाण्यास ठामपणे नकार दिला.

त्यामुळे पोलिसांनी सोमवारी रात्री तिला शहरालगतच्या एका महिला सुधारगृहात ठेवले होते. या दरम्यान ‘त्या’ तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्याशी बोलण्याची परवानगी मागितल्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडीलांनी सकाळी सुधारगृहात जावून बोलावे अशी सूचना केली. त्यानुसार आज सकाळी मुलीचे काही नातेवाईक ‘त्या’ सुधारगृहात पोहोचले. यावेळी नातेवाईकांच्या जमावातील काहींनी दबावतंत्राचा वापर करुन मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करीत तेथे जमलेला जमाव पिटाळून लावला आणि सुरक्षितता म्हणून संबंधीत जोडप्याला खासगी वाहनातून ‘अज्ञात’ ठिकाणी हलवले आणि या प्रकरणाला तणावाची किनार जोडली गेली.

या प्रकारानंतर आज सकाळी सोशल माध्यमातून ‘विशिष्ट’ संदेश पसरवून जमाव गोळा करण्यात आला. यावेळी सकाळी सुधारगृहात घडलेल्या प्रकरणाचा ऊहापोह करीत पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केल्याचा आरोपही काही जणांकडून करण्यात आला. जवळपास तासभर पोलीस ठाण्याच्या आवारात सुरु असलेला हा प्रकार दुपारी चारच्या सुमारास अतिरीक्त फौजफाटा आल्यानंतर हटवण्यात आला. त्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने परिसरातच घोषणाबाजी करीत तेथून थेट तीनबत्ती चौक गाठला आणि भरचौकात ठाण मांडून चारही रस्त्याने येणारी वाहतूक रोखली.

यावेळी जमावातील काहींनी सकाळी सुधारगृहात घडलेल्या प्रकरणाचा उल्लेख करीत मुलीच्या नातेवाईकांना मारहाण झाल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करण्यासह ‘त्या’ जोडप्याला हलवताना वापरण्यात आलेल्या खासगी गाडीवरुन संशय व्यक्त करीत प्रकरणाच्या सखोल चौकशीसह दोषी असलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी केली. अचानक सुरु झालेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे ऐनगर्दीच्यावेळी अहिल्यानगर, शिर्डी, पुणे व नाशिकच्या दिशेने होणार्या वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला असून आंदोलन करणार्या जमावाची संख्या क्षणाक्षणाला वाढत आहे.

या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकार्यांनी तातडीचा संदेश पाठवून संगमनेर तालुक्यातील चारही पोलीस ठाण्यांसह अकोले, राजूर व आसपासच्या पोलीस ठाण्यांचा अतिरीक्त बंदोबस्तही मागवला असून अहिल्यानगरहून राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांसह धडक कृती दलाचे जवानही संगमनेरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दोन भिन्न समाजातील तरुण-तरुणींमधील या प्रेमप्रकरणातून सद्यस्थितीत संगमनेरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांनी चौकाचौकात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

