‘अखेर’ तालुका आरोग्य अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा! एकाच्या मृत्यूस कारणीभूत; तब्बल बारा दिवसांनी दाखल झाला गुन्हा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
समोरासमोर धडक देत एकाचा बळी घेवून दुसर्‍याला गंभीर जखमी करणार्‍या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश विश्वनाथ घोलप यांच्यावर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या 2 जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास वडगाव पान शिवारातील टोलनाक्याजवळ सदरचा अपघात घडला होता. या घटनेनंतर जखमींना मदत करण्याऐवजी डॉ. घोलप यांनी तेथून पळ काढल्याने अतिरक्तस्राव होवून अमोल गजानन सानप या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेपासून वैद्यकीय रजेवर गेलेल्या डॉ. घोलप यांचा पदभार काढून घेण्याचीही कारवाई झाली होती. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होवू नये यासाठी डॉ. घोलप यांनी खूप प्रयत्न केले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या अपघातात गंभीर जखमी झालेला आणि सध्या पुण्यात उपचार घेणारा शुभम ठाणेकर गुरुवारी शुद्धीवर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा जवाब नोंदविला, त्यावरुन संगमनेर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वादग्रस्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पूर्वसंध्येला सदरची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत अमोल गजानन सानप (वय 30, रा.कर्‍हे, ता.संगमनेर) हा तरुण आपला साथीदार शुभम विलास ठाणेकर (वय 21, रा.लोणी, ता.राहाता) याच्यासह दुचाकीवरुन (क्र.एम.एच.17/ए.बी.3777) लोणीच्या दिशेने जात होता. रात्री दहाच्या सुमारास त्याचे वाहन वडगावपान जवळील टोलनाक्याच्या पुढे आले असता समोरुन येणार्‍या कारने (क्र.एम.एच.17/ए.जे.5959) त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा होवून त्यावरील दोन्ही तरुणांना गंभीर दुखापती होवून दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

सदरील कार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश विश्वनाथ घोलप चालवत होते व अपघातावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते. वास्तविक इतक्या मोठ्या हुद्द्यावर काम करणार्‍या एखाद्या जबाबदार अधिकार्‍याने अशावेळी तत्काळ जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करुन अपघाताबाबत पोलिसांना माहिती देण्याची गरज होती. मात्र सरकारी नोकरी म्हणजे आपल्याला मिळालेली जहांगिरी असल्याचे समजणार्‍या या वादग्रस्त अधिकार्‍याने अशी कोणतीही कृती करण्याचे सोडून आसपास कोणीही नसल्याचे पाहून आपल्या वाहनाच्या नंबर प्लेट खोलून घेण्याचा व ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघाताच्या आवाजाने आसपासचे नागरीक घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहून चक्क त्यांनी तेथून पलायन केले व कोणतीही विशेष दुखापत झालेली नसतांनाही शहरातील एका खासगी रुग्णालयात स्वतःला दाखल करुन घेतले.

त्यांची हीच कृती दुचाकी चालविणार्‍या अमोल गजानन सानप याच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. या महाशयांनी वेळीच आरोग्य यंत्रणेला फोन करुन घटनेची माहिती दिली असती तर कदाचित वेळीच जखमींना वैद्यकीय मदत मिळाली असती. पण त्यांना मानवी जीवापेक्षा आपली ओळख लपविण्यातच स्वारस्य असल्याने अपघातानंतर आसपासचे नागरिक जमा होवून रुग्णवाहिका बोलावण्यात बराचवेळ गेला. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सानप याचा अतिरक्तस्राव होवून दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होवू नये म्हणून या अधिकार्‍याने आपली सगळी ताकद पणाला लावली, मात्र शेवटी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या घटनेबाबत मृत्यू पावलेल्या सानप याच्या कुटुंबाकडून तक्रार दाखल व्हावी अशी तालुका पोलिसांना अपेक्षा होती. मात्र कुटुंबातील तरुणाच्या अपघाती मृत्यूचा धक्का बसलेले सानप कुटुंबीय घटनेनंतर पोलीस ठाण्यात आलेच नाहीत.

या दरम्यान सुरुवातीला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमी शुभम ठाणेकर याची प्रकृती चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरु असतानाच गुरुवारी (ता.13) अपघातानंतर पहिल्यांदाच तो शुद्धीवर आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी रुग्णालयात जावून त्याचा जवाब नोंदविला आणि तो संगमनेर तालुका पोलिसांकडे वर्ग केला. त्यावरुन अखेर बारा दिवसांनी वादग्रस्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश विश्वनाथ घोलप यांच्यावर सदोष मनुष्यवधाच्या कलम 304 (अ) सह भारतीय दंडसंहितेच्या कलम 279, 337, 338, 427 व मोटर वाहन कायद्याच्या कलम 184, 134 (अ) (ब), 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यूवराज आहिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विलंबाने का होईना डॉ. सुरेश घोलप यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.


अपघातानंतर घटनास्थळावरुन पलायन करण्यामागे दारुच्या नशेत झिंगलेले असणे हेच कारण असल्याचे त्यावेळी समोर आले होते. त्यामुळे डॉ. सुरेश घोलप यांनी यंत्रणांना कोणतीही माहिती दिली नव्हती व ते परस्पर संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखलही झाले होते. त्या कारणाने त्यांच्या रक्ताची तपासणी झालेली नव्हती. या अपघाताला आता बारा दिवसांचा काळ लोटल्याने ‘त्या’ दिवशी संबंधित अधिकारी नशेत असल्याची चाचणी होणं अशक्य आहे. मात्र ते ज्या खासगी रुग्णालयात दाखल होते तेथील डॉक्टरांच्या जवाबावरुन आजही हे सिद्ध होवू शकेल असेही आता बोलले जात आहे.

Visits: 205 Today: 2 Total: 1115069

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *