संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी भगवान मथुरे! जिल्ह्यातंर्गत पोलीस अधिकार्यांच्या बदल्या; अकोल्यालाही पोलीस निरीक्षक मिळाले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांसह सहायक निरीक्षकांच्या बदल्यांना मुहूर्त सापडला असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 33 पोलीस निरीक्षक व 15 सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात संगमनेर उपविभागातील सहा पोलीस ठाण्यांचाही समावेश आहे. या आदेशानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आता भगवान मथुरे यांना पाठविण्यात आले असून तालुक्याची जबाबदारी देवीदास ढुमणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. याशिवाय गेली दोन वर्ष रिक्त असलेल्या अकोल्याच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष भोये यांची वर्णी लागली आहे.

गेल्या आठवड्यात विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी विभागीय बदल्यांचे आदेश काढल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जिल्ह्यातील बदल्यांना मुहूर्त लागण्याची शक्यता निर्माण झाली होती, मंगळवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने त्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षा असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याला आता कायम पोलीस निरीक्षक मिळाले असून भगवान मथुरे यांच्याकडे शहराची सूत्रे देण्यात आली आहेत. सध्याचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी गणेशोत्सवानंतर येथून मुख्यालयात बदली व्हावी यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना मुख्यालयात पाचारण करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांची तात्पुरती नेमणूक करण्यात आली होती. या आदेशाने त्यांनाही त्यांच्या पूर्वीच्या आर्थिक गुन्हे शाखेत बोलावण्यात आले असून त्यांच्या जागी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या देवीदास ढुमणे यांना पाठविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या निष्क्रिय कारकीर्दीची फळे भोगणार्या तालुक्याच्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाण्यात संतोष खेडकर यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. त्यांनी या कालावधीत जनमानसात पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासह गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी परिश्रम घेतल्याने त्यांना कायम करण्याची मागणी होत होती.

पोलीस अधीक्षकांनीही जनभावनांचा आदर करीत संतोष खेडकर यांना घारगाव पोलीस ठाण्यात कायम केले आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या आश्वीच्या सुभाष भोये यांचीही बदली करण्यात आली असून त्यांना मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या अकोले पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या जागी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या संतोष भंडारे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून राजूर पोलीस ठाण्याचा भार वाहणार्या सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांना त्याच पोलीस ठाण्यात कायम करण्यात आले असून जिल्ह्याबाहेरुन आलेल्या राजेंद्र पवार यांना संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.

याशिवाय गेल्या ऑगस्टपासून श्रीरामपूर शहराचा पदभार असलेल्या हर्षवर्धन गवळी यांना कायम करण्यात आले असून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दशरथ चौधरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रताप दराडे यांच्या अनपेक्षीत बदलीनंतर गेल्या डिसेंबरपासून राहुरी पोलीस ठाण्याचा कार्यभार वाहणार्या मेघश्याम डांगे यांनाही राहुरीत कायम करण्यात आले आहे. धडाकेबाज अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या नंदकुमार दुधाळ यांना शिर्डी पोलीस ठाणे देण्यात आले आहे. तर, गुलाबराव पाटील यांना शिर्डी वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीगोंद्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले असून तेथील वासुदेव देसले यांना कोपरगाव तालुका देण्यात आले आहे. नियंत्रण कक्षातील राजेंद्र इंगळे आता साई मंदिराच्या सुरक्षेची जबाबदारी पाहणार आहेत. यासोबत (कंसात नियुक्तीचे ठिकाण) चंद्रशेखर यादव (कोतवाली), मधुकर साळवे (तोफखाना), ज्योती गडकरी (सुपा), संभाजी गायकवाड (पारनेर), ज्ञानेश्वर भोसले (श्रीगोंदा), विजय करे (कर्जत), महेश पाटील (जामखेड), संजय ठेंगे (बेलवंडी), संतोष मुटकुळे (पाथर्डी), शिवाजी डोईफोडे (नेवासा), मोरेश्वर पेंदाम (नगर शहर वाहतूक), चंद्रकांत निरावडे (जिल्हा वाहतूक), दिनेश आहेर (सायबर), मच्छिंद्र खाडे (मानवसंसाधन), सुहास चव्हाण (आर्थिक शाखा), घनश्याम बळप (नियंत्रण कक्ष), संपत शिंदे (जिल्हा विशेष शाखा) व गेल्या काही दिवसांत नागरी रोषाचे कारण बनलेले सुपा पोलीस ठाण्याचे नितीनकुमार गोकावे यांना नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले आहे.

अशा एकूण 33 पोलीस निरीक्षकांच्या जिल्हातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यातील एकूण 15 सहायक पोलीस निरीक्षकांचाही खांदेपालट करण्यात आला असून त्यात राजेंद्र सानप (एमआयडीसी, नगर), शिरीषकुमार देशमुख (नगर तालुका), दिनकर मुंडे (भिंगार कॅम्प), यूवराज आठरे (लोणी), महेश जानकर (खर्डा), कैलास वाघ (तोफखाना), समाधान पाटील (शिर्डी), माणिक चौधरी (सोनई कायम), प्रकाश पाटील (नियंत्रण कक्ष), ज्ञानेश्वर थोरात (नेवासा), गणेश वारुळे (स्थानिक गुन्हे शाखा), राजू लोखंडे (राहुरी) व अरुण भिसे (वाहतूक शाखा) अशा एकूण 15 सहायक पोलीस निरीक्षकांनाही नव्याने नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या कारकीर्दीने काळवंडलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आता नव्याने भगवान मथुरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शहरातील वाढलेली गुन्हेगारी, वाहतूक व्यवस्थेत आलेला ढिसाळपणा, कर्मचार्यांमधील गटातटाचे राजकारण आणि मनमानी कारभार, प्रलंबित असलेले शेकडो गुन्ह्यांचे तपास यावर लक्ष्य केंद्रीत होईल व शहर पोलीस ठाण्याला गतवैभव प्राप्त होईल अशी संगमनेरकरांना अपेक्षा आहे, त्या पूर्ण करण्यात मथुरे यशस्वी होतात का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

