जागतिक महिला दिनी संगमनेरच्या उद्योजिकेस कारावासाची शिक्षा! धनादेशाचा अनादर; संगमनेरच्या अतिरीक्त महानगर दंडाधिकार्‍यांचा निवाडा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
व्यवसायासाठी आर्थिक संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमीत फेड केली नाही, वारंवार तगादा केल्यानंतर दिलेला धनादेशही खात्यात शिल्लक नसल्याने वठला नाही या कारणावरुन संगमनेरातील स्पृहा कलेक्शन या सुपरिचित वस्त्रदालनाच्या संचालिका मीता आशिष संवत्सरकर यांना चार महिन्यांचा कारावास आणि अडीच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत भरपाई न दिल्यास अतिरीक्त दोन महिन्यांचा कारावासही सुनावण्यात आला आहे. व्यवहारातून दिल्या गेलेल्या धनादेशाचा अनादर केल्यावरुन अलिकडच्या काळात झालेली ही पहिलीच शिक्षा ठरली आहे. आज जगभरातील महिलांच्या सन्मानार्थ महिला दिवस साजरा होत असतांना संगमनेरातील एका संघर्षशील महिलेला आर्थिक अनियमिततेतून शिक्षेला सामोरे जावे लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार युनियन बँक ऑफ इंडिया (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक) या बँकेच्या संगमनेर शाखेतून संगमनेरातील सुपरिचित असलेल्या स्पृहा कलेक्शन या महिलांच्या वस्त्रांचे दालन चालवणार्‍या मीता आशिष संवत्सरकर यांनी साडेसात लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेल्या या कर्जाची त्यांच्याकडून नियमीत मासिक हप्त्यात परतफेड होणे अपेक्षित असतांना त्यांनी त्यात सातत्याने दिरंगाई केल्याने त्यांचे खाते थकबाकीदारांच्या यादीत आले. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून त्यांच्याकडे एकसारखा तगादा सुरु होता.


या दरम्यान त्यांनी घेतलेल्या कर्जाची काही रकमेचा भरणा करण्याची तयारी दाखवतांना बँकेच्या वसुली पथकाला 1 लाख 81 हजार 700 रुपयांचा धनादेश दिला. बँकेने ठरल्या तारखेला तो खात्यात भरला असता ‘खात्यात पैसे नसल्याच्या’ कारणाने तो न वठता परत आला. त्यामुळे बँकेने संबंधित कर्जदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेत सदरचे प्रकरण संगमनेरच्या अतिरीक्त महानगर दंडाधिकार्‍यांच्या न्यायालयात दाखल केले. यावेळी बँकेकडून जोरदार युक्तिवाद करतांना अ‍ॅड.व्ही.आर.पगारे यांनी विविध दाखल्यांसह सदरची रक्कम परतफेड करण्यासाठी कर्जदाराला वारंवार संधी उपलब्ध करुन दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.


बँकेचा युक्तिवाद मान्य करीत अतिरीक्त महानगर दंडाधिकारी श्रीमती जे.व्ही.पेखले-पुरकर यांनी स्पृहा कलेक्शनच्या संचालिका मीता आशिष संवत्सरकर यांना दोषी धरुन चलनक्षम पत्रकाचा कायदा कलम 138 अन्वये चार महिन्याच्या कारवासाची शिक्षा सुनावली. तसेच युनियन बँकेला (पूर्वीची कॉर्पोरेशन बँक) पुढील सात दिवसांत 2 लाख 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. मुदतीत भरपाई रकमेचा भरणा न केल्यास अतिरीक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल या वृत्ताने संगमनेरच्या व्यवसाय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बँकेच्यावतीने अ‍ॅड.व्ही.आर.पगारे यांनी काम पाहीले, त्यांना अ‍ॅड.किरण रोहम, अ‍ॅड.पल्लवी निकाळे, अ‍ॅड.सुनीता जाधव, प्रशांत बोबडे व बँकेचे व्यवस्थापक समाधान पवार यांनी सहाय्य केले.

स्पृहा कलेक्शनच्या संचालिका मीता संवत्सरकर या संघर्षशील महिला व्यावसायिक म्हणून संगमनेरात परिचित आहेत. व्यवसायातून प्रगतीचा मार्ग शोधतांना त्यांनी आपल्यातील सामाजिक जाणीवाही सतत तेवत ठेवल्या आहेत. त्यासाठीच त्यांनी शहरातील काही आघाडीच्या महिला संघटनांचे सदस्यत्त्व मिळविले होते. आज जगभरातील अशाच संघर्षशील महिलांच्या सन्मानार्थ सोहळे आयोजित होत असतांना संगमनेरातील या नवउद्योजिकेस मात्र धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी कारावासात जाण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *