म्हाळादेवी ग्रामस्थांचे अकोले तहसीलसमोर उपोषण निळवंडे कालव्यांमुळे तयार झालेल्या समस्या सोडविण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, अकोले
अवर्षणग्रस्त 182 गावांना वरदान ठरणार्‍या अकोले तालुक्यातील निळवंडे प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, म्हाळादेवी येथे कालव्यांच्या कामामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. याबाबत जलसंपदा विभागाला वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा बोलावून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवारी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी कालव्यांची कामे बंद पाडून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.

शासन जोपर्यंत मागण्यांची सोडवणूक करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धारही ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाला लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. म्हाळादेवी शिवारात एकूण 5 पूल करण्यात आले आहे. त्यापैकी ठाकरवाडी व कारवाडी या पुलांची उंची जास्त असल्याने जोडरस्ते तीव्र उताराचे झाले आहेत. त्यामुळे या दोन्ही पुलांची उंची कमी करावी. डावा कालवा शिवाराच्या मधोमध गेल्याने शिवार दोन भागांत विभागले आहे. त्यामुळे शेतमाल वाहतुकीसाठी दोन्ही बाजूस पक्के सर्व्हिस रोड करावे. दोन्ही कालव्यांच्या कामासाठी शिवारात घेण्यात आलेले मोठे खड्डे तत्काळ भरून समपातळ करावे. कालव्यांच्या कामासाठी संपादित करून शिल्लक राहत असलेली जमीन मूळ शेतकर्‍यास परत करावी.

कालव्यांसाठी जादा क्षेत्र घ्यावयाचे असल्यास ते संपादित करताना समृद्धी महामार्गाच्या संपादनाप्रमाणे करावे. दोन्ही कालव्यांच्या कामादरम्यान मयत झालेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबास शासन स्तरावरून भरीव मदत मिळावी. कालव्यांचे काम चालू असताना अनेक खासगी शेतीच्या पाईपलाईन तुटल्या आहेत व काही तुटणार आहेत त्या पूर्ववत करून द्याव्यात. जीतवन ओढा येथे केलेल्या पुलावर दोन्ही बाजूने स्लॅब टाकावा जेणेकरून शिवाराच्या दुसर्‍या बाजूस जनावरांना जाता येईल. कालव्यावरील जीतवन ओढा येथील पूल व मेहेंदुरी हद्दीवरील पूल हे अंतर अंदाजे 1 किलोमीटर असल्याने मध्यभागी क्रॉसिंग पूल टाकावा. मेहेेंदुरी ते म्हाळादेवी व इतर रस्ते कालव्यांच्या जड वाहतुकीमुळे खराब झाले असून ते तत्काळ नवीन करून द्यावे, अशा मागण्या उपोषणकर्ते प्रदीप हासे, प्रकाश हासे, सुरेश मुंढे, भरत हासे, दिलीप हासे, सुभाष हासे, राजेंद्र हासे, संजय हासे आदिंनी केल्या आहेत.

Visits: 142 Today: 3 Total: 1595579

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *