‘अखेर’ मुरुम चोरणार्या ठेकेदाराविरोधात कारवाईचा बडगा! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; तहसीलदारांकडून ‘त्या’ जागेचा पंचनामा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्हा परिषदेअंतर्गत येणार्या राज्यमार्गाचे काम घेणार्या ठेकेदाराने परस्पर खाजगी जागेतून मोठ्या प्रमाणात मुरुम उचलल्याचा प्रकार वनकुटे येथून समोर आला होता. हा प्रकार सुरु असतानाच संबंधित शेतकर्याने ठेकेदाराच्या या कृत्याला विरोधही दर्शवला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत त्याच्या बगलबच्चांनी चक्क जागामालक असलेल्या ज्ञानेश्वर कोकाटे या शेतकर्यालाच हुसकावून लावले. याबाबत त्यांनी संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत दैनिक नायकने गेल्या बुधवारी (ता.29) त्यामागील वास्तवावर प्रकाश टाकल्यानंतर आता महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून तहसीलदारांच्या आदेशाने ‘त्या’ जागेचा पंचनामा करण्यात आला आहे. त्यातून संबंधित ठेकेदाराने मुरुमाची चोरी केल्याचे उघड झाले असून संबंधिताचा खुलासा मागवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सदरचा धक्कादायक प्रकार गेल्यावर्षी मार्चमध्ये घडला होता. तालुक्याच्या पठारावरील कोठे बुद्रूक येथील ज्ञानेश्वर बबन कोकाटे या शेतकर्याची वनकुटे-भोजदरी या राज्यमार्गाच्या लगत वनकुटे शिवारात पडीत शेतजमीन आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या या रस्त्याचे गेल्यावर्षी मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. या कामाचा ठेका कोठे खुर्द येथील दत्तात्रय सुदाम खांडगे यांच्या के.बी.के.कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतला होता. त्यानुसार त्यांनी सुमारे चार किलोमीटर अंतराच्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. कोणत्याही शासकीय कामाचा ठेका घेतल्यानंतर त्या कामासाठी लागणारी संपूर्ण सामग्री आणि साहीत्याची पूर्तता संबंधित ठेकेदारालाच करावी लागते. या घटनेत मात्र शासकीय ठेका घेणं म्हणजे कोणाच्याही खासगी जागेत परस्पर शिरणं आणि तेथून दांडगाई करीत पाहिजे तेवढं गौणखनिज उकरुन आपला गल्ला भरणं असेच सूत्र ठेकेदाराने वापरले.

वर्षभरापूर्वीचा हा प्रकार सुरु असताना ज्ञानेश्वर कोकाटे या शेतकर्याला वनकुट्यातील आपल्या पडीक जमिनीतून परस्पर मुरुमाचे उत्खणन सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी त्यांनी तत्काळ तेथे जावून संबंधितांना रोखण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यावेळी दांडगाई करीत ‘त्या’ ठेकेदाराने आणि त्याच्या बगलबच्चांनी चक्क जागा मालकालाच त्याच्या जागेतून हुसकावून लावले. दुर्दैवाने त्याच दरम्यान ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या भावाचा अपघात झाल्याने त्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आणि संबंधित ठेकेदाराचे फावले. त्याने या रस्त्याच्या कामासाठी लागणारा बहुतेक मुरुम कोकाटे यांच्या खासगी जागेतून परस्पर उपसून त्यातून वनकुटे-भोजदरी हा 3.7 किलोमीटर अंतराचा रस्ताही पूर्ण केला.

दवाखान्याची धावपळ थांबल्यानंतर संबंधित शेतकर्याने दत्तात्रय खांडगे नावाच्या ‘त्या’ ठेकेदाराची भेट घेवून त्याच्याकडून परस्पर उपसलेल्या मुरमाचा मोबदला मागितला असता त्याने उडवाउडवी करीत आपण जणू त्या गावचेच नसल्याचे भावसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोकाटे यांनी त्याला कायदेशीर उत्तर देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात माहिती अधिकारात अर्ज दाखल करुन ‘भोजदरी-वनकुटे’ रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश मागितला. मात्र येथेही त्यांना ‘भ्रष्टाचारा’चे पाणी शिंपले गेल्याची अनुभूती मिळाली. मोठ्या प्रयत्नांती मिळालेल्या या माहितीनंतर त्यांनी नुकतीच संगमनेरच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकार्यांकडे तक्रार दाखल करुन न्यायाची मागणी केली.

हा प्रकार दैनिक नायकला समजल्यानंतर पीडित शेतकर्याशी संपर्क साधून गेल्या बुधवारी (ता.29) ‘अजबच रेऽ देवा! ठेकेदाराने शेतकर्याचा ‘मुरुम’ पळवला!’ या मथळ्याखालील सविस्तर वृत्तात ‘मुरुम चोरी’च्या या घटनेवर प्रकाश टाकला. त्याची तत्काळ दखल घेत प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार वनकुट्याच्या ग्राम महसूल अधिकार्यांनी (तलाठी) दोन पंचासमवेत प्रत्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या मालकीच्या खासगी जमिनीवर जावून वस्तुनिष्ठ पंचनामा केला आहे. त्यात या जागेतून जाणार्या भोजदरी-वनकुटे रस्त्याचे काम करणार्याने ठेकेदाराने संबंधित शेतकर्याची कोणतीही परवानगी न घेता, परस्पर दोनशे ते अडीचशे ब्रास मुरुम उत्खणन करुन चोरल्याच्या कोकाटे यांच्या आरोपाचा उल्लेख आहे.

साधारणतः चार महिन्यांपूर्वी के.बी.के.कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक दत्तात्रय सुदाम खांडगे यांनी सदरच्या जागेतून गौणखनिजाचे उत्खणन केल्याचे व त्यासाठी संबंधित शेतकर्याची संमती अथवा परवानगी घेतली नाही. त्यावरुन ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या मालकीच्या जमिनीतून सुमारे दोनशे ते अडीचशे ब्रास इतक्या आकाराचा मुरुम चोरी झाला असल्याचा सविस्तर पंचनामा तहसीलदारांना सादर करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित ठेकेदाराला आता नोटीस बजावण्यात येणार असून त्याचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाईला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षभरापासून आडदांग ठेकेदाराशी एकाकी लढा देणार्या ज्ञानेश्वर कोकाटे या सामान्य शेतकर्याने संघर्षाची हिम्मत दाखवून अन्याया विरोधात तक्रार केली. दैनिक नायकनेही जनतेशी आपली बांधिलकी जोपासताना कोकाटेंच्या लढ्याला पाठबळ दिलं. त्यातून त्यांना चोरी गेलेल्या मुरुमाच्या बदल्यात नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

गौणखनिजाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार्या शासकीय कामात खासगी ठेकेदारांकडून परस्पर गौणखनिजाचे उत्खणन हा प्रकार संगमनेर तालुक्याला नवा नाही. अनेक ठेकेदार काही अधिकारी अथवा कर्मचार्यांना हाताशी धरुन महसूल अथवा वनविभागाच्या हद्दितून अशाप्रकारच्या चोर्या करीतच असतात. या घटनेत मात्र कोठे येथील ठेकेदार दत्तात्रय खांडगे यांच्याकडून चूक झाली आणि त्यांनी ज्ञानेश्वर कोकाटे यांच्या खाचखळग्यांच्या पडीत जमिनीला ‘शासकीय माल’ समजून परस्पर उकरले. या प्रकारातून संगमनेर तालुक्यातील गौणखनिज आणि त्याचे बेकायदा उत्खणन हा विषयही चर्चेत आला आहे.

‘भोजदरी ते वनकुटे’ राज्यमार्गाच्या कामात वापरलेल्या गौणखनिजाचे उत्खणन खासगी जागेतून परस्पर केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. वनकुटे येथील ग्राम महसूल अधिकार्यांना प्रत्यक्ष जागेवर जावून वस्तुनिष्ठ पंचनामा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. नियमानुसार संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून खुलासा मागवणार आहोत. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
धिरज मांजरे
तहसीलदार, संगमनेर

