वीजचोरी प्रकरणी प्रशांत गडाख यांच्यासह एकोणीस जणांवर गुन्हा राजकीय सूड घेण्यासाठीच कारवाई झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
नायक वृत्तसेवा, नेवासा
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासा तालुका दूध संघाच्या वीजचोरी प्रकरणी प्रशांत गडाख यांच्यासह सन 2012 ते 2015 मधील संचालक व समितीवर असलेल्या 19 जणांवर सोनई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीड वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या गडाखांवरची कारवाई माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठीच झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महावितरणचे वसई (पालघर)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सुदर्शन सिंह यांनी 23 फेब्रुवारी 2023 रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात वीजचोरीची दिलेली फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात वर्ग झाली. याद्वारे प्रशांत गडाख त्यांचे चुलत भाऊ प्रवीण गडाख, अध्यक्ष गणपत चव्हाण व इतरांवर गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.
राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपानंतर आमदार गडाख यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठिशी राहण्याच्या निर्धार नेवाशात केल्यानंतर जुन्या वीजचोरीचे प्रकरण उकरून आमदार गडाखांचे पंख छाटण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे तालुक्यात बोलले जात आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासमोर असलेले कट्टर विरोधक संभाजीराव फाटके, दादापाटील शेळके, शिवाजी कर्डिले व तुकाराम गडाख यांनी कधीच खालच्या पातळीवर राजकारण केले नाही, मात्र आताचे विरोधक खालच्या दर्जाचे राजकारण करत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
राजकीय अस्तित्व व वैयक्तिक जीवन उध्वस्त करून खच्चीकरण करण्यासाठी तालुक्यातील विरोधक सध्या अनेक डाव टाकत आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या वीजचोरीचा गुन्हा आता दाखल झाला, यातच सर्वकाही आले. न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून, तालुक्यात मेळावा घेऊन वस्तुस्थिती मांडली जाईल.
– शंकरराव गडाख, आमदार