निळवंडेच्या मान्यतेचे श्रेय घरात बसलेल्यांनी घेऊ नये ः कानवडे निर्धारित वेळेत कालव्यांचे काम पूर्ण होण्याचाही दिला विश्वास

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संकटाच्या नावाखाली घरात बसलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यामुळेच निळवंडेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस विलंब झाला. पण जे महाविकास आघाडीला जमले नाही ते शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेवून करून दाखवले असल्याचे प्रतिपादन संगमनेर भाजपाचे तालुकाध्यक्ष सतीश कानवडे यांनी केले.

उतर नगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणार्या निळवंडे कालव्यांच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुमारे 5 हजार 177 कोटी रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे या निर्णयाबद्दल आभार मानून सतीष कानवडे यांनी आपल्या पत्रकात म्हटले की, वर्षानुवर्षे निळवंडे कालव्यांच्या नावाखाली आपली राजकीय पोळी भाजून घेणार्या तालुक्यातील पुढार्यांनी आता सल्ले देण्याचे काम करू नये. राज्यात यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अकोले तालुक्यात मुखापासून पहिल्या वीस किलोमीटर अंतरावरील रखडलेल्या कालव्यांच्या कामातील अडथळे दूर करून या कामाला गती दिली. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने कालव्यांच्या कामाला गती मिळाली असल्याकडे कानवडे यांनी लक्ष वेधले.

मागील अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारच्या काळात सर्वच निर्णय प्रक्रिया कोविड संकटाच्या नावाखाली अडकवून ठेवण्यात आल्याने निळवंडे कालव्यांच्या कामासाठी आवश्यक असलेल्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस जाणीवपूर्वक मंजुरी मिळू दिली नव्हती. मात्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रशासकीय मान्यतेसाठी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांशी पाठपुरावा केला. शिंदे-फडणवीस सरकारने या प्रकल्पाच्या कामाचे गांभीर्य लक्षात घेवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मान्यता देवून लाभार्थींना मोठा दिलासा दिला असल्याचे कानवडे म्हणाले.

आता कालव्यांच्या कामातील सर्व अडथळे दूर झाल्याने दोन्ही कालव्यांचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतानाच युती सरकारने केलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेवू नये. कारण वर्षानुवर्षे सर्व सत्तास्थाने हातात असताना सुध्दा धरणाच्या मुखापासून कालव्यांची कामे ज्यांना सुरू करता आली नाहीत हे सर्वश्रृत आहे. कालव्यांच्या नावाखाली अनेक निवडणुका जिंकून पाण्याचा थेंबही देवू न शकलेल्या शेतकर्यांच्या जखमेवर फक्त मीठ चोळण्याचे काम केले आहे. सर्वकाही मी केले आणि माझ्यामुळेच झाले असा भ्रम निर्माण करणार्या नेत्यांनी निळवंडेच्या नावाखाली कशा सोयीस्कर राजकीय भूमिका बजावल्या हे जनता जाणून असल्याने युती सरकारच्या निर्णयाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये. कारण राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार फेसबुकवर आणि मंत्री घरात आणि जनतेपासून दूर होते असा टोलाही शेवटी कानवडे यांनी लगावला.
