संगमनेर तालुक्याच्या कोविड संक्रमणाला आज मिळाली पुन्हा गती! शहरी रुग्णसंख्येत आजही कमालीची घट; ग्रामीण भागाची अवस्था मात्र चिंताजनक.. आजही तालुक्यातील तिघांचा कोविड संक्रमणातून गेला बळी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाला आलेली गती मंगळवारी काहीशी मंदावल्याने किंचित दिलासा निर्माण झाला होता. मात्र तो फारकाळ टिकला नाही. आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येने दोनशेहून अधिक रुग्णसंख्येचा आकडा ओलांडला असून आज तालुक्यातील तब्बल 240 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या अहवालात शहरी रुग्णांची संख्या अवघी 21 आहे. त्यातही केवळ संगमनेर असा उल्लेख असलेल्या रुग्णांचाच अधिक भरणा असल्याने शहरी संक्रमणात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र दिसत आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण रुग्णसंख्या आता 14 हजार 466 झाली असून आजही तालुक्यातील तिघांचा कोविडने बळी गेला आहे. आजच्या रुग्णवाढीने सक्रीय रुग्णाच्या संख्येतही भर पडून ती आता 1 हजार 942 झाली आहे. आज तालुक्यातील 128 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले.


गेल्या 15 एप्रिलपासून दररोज तीन हजारांच्यावर रुग्णसंख्या समोर येत असल्याने अहमदनगर जिल्ह्याची कोविड अवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत पोहोचली आहे. त्यातच अहमदनगर शहरासह दक्षिणेतील कर्जत आणि उत्तरेतील राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व कोपरगाव या तालुक्यांमध्येही संक्रमणाने मोठा वेग घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थाच अडचणीत आल्यागत स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडाही निर्माण झाल्याने प्रशासनाला दररोज मोठी धावपळ करावी लागत असल्याचेही चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहे. मात्र मागील दोन दिवसांत रुग्णसंख्या सलग खाली येवून तीन हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर आल्याने मंगळवारी जिल्ह्यात काहीसे समाधानकारक दृष्य दिसत होते. मात्र ते फारकाळ टिकले नाही. आज जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा उसळी घेतली असून जिल्ह्यातील 3 हजार 122 जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे.


संगमनेर तालुक्याची अवस्थाही सध्या गंभीर असून तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रात कोविडचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने एकीकडे शहरी रुग्णसंख्येत दररोज घट तर ग्रामीण रुग्णसंख्येत लक्षनीय वाढ होत असल्याचे विचित्र दृष्य सध्या दिसत आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या प्रलंबित अहवालांमुळे तालुक्याने कालची दिलासादायक रुग्णसंख्या खुप मागे टाकून आज तब्बल 240 रुग्ण समोर आणले आहेत. शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 93, खासगी प्रयोगशाळेचे 104 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेले 43 अशा एकूण 240 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या अहवालांमध्ये संगमनेर शहरातील अवघ्या 21 जणांचा समावेश आहे. त्यातही केवळ संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या तब्बल दहा जणांचा समावेश असल्याने शहरी रुग्णसंख्येला आश्‍चर्यकारकपणे ओहोटी लागल्याचे दिलासादायक चित्रही निर्माण झाले आहे. मात्र दुर्दैवाने सध्याचे संक्रमण यापूर्वीच्या संक्रमणापेक्षा अधिक जीवघेणे सिद्ध होत असून या संक्रमणाने एप्रिलमध्ये अनेकांना बळी घेतले आहेत. या श्रृंखलेत आजही तालुक्यातील तिघा नागरिकांचा बळी गेला आहे.


जिल्ह्यातील रुग्णघटीचा दिलासाही आज संपुष्टात आला असून दोन दिवसांच्या समाधानानंतर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने आज पुन्हा 3 हजार रुग्णसंख्येची मर्यादा ओलांडली आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या 1 हजार 67, खासगी प्रयोगशाळेच्या 1 हजार 178 आणि रॅपीड अँटीजेन चाचणीच्या 877 अहवालांमधून जिल्ह्यातील 3 हजार 122 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 583, राहाता 304, पारनेर 300, नगर ग्रामीण 245, संगमनेर 240, शेवगाव 203, श्रीगोंदा 188, राहुरी 178, पाथर्डी 174, कर्जत 130, कोपरगाव 123, श्रीरामपूर 118, जामखेड 109, नेवासा 95, भिंगार लष्करी परिसर 54, अकोले 46, इतर जिल्ह्यातील 20 व लष्करी रुग्णालयातील 12 जणांचा समावेश आहे. या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 68 हजार 152 झाली आहे. आज जिल्ह्यातील 3 हजार 117 जणांना उपचारांती घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या आता 1 लाख 43 हजार 528 झाली आहे. सध्या जिल्ह्यातील 22 हजार 705 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 85.36 टक्के इतका आहे.

Visits: 100 Today: 1 Total: 1098207

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *