राहुरी तालुका लॉकडाऊनला विविध संघटनांचा विरोध

राहुरी तालुका लॉकडाऊनला विविध संघटनांचा विरोध
शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनसह विविध संघटनांचे प्रशासनाला निवेदन
नायक वृत्तसेवा, राहुरी
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा तालुका असणार्‍या राहुरी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे राहुरी येथील नगरपालिका सभागृहात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत नागरिकांनीच राहुरी तालुका 10 ते 17 सप्टेंबर याकाळात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. या बैठकीला तहसीलदार फसियोद्दीन शेख हे देखील उपस्थित होते. मात्र, आता राहुरी तालुक्यात लॉकडाऊन केला जाऊ नये, यासाठी काही संघटनांनी पुढे येऊन लॉकडाऊनला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुका लॉकडाऊन होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


राहुरी तालुक्यातील श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने तालुक्यात लॉकडाऊन घोषित करू नये, अशी मागणीच केली आहे. तसे निवेदनही संघटनेने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, राहुरीचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. कोरोना लॉकडाऊन काळात वारंवार आमचे व्यवसाय बंद होते. व्यवसाय बंद असल्यामुळे आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. ज्यावेळी राहुरी कारखाना येथे कोरोना रुग्ण निघाले तेव्हा श्री शिवाजीनगर व्यापारी असोसिएशनने स्वयंघोषित लॉकडाऊन ठेवले होते. आता प्रशासनाने पुन्हा 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर याकाळात आठ दिवसांचा राहुरी तालुका लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये आम्ही आमचे व्यवसाय बंद ठेवू शकत नाही, असेही संघटनेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.


याशिवाय आरपीआय (आठवले गट), वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ, फ्रुट विक्रेते संघटना, रिक्षा चालक -मालक संघटना, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यापारी-दुकानदार, बिगारी मजूर, घरकामगार महिला आदी संघटनांच्या काही पदाधिकार्‍यांनीही राहुरीच्या तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यांनीही तालुक्यात लॉकडाऊन करू नये, अशी मागणी केली आहे. लॉकडाऊनमुळे तालुक्यातील छोटछोटे व्यावसायिक, रिक्षावाले, भाजीपाला व्यावसायिक, फ्रुट स्टॉल व इतर व्यावसायिक यांची परिस्थिती हालाखीची निर्माण झालेली आहे. ज्यादिवशी त्यांचे व्यवसाय चालू असतात त्याच दिवशी त्यांच्या घरची चूल पेटते. त्यामुळे आपल्याला कोरोनाला सोबत घेऊन जगायला शिकावे लागेल. अन्यथा कोरोनाच्या अगोदर भूकमारीने गोरगरीब व्यावसायिक व जनता मरेल, असेही या संघटनांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 102012

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *