सत्यजीत तांबेंच्या नव्या ट्विटने पुन्हा उडाला राजकीय धुरळा! टायमिंग साधला की चुकला; संगमनेरसह संपूर्ण राज्यात चर्चांना आला ऊत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरुन राज्यात उडालेला राजकीय धुरळा खाली बसण्यापूर्वीच रविवारी ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांना काँग्रेस शिवाय पर्याय नसल्याचे सांगत त्यांच्या स्वगृही परतण्याचे संकेत दिले होते. मात्र या त्यांच्या वक्तव्याला अवघ्या बारा तासांचा कालावधी उलटण्याच्या आतच सत्यजीत तांबे यांनी केलेल्या नव्या ट्विटने राजकीय चर्चांना पेव फुटले असून त्यांच्या या चार ओळीच्या ट्विटमधून त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केल्याचे राजकीय जाणकारांमधून बोलले जाऊ लागले आहे.
गेल्या महिन्यात नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी स्वपक्षाकडे मागणी करुनही अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत आपण महाविकास आघाडीचेच उमेदवार असल्याचे जाहीरही केले होते. त्यांच्या या भूमिके नंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तांबे कुटुंबाने काँग्रेस सोबत विश्वासघात केल्याचे म्हटले होते. पक्ष शिस्तीचा भंग केला म्हणून डॉ. सुधीर तांबे यांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईस्तोवर तर, सत्यजीत तांबे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. तेथूनच सत्यजीत तांबे यांचे काँग्रेस पासून अंतर वाढत गेले.
या सर्व कालावधीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना नागपूर अधिवेशनादरम्यान अपघात झाल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. त्यामुळे गेल्या जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीत ते माध्यमांसमोर आले नाहीत. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांचे नेमके मत काय याबाबतची उत्सुकता ताणून राहिली होती. थोरात आज बोलतील, उद्या बोलतील याची प्रतीक्षा करीत नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झाली आणि सत्यजीत तांबे मोठ्या मताधिक्क्याने विजयी देखील झाले. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमादरम्यान थोरात यांनी मुंबईतील रुग्णालयातून संगमनेरकरांशी थेट ऑनलाईन संवाद साधला होता. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसचे विचार घेऊनच पुढे जाणार असल्याचे जाहीर केल्याने व सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे कौतुकही केल्याने सत्यजीत तांबे यांची भविष्यातील वाटचाल काँग्रेसच्या वाटेनेच असेल असे स्पष्ट संकेत थोरात यांच्या बोलण्यातून मिळाले होते. मात्र रविवारी दीड महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर संगमनेरात आलेल्या बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणातून त्यांना पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आणण्याचे वक्तव्य केले.
यावेळी बोलताना थोरात यांनी सत्यजीत तांबे यांच्या भाषणातील ‘साहेबांची संपूर्ण टीम आपल्या सोबत होती’ या वक्तव्यावर बोलताना ‘सत्यजीत काही असले तरीही तुझी टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू आता एकटा राहिलास. त्यामुळे तुला काँग्रेसशिवाय आणि काँग्रेसला तुझ्याशिवाय करमणार नाही, त्यामुळे काँग्रेस शिवाय तू किती दिवस राहतोस हे आपण ठरवू’ असे सांगत एकप्रकारे त्यांचा विजय काँग्रेसच्या विचार मूल्यांवर व यंत्रणेच्या जोरावर झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नूतन सदस्य सत्यजीत तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आदीही उपस्थित होते. थोरात यांच्या भाषणापूर्वी सत्यजीत तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले होते. त्यांनी आपल्या भाषणात ‘साहेबांच्या यंत्रणेमुळे आपला विजय झाल्याचे सांगत’ एकप्रकारे आपल्या निर्णयात बाळासाहेब थोरात यांचाही सहभाग असल्याचे सांगण्याचाच त्यांनी एकप्रकारे प्रयत्न केला. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना त्याला जोरदार प्रत्युत्तर देत ‘काँग्रेसच्या मार्गाने चालणार असाल तरच, आपली साथ आश्वासक समजा’ असा इशाराच दिल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात असताना आज सकाळी सत्यजीत तांबे यांनी नव्याने ट्विट करीत राज्यातील राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडून दिली आहे.
रविवारी बाळासाहेब थोरातांनी केलेल्या वक्तव्यावर सत्यजीत तांबे काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना आज सकाळी सत्यजीत तांबे यांनी नव्याने ट्विट केले आहे. त्यात त्यांनी ‘उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी.. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, क्षितिजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी.. ’ असे सूचक ट्विट करीत राजकीय जाणकारांच्या नजरा नभाच्या दिशेकडे उंचावल्या आहेत. एकीकडे रविवारी बाळासाहेब थोरात यांनी सत्यजीत तांबे यांना पुन्हा काँग्रेसच्या चमूत येण्याचे संकेत दिले असताना, सत्यजीत तांबे यांनी मात्र आज ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावना त्यांची पुढील वाटचाल निश्चित झाल्याचे दाखवणार्या ठरत असल्याने त्यांनी आज केलेल्या ट्विटचे टायमिंग साधले की चुकले याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.