महामानव मिरवणुकीतील धुडगूस प्रकरणाचा मास्टरमाईंड ‘अखेर’ गजाआड! याच प्रकरणातील आरोपीचा संगमनेर खुर्दमधील तरुणाच्या खूनातही सहभाग असल्याचे उघड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत अनाधिकाराने घुसखोरी करुन धुडगूस घालण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अखेर बेड्या ठोकण्यात पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. एकसारखी ठिकाणं बदलणार्‍या या आरोपीच्या पोलीस पथकाने थेट मुंबईत जावून मुसक्या आवळल्या. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील नेमक्या षडयंत्राचा उलगडा होण्याची शक्यता असून आज त्याला न्यायालयासमोर हजर केले असता जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात आत्तापर्यंत अटक केलेल्या सहाजणांपैकी एकाचा हनुमान जयंतीच्या संध्येला संगमनेर खुर्दमध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचेही समोर आले असून त्याला बुधवारी त्या गुन्ह्यात वर्ग केले जाणार आहे.

गेल्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संघर्ष मंडळाच्यावतीने सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली होती. सदरची मिरवणूक रात्री आठच्या सुमारास मेनरोडवरील श्रीकृष्ण मंदिराच्या परिसरात पोहोचताच शंभर ते सव्वाशे मुस्लिम तरुणांनी त्यात अनाधिकाराने घुसखोरी करीत हातात चाँदतारा रेखाटलेले हिरवे व लाल झेंडे घेवून प्रचंड धुडगूस घातला. यावेळी या तरुणांनी ‘अल्ला हू अकबर’ व ‘इस्लाम जिंदाबाद’ अशा घोषणा देत शांततेने सुरु असलेल्या या मिरवणुकीला गालबोट लावण्याचा व दुसर्‍या धर्मियांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या दरम्यान काही हुल्लडबाज धर्मांधांनी अनुसूचित जातीच्या नागरिकांकडून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत सहभागी महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य करण्यात आले. त्यासोबतच ज्या रथात महामानवाची प्रतिमा ठेवण्यात आली होती, त्यासमोर अतिशय अश्लील आणि बिभत्स नृत्य करुन व अनाधिकाराने रथ ओढून प्रतिमेचा अवमान करण्याचा प्रकारही घडला. त्यातून मेनरोड परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला व महामानवाच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेची शांततेत सांगता झाली.

याप्रकरणी त्याच दिवशी रात्री उशीराने संघर्ष मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण (रा.दिल्लीनाका) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी फिरोज गुलाब बागवान (रा.मदिनानगर), अहमद कामर चौधरी, अमन समीन बागवान, हुजेब इक्बाल बागवान, सोहेल इक्बाल बागवान, अल्ला अजीज खान, हमजा शेख, अरबाज शेख, अब्दुल समद कुरेशी, डॅनियल शेख, आफन शेख, उमेद काझी, फैजान (गफ्फारचा मुलगा), मारुफ अस्लम बागवान या निष्पन्न आरोपींसह शंभर ते सव्वाशे जणांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 295 (अ), 296, 153 (ब), 354 (अ), 143, 147, 120 (ब), 323 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अ‍ॅट्रॉसिटी) कलम 3 (1) (यू) (व्ही) (डब्ल्यू), 3 (2) (5, ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

घटनेच्या दिवशी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी संशयित ठिकाणी धाडसत्र राबवून आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वीच बहुतेक आरोपी पसार झाल्याने पोलिसांच्या हाती अवघे दोघे लागले. त्यानंतर अपवाद वगळता आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून एकसारखे छापा सत्र सुरु असून आत्तापर्यंत पोलिसांनी अब्दुल समद कुरेशी (रा.भारतनगर), शाहरुक रफिक शेख (रा.मदिनानगर), अमन अन्वर इनामदार (रा.संगमनेर खुर्द), मारुफ अस्लम बागवान (रा.बागवानपूरा) व फारुक इसहाक शेख (रा.संगमनेर खुर्द) या पाच जणांना अटक केली होती, मात्र या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता. त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेही घातले, मात्र प्रत्येकवेळी तो पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरत होता.

मात्र त्याला पकडण्याचा चंग बांधलेल्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने त्याचा पिच्छा मात्र सोडला नाही. याच त्यांच्या चिकाटीने महामानवाच्या मिरवणूकीत धुडगूस घालण्याचे षडयंत्र रचणार्‍या फिरोज गुलाब बागवान (रा.मदिनानगर) याचा शोध लावला आणि अखेर तो मुंबईत दडून बसल्याची माहिती मिळताच पथकाने थेट तेथे जावून मुंबई पोलिसांच्या मदतीने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला आज पहाटेच्या सुमारास संगमनेरात आणण्यात आले असून आज त्याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालसासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्याच्या कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांनी त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली. या प्रकरणाचे न्यायालयीन कामकाज सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी पाहिले. पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने या प्रकरणातील सूत्रधाराला अटक केल्याने या घटनेमागील संपूर्ण षडयंत्राचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.


हनुमान जयंतीच्या संध्येला (ता.16) संगमनेर खुर्दमध्ये प्रकाश दुर्योधन गोफणे (वय 32, रा.संगमनेर खुर्द) या तरुणाचा खून झाला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी सूरज सोमनाथ जेडगुले या अठरावर्षीय आरोपीला त्याच दिवशी अटक केली होती. त्याच्या चौकशीतून या हत्याकांडात त्याच्यासह पाप्या परवेज शेख व फारुक इसहाक शेख यांचीही नावे समोर आली. विशेष म्हणजे शहर पोलिसांच्या मुखी पसार असलेल्या फारुक शेख याला पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने महामानवाच्या मिरवणुकीतील धुडगूस प्रकरणात अटक केली आहे. आता शहर पोलिसांना संगमनेर खुर्दच्या खून प्रकरणात त्याचा ताबा हवा आहे. पाप्या शेख मात्र अजूनही पसार आहे.

Visits: 161 Today: 1 Total: 1412684

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *