राहुरी फॅक्टरी येथील किराणा व्यापार्‍याचा अपघाती मृत्यू अपघात की घातपात? नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण


नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी फॅक्टरी येथील किराणा व्यापारी जयेश देसरडा यांचा सोमवारी (ता.13) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास नगर-मनमाड महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी आखाडा येथील ढाब्याजवळ हा अपघात झाला. मात्र, हा अपघात की घातपात? याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. या घटनेमुळे नगर-मनमाड रस्ता दुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या रस्त्याचे जानेवारीमध्येच काम सुरू होणार होते. परंतु हे काम अद्यापही सुरू न झाल्याने अपघाताची मालिका सुरुच आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, जयेश देसरडा यांचे गुहा गावात किराणा दुकान आहे. दुकानातील काम आटोपल्यानंतर ते राहुरी फॅक्टरी येथे घरी येत असताना नगर-मनमाड महामार्गावरील मुसमाडे पेट्रोल पंपानजीक परराज्यातील एका वाहन चालकाशी दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून देसरडा यांची शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर देसरडा यांनी आपली दुचाकी पेट्रोल पंप परिसरात लावून मालवाहतूक ट्रकच्या चालकाला गाडीच्या खिडकीजवळ जाऊन त्याला खाली उतर म्हणत होते. परंतु, मालवाहतूक ट्रक चालकाने खाली न उतरता ट्रक सुरू केला. त्यामुळे देसर्डा हे चालकाच्या बाजूच्या पायरीवर पाय ठेऊन चालक बाजूच्या खिडकीला लटकले. मालवाहतूक ट्रक जोगेश्वरी आखाडा येथे ‘काका का ढाबा’ जवळ पोहचला असतानाच रस्त्यावर एकेरी वाहतूक चालू असल्याने समोरुन कापूस घेऊन चाललेले वाहन आणि ही मालवाहतूक गाडी घासून गेल्याने यामध्ये देसर्डा दबले गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे देसरडा यांचा मृत्यू अपघाती की, घातपात? याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.


मयत देसरडा यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-भावजयी, तीन मुले, बहिणी असा मोठा परिवार आहे. या अपघाताने राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर त्यांच्या नातेवाईकांनी अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. सकाळी पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यांनी अपघातस्थळी पाहणी केल्यानंतर मुसमाडे पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका कॅमेर्‍यात परप्रांतीय ट्रक चालक व देसरडा यांच्यात बाचाबाची सुरू असल्याचे दिसून आले. तर देसरडा यांची दुचाकी पेट्रोल पंप परिसरात पार्क केलेली आढळून आली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन व पेट्रोल पंपावरील कामगार यांची चौकशी करून तपास सुरू केला आहे. सायंकाळी उशिरा राहुरी फॅक्टरी येथील अमरधाममध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Visits: 12 Today: 1 Total: 115576

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *