घरमालकाने केला विवाहितेचा विनयभंग घुलेवाडीतील प्रकार; घरमालकाविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घुलेवाडीतील एका वसाहतीत भाड्याच्या घरात राहणार्या दाम्पत्याकडून घर खाली करुन घेण्यासाठी घरमालकाने संतापजनक प्रकार केल्याचे समोर आले आहे. या घटनेत 35 वर्षीय विवाहित महिला आपल्या लहान मुलासह घरात एकटीच असल्याचा फायदा घेत बाळासाहेब कोल्हापुरे या आरोपीने त्यांच्या घरात घुसून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी त्याने अश्लील भाषेत संभाषण करीत पीडितेला शिवीगाळही केली व घर खाली करण्याबाबत दमही भरला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घरमालकाविरोधात विनयभंगासह शिवीगाळ व दमबाजी केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार मंगळवारी (ता.4) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घुलेवाडीतील एका उच्चभ्रू वसाहतीत घडला. सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब लक्ष्मण कोल्हापुरे या इसमाचा या वसाहतीत बंगला आहे. या बंगल्यात सध्या एक विवाहित दाम्पत्य आपल्या लहान मुलासह भाड्याने वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून घरमालकाकडून सदरचा बंगला खाली करण्याबाबत तगादा सुरु आहे, मात्र पर्याय उपलब्ध न झाल्याने भाडेकरी दाम्पत्य अद्यापही त्याच बंगल्यात वास्तव्यास आहेत.

गेल्या मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सदर बंगल्याचा मालक बाळासाहेब कोल्हापुरे संगमनेरात आला होता. यावेळी त्याने सदरील भाडेकर्याचे घर गाठले, त्यावेळी घरात सदरील 35 वर्षीय विवाहिता आपल्या लहान मुलासह एकटीच होती. या संधीचा फायदा घेत आरोपीने त्यांच्या घरात प्रवेश करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संबंधित महिलेने दुसरे घर शोधण्याचे काम सुरु असल्याचे सांगत काही दिवस थांबण्याची विनवणी केली असता सदरील इसमाने अश्लील भाषेत संभाषण करुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

हा सगळा प्रकार त्या विवाहितेच्या लहान मुलासमोरच सुरु असल्याने तो प्रचंड घाबरला आणि मोठ्याने ओरडू लागला, त्यातच पीडितेनेही सदरील घरमालकाच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी आारडाओरड केल्याने आरोपी कोल्हापुरे याने ‘तू घर सोड, नाहीतर तुझ्याकडे पाहतोच..’ असा दम भरीत तेथून पलायन केले. या प्रकाराने घाबरलेली महिला दोन दिवस शांत बसून राहिली. त्यानंतर गुरुवारी (ता.6) सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात येवून याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी बाळासाहेब लक्ष्मण कोल्हापुरे (रा.पुणे) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 354, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करुन पुढील तपास हवालदार पारधी यांच्याकडे सोपविला आहे.
