घाटघर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने भात आवणीला वेग! इतर ठिकाणी पाऊस उघडल्याने कामे थंडावली; श्रीभात लागवडीचा प्रयोग

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील घाटघर, कुमशेत परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांनी विशेषतः महिला शेतकर्यांनी पारंपरिक गीत गात भात आवणीची कामे सुरू केली आहेत. काही ठिकाणी आवणी झाली, तर काही ठिकाणी पाऊस उघडल्याने ही कामे थंडावली आहेत.

भंडारदरा, घाटघर, आंबित, कुमशेत, शिरपुंजे येथे सुरवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. मागे झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात पावसाने चार-पाच दिवस लागोपाठ दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतात चांगला ओलावा निर्माण झाला. रोपांच्या लागवडीसाठी पूरक जमीन तयार झाली. काही ठिकाणी मुबलक पाऊस झाल्याने तेथील शेतकर्यांनी लागवडीची कामे हाती घेत वरई, नागली, नाचणीची लावणी केली आहे.

धामणवन, शेणित, घाटघर, वाकी, मान्हेरे, शिरपुंजे अशा काही भागांत भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बायफ, लोकपंचायत या स्वयंसेवी संस्थांकडून शेतकर्यांना भात लागवडीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानुसार श्रीभात लागवडीची आधुनिक चारसूत्र पद्धत या भागात अवलंबिली जात आहे. अल्पभूधारक, कमी शेतजमीन असलेले शेतकरीही श्रीभात लागवडीची पद्धत वापरून कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवू शकतात, असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.
![]()
तालुक्यातील शेतकर्यांची बहुतेक शेतजमीन डोंगर उतारावर असल्याने तेथे पाणी साचून राहत नाही. अशा जमिनीत शेतकर्यांकडून वरई, नागली, खुरासणी, तूर अशी पिके घेतली जातात. ज्या शेतकर्यांच्या जमिनी पाणथळ भागात आहेत, तेथे पावसाचे पाणी साचते. अशा जमिनीत ओलावा, सुपीकता जास्त असल्याने, तेथे भात लागवड प्रामुख्याने केली जाते. सध्या झालेल्या पावसावर शेतकर्यांनी भात आवणीची कामे सुरू केली आहेत. महिला पारंपरिक गीते गात आवणीच्या कामात व्यग्र आहेत.

कोरोना महामारीमुळे शेतीची घडी विस्कटली आहे. शेतमालाला भाव न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतीची कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी शेतकरी सयाजी अस्वले व गंगाराम धिंदळे यांनी केली आहे.

