काँग्रेसच्या विचारांतूनच जनतेचा विकास ः आ. थोरात आमदार बाळासाहेब थोरातांचे संगमनेरात जंगी स्वागत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर दीड महिन्याच्या कालावधीनंतर संगमनेरमध्ये आलेले काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरमधील कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व जंगी स्वागत केले असून काँग्रेसचा विचार हाच सर्वसामान्य जनतेच्या विकासाचा व आपला विचार असून हा विचार पुढे न्यायचा आहे. जिल्ह्यात विकासकामांना खीळ घालून जे दहशतीचे राजकारण सुरू आहे ते जिल्हा कधीही खपवून घेणार नाही, असेही आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

संगमनेरातील यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात तालुक्यातील जनतेच्यावतीने झालेल्या स्वागत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, अॅड. माधव कानवडे, कांचन थोरात, दुर्गा तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, करण ससाने, सचिन गुजर, ज्ञानदेव वाफारे, शरयू देशमुख, बाबासाहेब दिघे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर होती. 381 किलोमीटर झालेली ही पदयात्रा अत्यंत यशस्वी झाली. यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अत्यंत चांगल्या नियोजनाची देश पातळीवर चर्चा झाली. या नियोजनामध्ये सत्यजीत तांबे यांनी मोठा सहभाग घेतला. पदवीधर निवडणुकीनंतर आपण वरिष्ठांना पक्ष मजबुतीसाठी पत्र लिहिली असून तो पक्ष पातळीवर निर्णय होईल. मात्र माध्यमांनी त्याला जास्त प्रसिद्धी दिली. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून याच विचारातून आपण पुढे जाणार आहोत. सत्ता येते आणि जाते. इतक्या वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. मात्र काही लोक राज्याचे मंत्री आहेत की तालुक्याचे ते कळत नाही. त्यांचा राग फक्त संगमनेर तालुक्यावर आहे. संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील विकासकामे त्यांनी थांबवली आहेत. हे दहशतीचे राजकारण जिल्हा कधीही सहन करणार नाही. जनता कधीही त्यांच्या दहशतीचे राजकारणाचे झाकण उडवून देईल.

ऑक्टोबर 2022 मध्येच निळवंडे धरणाचे पाणी आणायचे होते. मात्र या कामासाठी लागणारी खडी थांबवली असल्याने कालव्यांच्या कामासह जिल्ह्यातील अनेक विकास कामे बंद पडली आहेत. संगमनेर तालुका हा संघर्ष करणारा आहे. जिद्दीने लढणारा आहे. कितीही अडचणी आणल्या तरी संगमनेर तालुक्याच्या विकासाची घोडदौड सुरूच राहणार आहे. सुसंस्कृत व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची संगमनेर तालुक्याच्या राजकारणाची परंपरा आहे. या संस्कृतीचा राज्यात सन्मान होतो आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यांतील 54 तालुक्यांमध्ये निर्माण केलेला जिव्हाळा, मैत्रीपूर्ण संबंध यामधून सत्यजीत तांबे यांना मोठी मदत झाली असल्याने डॉ. तांबे यांच्या कामाचा व संगमनेरच्या राजकारणाचा वारसा सत्यजीत तांबे जोपासतील असेही ते म्हणाले.

यावेळी आमदार सत्यजीत तांबे म्हणाले, पदवीधर निवडणुकीच्या वेळी आमदार थोरात व तांबे परिवाराला अडचणीत आणण्याचे डाव काहींनी रचले. मात्र हे सर्व डाव जनतेने उधळून लावले आहे. या निवडणुकीत पक्ष पाठिशी नव्हता. आमदार थोरात यांची दुखापत असल्याने ते प्रचारक नव्हते अशा अडचणीतही सर्वपक्षीय जनतेने साथ दिली. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण संपून समाजकारण सुरू होते. ही संगमनेर तालुक्याची परंपरा आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी निर्माण केलेला पाच जिल्ह्यांमध्ये मोठा ऋणानुबंध व आमदार थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आपण यापुढे जपणार असल्याचेही ते म्हणाले. प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर विश्वास मुर्तडक यांनी आभार मानले.
![]()
बाईक रॅली व एक हजार किलोचा हार…
आमदार बाळासाहेब थोरात यांचे शहरात आगमन होताच तालुक्यातील 500 युवकांनी मोटरसायकल रॅली काढून जंगी स्वागत केले. ठिकठिकाणी स्वागताचे मोठमोठे होर्डिंग लागले होते. यावेळी यशोधन कार्यालयासमोर 1000 किलोचा हार घालून पुष्प्वृष्टी करत आमदार थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
