संगमनेरात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या! चंद्रशेखर चौकातील घटना; आत्महत्येच्या कारणाचा उलगडा नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील भांड्यांचे व्यापारी ऋषीकेश विजयकुमार कोळपकर यांचा एकुलता एक मुलगा कृष्णा (वय 21) याने सोमवारी रात्री गळफास घेवून आत्महत्या केली. बराचवेळ तो त्याच्या खोलीतून बाहेर येत नसल्याचे पाहून त्याच्या वडिलांनी खोलीत जावून पाहिले असता सदरचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या अकस्मात निधनाने चंद्रशेखर चौकात शोककळा पसरली असून शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबतच समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना सोमवारी (ता.2) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास कोळपकर यांच्या चंद्रशेखर चौकातील रहात्या घरात वरच्या मजल्यावर घडली. त्यानुसार भांड्यांचे व्यापारी ऋषीकेश कोळपकर, त्यांची पत्नी व मुलगा कृष्णा हे नेहमीप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपून दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम बघत असतांना रात्री दहाच्या सुमारास कृष्णा अचानक वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेला.

मात्र बराचवेळी झाल्यानंतरही तो खाली आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला हाक मारली असता कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ते वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत गेले. यावेळी त्यांचा एकुलता एक मुलगा त्याच्या खोलीतील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून ते हादरले व त्यांनी हंबरडाच फोडला. त्याच्या आवाजाने त्यांची पत्नीही वरच्या मजल्यावर आली. या दुर्दैवी घटनेनंतर आसपासच्या काही नागरिकांच्या मदतीने त्याला खासगी रुग्णालयातही नेण्यात आले होते, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

आज सकाळी पालिकेच्या शवविच्छेदनगृहात त्याची उत्तरिय तपासणी झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्याच्यावर अतिशय शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर चौकातील नागरिकांसह व्यापार क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. कृष्णा कोळपकर याच्या आत्महत्येमागील कारणांचा अद्याप उलगडा झाला नसून शहर पोलिसांनी या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे.

Visits: 297 Today: 2 Total: 1574827

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *