समाजात बदल घडविण्यासाठी स्री-शक्ती गेमचेंजर ठरेल ः डॉ. खेडेकर इनरव्हील पदग्रहण; 11 विद्यार्थिनींना मोफत दुचाकी तर ध्वनीक्षेपक यंत्रणा प्रदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिथे विरोध असतो तेथेच प्रगती होते. एकेक छोटे पाऊल भविष्यात मोठा बदल घडऊन आणू शकते. समाजात अद्यापही आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे. तो बदल घडवून आणण्यासाठी स्री-शक्ती गेमचेंजर ठरेल, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या संचालक मंडळ पदग्रहण समारंभाप्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. मालपाणी हेल्थ क्लब येथे सोमवारी (ता.18) सायंकाळी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट चेअरमन मुक्ती पानसे, डिस्ट्रिक्ट व्हाईस चेअरमन रचना मालपाणी उपस्थित होत्या. याप्रसंगी मावळत्या प्रेसिडेंट डॉ. दीपाली पानसरे यांनी आपल्या पदाची सूत्रे नवनिर्वाचित प्रेसिडेंट वृषाली कडलग यांच्याकडे तर सेक्रेटरीपदाची सूत्रे सारिका कलंत्री यांनी ज्योती पलोड यांच्याकडे सोपविली.

यावेळी धांदरफळ येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकमान्य विद्यालयातील 11 गरजू विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब तर्फे मोफत दुचाकींचे वितरण करण्यात आले. तसेच सिन्नर तालुक्यातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या भिकुसा विद्यालयास ध्वनीक्षेपक यंत्रणा प्रदान करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्यामसुंदर ब्राम्हणे, लिपीक अप्पा मालुंजकर यांनी ती स्वीकारली. प्रतिथयश लेखा परीक्षक संजय राठी, विकास वैद्य यांचा सी. ए. दिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. डॉक्टर्स डे निमित्ताने क्लबमधील महीला डॉक्टरांना गौरविण्यात आले. मोफत दुचाकी व ध्वनीक्षेपक यंत्रणा प्रकल्पाचे देणगीदार उद्योगपती बाबूभाई डेरे (सिल्वासा, गुजरात), अनिल काळे, योगेश देशमुख, पवनकुमार वर्मा, ज्योती पवार, रवींद्र पवार, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर सिटी सिन्नरचे संस्थापक अध्यक्ष सतीश नेहे, श्रीकांत पाटील, सुनील कडलग यांनाही मुक्ती पानसे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

दरम्यान, नूतन क्लब कार्यकारिणीला पदग्रहण प्रसंगी शपथ देण्यात आली. यामध्ये प्रेसिडेंट वृषाली कडलग, सेक्रेटरी ज्योती पलोड, व्हॉईस प्रेसिडेंट डॉ. श्रद्धा वाणी, आय. पी. पी. डॉ. दीपाली पानसरे, खजिनदार सुनीता गाडे, आय. एस. ओ. स्मिता मालानी, संपादक वैशाली खैरनार, समन्वयक भावना नावंदर, सहसमन्वयक नेहा सराफ, संचालक ज्योती कासट, शिल्पा नावंदर, मंजू मणियार, स्वाती पडताणी, विजया शिंदे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन स्मिता मालाणी व शिल्पा नावंदर यांनी तर आभार डॉ. श्रद्धा वाणी यांनी मानले.
