विकेंड धमाका! साईबाबांच्या शिर्डीतील सहा अलिशान हॉटेल्सवर पोलिसांचे छापे हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भांडाफोड; अकरा आरोपींना अटक, पंधरा मुलींची सुटका..

नायक वृत्तसेवा, शिर्डी
देश-विदेशातील हजारों भक्तांना नेहमी ओढ लागून असलेल्या आणि सबका मालिक एकचा संदेश देणार्या साईबाबांच्या शिर्डीतून अतिशय धक्कादायक वृत्त हाती आले आहे. सध्या निम्म्या जिल्ह्याचा प्रभार असलेल्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी हा विकेंड धमाका केला असून आज मध्यरात्रीच्या सुमारास शिर्डीतील वेगवेगळ्या सहा अलिशान हॉटेलवर छापा घालून हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत एकूण 11 आरोपींना अटक करण्यात आली असून 15 मुलींची सुटका झाली आहे. त्यात परप्रांतीय मुलींचाही समावेश आहे. या कारवाईने शिर्डीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून श्रद्धेच्या महासागरातही मोठ्या प्रमाणात अनैतिकता फोफावल्याचे उघड झाले आहे.

शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव सध्या रजेवर असल्याने शिर्डी व संगमनेर उपविभागाचा पदभार श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे आहे. जिल्ह्यातील अतिशय धडाकेबाज अधिकारी अशी ओळख असलेल्या मिटके यांना शुक्रवारी (ता.5) शिर्डीतील काही हॉटेलल्समध्ये (लॉज) हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या खबर्यांचे नेटवर्क ‘अॅक्टिव्हेट’ करुन त्याची खातरजमा केली असता मिळालेल्या माहितीत तथ्य असल्याचे समोर आले.

त्यानंतर त्यांनी आपल्या विश्वासातील कर्मचार्यांना सोबत घेत माहिती प्राप्त झालेल्या ठिकाणांवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. पाठवलेल्या ग्राहकाने इशारा करताच आज मध्यरात्रीच्या सुमारास साईबाबांच्या शिर्डीतील हॉटेल एक्झिक्युटीव्ह-इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, एस.पी.हॉटेल, हॉटेल साई शीतल, हॉटेल गणेश पॅलेस आणि हॉटेल साई महाराजा अशा एकूण सहा ठिकाणांवर एकाचवेळी छापे घालून तेथे सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघडा पाडला.

या कारवाईत पोलिसांनी एकूण 11 आरोपींना अटक केली असून त्यांच्या तावडीतून 15 मुलींची सुटका करण्यात आली आहे. एकाचवेळी सहा ठिकाणी कारवाई करण्यासाठी उपअधीक्षक मिटके यांनी नियोजनबद्ध पद्धतीने योजना आखून स्वतंत्र सहा पथके तयार केली होती. त्यातील पाच पथकांचे नेतृत्त्व प्रत्येक एका पोलीस निरीक्षकांकडे तर एका पथकाचे नेतृत्त्व त्यांनी स्वतः केले. या संपूर्ण कारवाईतून शिर्डी पोलिसांना मात्र दूर ठेवण्यात आल्याने आश्चर्यही निर्माण झाले आहे. पोलीस निरीक्षक विलास पुजारी, डोईफोडे, डांगे, चौधरी, पाटील, इंगळे यांच्यासह सहाय्यक निरीक्षक माणिक चौधरी, थोरात, उपनिरीक्षक बोरसे व अन्य कर्मचार्यांचा या कारवाईत सहभाग होता. या छापासत्राने जागतिक श्रद्धास्थळ असलेल्या साईनगरीतील हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा भांडाफोड झाला आहे.

