श्रमिकनगरमधील विवाहित विकृतांकडून विद्यार्थीनींचा विनयभंग! चार वर्षांपासून सुरु होता विकृत प्रकार; परिसरात फोफावलेली गुन्हेगारीही आली चर्चेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात घडणार्या अनेक घटनांचे मूळ असलेल्या नाशिक महामार्गावरील श्रमिकनगर वसाहतीतून अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. गेल्या चार वर्षांपासून या रस्त्याने महाविद्यालयात जाणार्या एका अल्पवयीन विद्याथीर्नीसह तिच्या बहिणीला दोघा अधेड विवाहितांकडून छेडण्याचा प्रकार सुरु होता. मात्र रविवारी सायंकाळी श्रमिनगरच्या पोषक वातावरणात फोफावलेल्या या गुन्हेगारीने विकृतीचा कळस गाठताना पीडित विद्यार्थीनींकडे बघत अतिशय घृणास्पद हावभावासह इशारा करण्यापर्यंत मजल मारली. या प्रकाराने भयभीत झालेल्या पीडितेला एका तरुणाने धीर देत तिच्या आजीशी संपर्क साधला. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या तिच्या कुटुंबाला पाहून दोन्ही आरोपी पसार झाले. या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबाने आरोपींच्या घरी जावून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता उलट तिघा महिलांनी त्यांनाच मारहाण करीत पिटाळून लावले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून श्रमिकनगरमधील विकृत मानसिकतेच्या जावेद आणि इरफान उस्मान शेख या दोघा विकृतांसह त्यांची आई आणि बायकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने उच्चभ्रु वसाहतींच्या आणि तालुक्यातील महत्त्वाच्या शिक्षणसंस्थांकडे जाणार्या रस्त्यावर वसलेल्या श्रमिकनगरमध्ये फोफावलेली गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली असून येथील विकृतांवर कायद्याचा धाक निर्माण होण्याची गरज आहे.

याबाबत संगमनेर शहरालगतच्या उपनगरात राहणार्या एका एकोणावीस वर्षीय तरुणीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सदरचा प्रकार गेल्या चार वर्षांपासून अकोले बायपास रस्त्याने पुणे-नाशिक महामार्गाकडे येणार्या रस्त्यावरील श्रमिकनगरच्या परिसरात सुरु होता. सदरील विद्यार्थीनी त्यावेळी इयत्ता अकरावीचे शिक्षण घेत असताना या रस्त्याने महाविद्यालयात जात असतं. अनेकवेळा तिच्यासोबत तिची बहिणही असायची. प्रत्येकवेळी श्रमिनगरमधून जाताना आरोपी जावेद व त्याचा भाऊ इरफान उस्मान शेख हे दोघे त्यांच्याकडे पाहून विचित्र हावभाव करायचे, इशारा करीत त्यांचा पाठलाग करायचे. पीडित मुलींनी सदरचा प्रकार आजीला सांगितल्यानंतर त्यांनी श्रमिनगरमधून जाणार्या रस्त्याचा वापर टाळण्यास सुरुवात केली. मात्र एखाद्या वेळी उशिर झाल्यास त्या रस्त्याचा वापर केल्यानंतर सख्ख्या भावांची ही विकृत जोडी त्यांना आडवी यायची.

या प्रकरणातील तक्रारदार पीडितेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेल्याकाही दिवसांपासून ती परिसरातील एका खासगी आस्थापनेत नोकरीसाठी जाते. रविवारी (ता.28) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पीडित मुलगी कामावरुन घरी जाण्यासाठी निघाली असता उशीर व्हायला नको म्हणून तिने महामार्गावरुन श्रमिकनगरच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. पण ती पुढे जाण्याच्या आधीच जावेद-इरफानची विकृत जोडी तिच्या मार्गावरील काटवनात निर्वस्त्र होऊन उभी होती. पीडित मुलगी समोर दिसताच दोघांनी विकृत चाळ्यांचा कळस गाठीत अतिशय घृणास्पद हावभाव करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहुन पीडित मुलगी प्रचंड घाबरली व थरथर उडू लागली. सुदैवाने त्याचवेळी तेथून जाणार्या एका ओळखीच्या तरुणाने तिला धीर देत घडल्या प्रकाराबाबत पीडितेच्या घरी कळवले.

आपल्या मुलीच्या काळजीने तिची आजी व बहिण काही नातेवाईकांसह घटनास्थळी पोहोचताच दोघेही विकृत तेथून पसार झाले. त्यानंतर जमलेल्या नातेवाईकांसह काहींनी आरोपींच्या श्रमिकनगरमधील घरी जावून घडला प्रकार सांगत जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ‘उलटा चोर कोतवाल को डाटें’ या म्हणीचा खरा अनुभव आला. घरातील विवाहित माणसांनी असा घृणास्पद प्रकार केल्याचे समजल्यानंतर खरेतर त्यांच्या जन्मदात्रीने हातात लाकडाचा दांडा घेणं अपेक्षित होतं. मात्र घडलं उलटंच, आपल्या मुलांवर खोटा आळ घेवून ही मंडळी दारात आल्याचा अर्विभाव करीत दोघा आरोपींच्या आईने शिवीगाळ सुरु केली. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या बायकांनी त्याही पुढे जात हातात येईल ती घेवून पीडितेसह तिच्या आजी व बहिणीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार सुरु असताना पीडितेच्या आजीसोबत आलेल्या नातेवाईकांना आपण महाष्ट्रातल्या संगमनेरात आहोत की पश्चिम बंगालमधल्या असाच प्रश्न पडला असावा. अखेर आरोपीच्या आईसह दोघांच्या बायकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विकृतांवर पांघरुन घालीत पीडितेला तिच्या कुटुंबासह तेथून पिटाळून लावले. याबाबत रात्री उशिराने पीडितेने आपल्या वडिलांसह शहर पोलीस ठाण्यात येवून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपी जावेद उस्मान शेख व इरफान उस्मान शेख या दोघांवर विनयभंगासह त्या दोघांची आई आणि त्यांच्या बायका अशा पाच जणांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 79, 118 (1), 115 (2), 352, 351 (2), 3 (5) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

कधीकाळी शहराच्या बाहेर वसलेल्या श्रमिकनगर वसाहतीने आता शहराच्या उच्चभ्रु वसाहतींच्या मधोमध आणि बहुतेक सर्वच शिक्षण संस्थांच्या मार्गावरील बकाल वाढलेल्या विस्तीर्ण परिसराचे स्वरुप धारण केले आहे. अनेक गुन्हेगारांच्या वास्तव्यामुळे शहरात घडणार्या बहुतेक घटनांचे मूळ सापडणार्या या परिसरातील अवैध व्यवसाय व प्रकारांमध्येही मोठी वाढ झाल्याने हा परिसर शहराच्या सामाजिक शांततेसाठी बाधा निर्माण करु लागला आहे. स्थानिक राजकारणी आणि पोलिसांनी या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहताना भविष्यात संगमनेरसारख्या सुसंस्कृत शहरात पुन्हा अशाप्रकारची विकृती तोंड काढणार नाही यासाठी त्यांचा योग्य बंदोबस्त करण्याची गरज आहे.

