निवडणुकीचा रंग : आठ लाखांच्या गाडीतून साडेपाचशे रुपयाची दारु जप्त! घारगाव पोलिसांची कारवाई; घुलेवाडी, साकुरसह ‘त्या’ चौदा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी चुरस..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या 367 सदस्यपदांसह सरपंचपदासाठीच्या मतदानाला आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली. साडे अकरा वाजेपर्यंत तालुक्यात सरासरी 22 टक्के मतदान झाले आहे. आत्तापर्यंत मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले नसून पठार भागातील साकुर व आमदार थोरात यांचे प्राबल्य असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र मोठी गरमागरमी पहायला मिळत आहे. या दोन्ही ठिकाणी मतदारांना प्रलोभने दाखवण्याचे वेगवेगळे प्रकार घडल्याच्या चर्चा कानावर येत असतानाच घारगाव पोलिसांनी मध्यरात्री आठ लाख रुपये किंमतीच्या एका आलिशान कारमधून अवघी 570 रुपयांची देशी व विदेशी दारु जप्त केली तर, काल रात्री उशिरापर्यंत साकुरमधील मुळाखोरे ग्रामीण पतसंस्था सुरुच असल्याने पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी बँकेत जाऊन अधिकाऱ्यांचे काल उपटल्याचा व्हिडिओही समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तालुक्यातील 37 पैकी 14 ग्रामपंचायतीमध्ये थोरात व विखे यांच्या गटांमध्ये थेट लढत असल्याने तेथे मोठी चुरस पहायला मिळत आहे.
वेगवेगळ्या राजकीय घडामोडींच्या शर्यती पार करीत राज्यातील साडेसात हजाराहून अधिक ग्रामपंचायतीं मध्ये आज सकाळी साडेसात वाजल्यापासून उत्साहाच्या वातावरणात मतदानाला सुरुवात झाली. संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींच्या 367 सदस्य पदांसाठीही आज मतदान होत आहे. तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या या ग्रामपंचायत क्षेत्रात 98 हजाराहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या दोन सत्रात सकाळी साडे अकरा पर्यंत त्यातील 21 हजार 919 (22.4 टक्के) नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत राहावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अमोल निकम यांनी प्रत्येक केंद्रनिहाय मतदान अधिकारी व तेथील सुरक्षेची नियोजनबद्ध रचना केल्याने सकाळपासून तालुक्यातील 158 मतदाना केंद्रातून कोणत्याही तांत्रिक अथवा मानवी अडचणीची तक्रार आलेली नाही. या सर्व मतदान केंद्रांसाठी एकूण 790 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून 80 कर्मचारी राखीव आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एका सशस्त्र पोलिसाची नेमणूक करण्यात आली असून त्याच्या सोबतीला गृहरक्षक दलाचे जवानही देण्यात आले आहेत. याशिवाय निवड मतदान प्रक्रिया सुरु असेपर्यंत मतदान केंद्राच्या परिसरात कलम 144 ही लागू राहणार आहे.
या दरम्यान मतदारांना प्रलोभने दाखवून आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मतदानाच्या पूर्वसंध्ये पासूनच उमेदवारांचे समर्थक वाड्या-वस्त्यांवर फिरत होते. त्यातूनच मध्यरात्री एक वाजता घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील पठारभागातील सर्वात संवेदनशील मतदार संघ समजले जाणाऱ्या साकुर परिसरात गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद फिरणाऱ्या एका आलिशान टाटा पंच (क्र.एम.एच. 17/सी.एम. 9295) या वाहनाची तपासणी केली असता, त्यात रॉयल चॅलेंज व रॉयल स्टॅग या विदेशी मद्याच्या दोन बाटल्यांसह देशी (बॉबी) दारुच्या तीन बाटल्या असा एकून 570 रुपयांचा दारुसाठा आढळून आला.
याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शांताराम पोपट गाडेकर (वय 36) व ऋषिकेश संजय गाडेकर (वय 22, दोघेही रा.जांबुतरोड, साकुर) यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करुन आठ लाख रुपये किंमतीची टाटा पंच ही आलिशान कार व 570 रुपयांची दारु असा एकूण आठ लाख 570 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
एकीकडे मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या इराद्याने वाहनात वेगवेगळ्या कंपन्यांची मद्य आढळल्या प्रकरणी पहाटे कारवाई झालेली असताना, त्यापूर्वी साकुरमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडल्याचे दिसून आले. साकुर मधील मुळाखोरे ग्रामीण पतसंस्थेचे कार्यालय रात्री दहा वाजून गेले तरी चक्क सुरुच असल्याचे पाहून गस्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी थेट बँकेत जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी त्यांनी एका मागून एक प्रश्नांचा भडीमार केला असता बँकेतील अधिकारी व कर्मचारी गोंधळून गेल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षकांनी ताबडतोब बँकेला टाळे लावण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर एव्हाना सायंकाळी पाच वाजता बंद होणारी बँक रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास बंद झाली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून उलटसुलट चर्चांनाही ऊत आला आहे.
माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळी आठ वाजता आपल्या जोर्वे या आपल्या मूळगावी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत श्रीमती कमलबाई थोरात, कांचन थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ.जयश्री थोरात, सविता थोरात उपस्थित होत्या.
Visits: 24 Today: 2 Total: 115324