मानवी हलगर्जीपणा आणखी कितीजणांचे बळी घेणार? ऊस वाहतुकदार झालेत संवेदनशून्य; आणखी एका निष्पापाचे डोके चिरडले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
साक्षात ‘मृत्यूघंटा’ म्हणून कुपरिचित असलेला पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग बायपास झाल्यानंतर तरी सुरक्षीत होईल असा सामान्यांचा समज मानवी हलगर्जीपणामूळे भ्रम ठरला आहे. शुक्रवारी सायंकाळी याच महामार्गावरुन बिनधास्त डबलट्रॉली लावून सुसाट धावणार्या उसाच्या ट्रॅक्टरने एका महाविद्यालयीन तरुणीचा जीव घेतला आणि त्यातून ऊस वाहतुकदार नागरी जीवांच्याप्रती संवेदशनशून्य होत असल्याचे वास्तवही अधिक प्रखरपणे समोर आले. प्रत्यक्ष पाहणार्या प्रत्येकाच्या डोक्याला झींग यावी इतका भयानक हा अपघात होता. त्यातून नागरी रोषही उसळला असून दैनिक नायकने याबाबतचे वृत्त प्रसारित केल्यानंतर सामाजिक माध्यमातील अनेक समूहांमध्ये या घटनेचा संताप व्यक्त होवून काही नेटकर्यांनी यंत्रणेला जाब विचारण्याची तयारीही सुरु केल्याचे दिसून आले. एखाद्या दुर्दैवी घटनेनंतर असे प्रकार नेहमीच घडतात, त्यातून कायमस्वरुपी तोडगा मात्र आजवर निघू शकला नाही हे सामान्य माणसांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

बोटा, माहुली, चंदनापुरी व कर्हे अशा चार-चार भयानक घाटांतून वेडीवाकडी वळणं घेत जाणारा ‘पुणे-नाशिक’ हा राष्ट्रीय महामार्ग 1876 सालच्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून साकारला गेला. सुरुवातीच्या शंभर वर्षात या महामार्गावरुन होणारी वाहनांची वर्दळ अगदीच मर्यादीत असल्याने चालकांच्या चुकांमूळे अथवा वाहनातील बिघाडांमूळे अपवाद वगळला तर अभावानेच अपघात होत. मात्र गेल्या तीन-चार दशकांत वाहनांची संख्या अनेक पटींनी वाढल्याने या महामार्गाने आजवर हजारों निष्पापांचे बळी घेतले. त्यातच हा महामार्ग संगमनेर शहराच्या अगदी मध्यभागातूनच गेल्याने आणि याच महामार्गावर शहरातील विविध महाविद्यालये व शाळाही असल्याने गेल्या चार दशकांत नागरीकांसह अनेक विद्यार्थ्यांनीही आपले जीव गमावले. त्यामुळेच हा महामार्ग म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळाच ठरला होता.

त्यावर पर्याय म्हणून सिन्नर ते खेडपर्यंतच्या महामार्गाचे नूतनीकरण झाले. त्यातून संगमनेर शहराला बायपास मिळाल्याने वाहनांची वर्दळ कमी होवून अपघातांची श्रृंखला खंडीत झाल्यासारखे समाधानकारक चित्रही निर्माण झाले. मात्र मानवी हलगर्जीपणा आडवा आल्याने ते फारकाळ टिकून राहीले नाही. एकीकडे वाहनांची वर्दळ कमी होताच दुसरीकडे अतिक्रमणधारकांनी उचल खाल्ली आणि मनाला वाट्टेल तेथे जागा अडवून भररस्त्यातच हातगाड्या उभ्या करण्याची आणि आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी सामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळण्याची जणू स्पर्धाच लागली. त्यातच गळीत हंगामाच्या कालावधीत ऊस वाहतुकदार दोन-चार लिटर डिझेल वाचवण्यासाठी नागरीकांचा जीव धोक्यात घालून सर्रास शहरातंर्गत रस्त्यांचा वापर करु लागल्याने मध्यंतरी काहीकाळ खंडीत झालेली अपघातांची श्रृंखला पुन्हा सुरु झाली आहे.

शुक्रवारी शहरातील जुन्या पोस्टाजवळ घडलेला अपघात हेच सांगत आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत संगणक अभियांत्रिकेच्या दुसर्या वर्षात शिकणारी वैष्णवी साहेबराव गुंजाळ (वय 19, रा.निर्मलनगर, घुलेवाडी) ही विद्यार्थीनी शहरातील शिकवण्या आटोपून नेहमीप्रमाणे आपल्या घराकडे निघाली. सायंकाळी सातच्या सुमारास ती पुढे चाललेल्या उसाच्या डबलट्रॉली ट्रॅक्टरला ओलांडून जात असतांना वळणावर अचानक बस समोर आल्याने तिचा गोंधळ उडाला. वास्तविक हा प्रकार ट्रॅक्टर चालकाच्या लक्षात यायला हवा होता, मात्र प्रत्यक्षात ऊस वाहतुकदारांची संवेदनाच हरपलेली असल्याने त्याला या गोष्टीशी काहीएक घेणं नसल्याचेचं दिसून आले. या गोंधळात चालकाच्या नजरेपासून दूर असलेल्या दुसर्या ट्रॉलीचा धक्का लागल्याने ती विद्यार्थीनी मोपेडसह खाली पडली आणि क्षणात ट्रॉलीच्या मागील टायरखाली डोके सापडून तिचा जागीच अंत झाला.

आपल्या वाहनाखाली माणूस मेलाय हे लक्षात येताच काय झालंय हे पाहण्याची तसदीही न घेता संवेदना हरपलेला ट्रॅक्टरचालक आपले वाहन तेथेच सोडून एका क्षणात गायब झाला. आसपासच्या नागरीकांनीच घटनास्थळी धाव घेत चाकाखाली चिरडलेल्या त्या विद्यार्थीनीला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या भिषण अपघाताने तशी संधीच सोडलेली नव्हती. घटनेनंतर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेवून कायदेशीर सोपस्कार उरकले. मात्र त्यांची कृती पुन्हा असा अपघात घडणार नसल्याची शाश्वती देणारी जाणवली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होईल, आरोपीच्या अटक व सुटकेच्या प्रक्रियाही राबविल्या जातील. मात्र त्यातून सामान्य माणसाचे जीवन सुरक्षित होईल याचा कोणताही विश्वास यंत्रणा देवू शकणार नाहीत.

वास्तविक उसाची वाहतुक करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वापर करता येतो का? ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना असतो का? सायंकाळी अंधार पडल्यानंतर पाठीमागील बाजूने रिफ्लेक्टर नसतांनाही अशा ट्रॅक्टरचालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस का धजावत नाहीत? साखर कारखानदारांची यामागील भूमिका काय? सामान्य माणसांचे जीव जाणार नाहीत यासाठी त्यांचे धोरण काय? राज्यात सर्वत्र अशा वाहतुकीचा फटका सामान्यांचे जीव जाण्यात होत असतांना संगमनेरच्या साखर कारखानदारांनी त्यातून काय बोध घेतला? की त्यांच्यासाठी साखरेपेक्षा मानवी जीव स्वस्त आहे? या घटनेनंतर आतातरी संगमनेर साखर कारखाना डबल ट्रॉलीतून होणारी वाहतूक बंद करणार का? बिना रिफ्लेक्टरच्या ट्रॉलीमधून कारखान्यात पोहोचलेला ऊस स्वीकारतील का? अपघात टाळण्यासाठी त्यांच्याकडून काय कृती होईल? असे असंख्य प्रश्न या घटनेने उपस्थित केले आहेत.

अपघातात ठर झालेली छकुली उर्फ वैष्णवी संग्राम मूकबधीर विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक साहेबराव गुंजाळ यांची कन्या आहे. हा अपघात झाला तेव्हा ते स्वतः जळगाव जिल्ह्यात गेलेले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिराने या अपघातात ठार झालेल्या छकुली उर्फ वैष्णवी साहेबराव गुंजाळ या विद्यार्थीनीचे काका अशोक प्रभाकर गुंजाळ यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन शहर पोलिसांनी सोनालिका कंपनीच्या निळ्या रंगाच्या विना नंबरप्लेट असलेल्या अज्ञात ट्रॅक्टरचालकावर सदोष मनुष्यवधाचे कलम 304 (अ) सह 279, 338, मोटार वाहन कायद्याचे कलम 184, 134 (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक सचिन उगले यांच्याकडे देण्यात आला आहे.

अनेकांचे डोळे पाणावले..
या भिषण अपघातात टायरखाली डोके सापडून ठार झालेली छकुली उर्फ वैष्णवी गुंजाळ शिकवणीवरुन घराकडे निघाली असतांना तिचा अपघात झाला. आसपासच्या नागरीकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून तिला सुरुवातीला घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात व नंतर पालिकेच्या शवविच्छेदन गृहात नेण्यात आले. या संपूर्ण प्रवासात जागेवरच जीव गमावलेल्या या विद्यार्थीनीच्या पाठीवर वह्या-पुस्तकांचे ओझे असलेली तिची सॅक मात्र विच्छेदन गृहापर्यंत तिच्या पाठीवरच होती. तिचा मृतदेह जेव्हा रुग्णवाहिकेतून बाहेर काढला जात होता, तेव्हा हे दृष्य तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्याच डोळ्यांच्या कडा ओल्या करणारा ठरला.

