राहुरी पोलीस ठाण्यातील बारा कर्मचारी कोरोनाबाधित
राहुरी पोलीस ठाण्यातील बारा कर्मचारी कोरोनाबाधित
सर्व अधिकारी व कर्मचार्यांच्या कोरोना तपासण्या गरजेच्या
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी पोलीस ठाण्यातील एका वरीष्ठ पोलीस अधिकार्यासह चारजण दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळले. आता, पोलीस ठाण्यातील 12 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने उपचार घेत आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी व पोलीस कर्मचार्यांच्या कोरोना तपासणीची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे. कैद्यांपोठोपाठ पोलिसांमध्ये कोरोना बॉम्ब फुटेल, अशी भीती याआधीच पोलीस वर्तुळातून व्यक्त झाली होती.
राहुरीच्या कारागृहातील 37 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यापाठोपाठ आठ-दहा दिवसांत कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी आजारी पडू लागले. चार दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळले. मागील दोन दिवसांत आणखी चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात, एका वरीष्ठ पोलीस अधिकार्याचा समावेश आहे. सध्या बारा जण दवाखान्यात उपचार घेत आहेत. यामुळे पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांच्या कोरोना तपासण्या होणे गरजेचे आहे. अन्यथा, एखाद्या कर्मचार्याच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे पोलीस वर्तुळात बोलले जात आहे.
कोरोना तपासणी केली तर, कैद्यांपोठोपाठ पोलिसांमध्ये कोरोना बॉम्ब फुटेल. वरीष्ठांची नाराजी ओढावेल. या भीतीने पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख हे कर्मचार्यांची कोरोना तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देऊनही, वरीष्ठ अधिकारी कर्मचार्यांच्या जीवाची काळजी करीत नाहीत, असा सूर पोलीस वर्तुळात उमटू लागला आहे.