काँग्रेसच या देशाला वाचवू शकते ः थोरात भुईकोट किल्ला येथून जनसंवाद यात्रेचा प्रारंभ

नायक वृत्तसेवा, नगर
आपल्याला देश वाचवायचा आहे, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन या देशाच्या विकासात योगदान द्यायचे आहे. अत्यंत खात्रीने सांगतो काँग्रेस आणि भारतीय संस्कृतीच देशाला वाचवू शकते. आपण सर्व एक आहोत, कुणीही लहान-मोठा नाही, आपल्यात भेदभावाला थारा नाही हा विचार भारतीय संस्कृतीने आपल्याला दिला आणि तोच विचार काँग्रेस पुढे नेण्याचे काम करत आहे. जनसंवाद यात्रा ही प्रेमाचा विचार घेऊन जनमानसांत जाणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

उत्तर महाराष्ट्रातील जनसंवाद यात्रेचा शुभारंभ आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातून झाला. ज्या वृक्षाखाली बसून पंडित नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ऐतिहासिक ग्रंथ लिहिला, पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतिकारक ज्या जागेमध्ये राहिले तेथील स्मृतींना यावेळी अभिवादन करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आदिंसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या जनसंवाद यात्रेला संबोधित करताना आमदार थोरात म्हणाले, देशात सध्या बेरोजगारी व महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्त्री-पुरुष, सर्व जाती, धर्म, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समानतेचा अधिकार लोकशाहीने दिला आहे. सर्व जाती-धर्माच्या संतांचे विचार राज्यघटनेत असून जो भारताचा नागरिक आहे त्याला मताचा अधिकार दिला आहे. मात्र या लोकशाहीच्या मूलतत्त्वांना सुरुंग लावण्याचे काम सत्ताधारी भाजपकडून सध्या सुरू आहे. स्वायत्त संस्थांचा वापर राजकारणासाठी केला जात आहे. यामुळे लोकशाही टिकणार की नाही हा सध्या देशापुढचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.

मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेले अत्याचार अत्यंत दुर्दैवी आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्यांवर लाठीहल्ला केला गेला. सत्याग्रहाचा हक्क सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला खेळाडूंनी आरोप केलेले भाजपचे खासदार ब्रिजभूषण मोकाट आहे. मात्र राहुल गांधींना साध्या बोलण्यावरून दोन वर्षाची शिक्षा सुनावली गेली, त्यांची खासदारकी तातडीने काढली गेली. त्यामुळे काँग्रेस मात्र सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा पक्ष असून लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी सर्वांनी काँग्रेसचा विचार घराघरापर्यंत पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक ज्ञानदेव वाफारे यांनी केले तर हेमंत उगले यांनी आभार मानले. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
