कोपरगावच्या आमदारांची रक्षाबंधनानिमित्त माता-भगिनींना अनोखी ओवाळणी तीन महिन्यांचे वेतन कोरोनाने पती गमावलेल्या भगिनींना देणार; सर्वत्र होतेय कौतुक
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी कोरोनाने पती गमावलेल्या मतदारसंघातील माता-भगिनींना रक्षाबंधनाची अनोखी ओवाळणी देत तीन महिन्यांचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
गौतम बँकेच्या सभागृहात कोरोनाने पती गमाविलेल्या विविध समाजाच्या माता भगिनींनी आमदार आशुतोष काळे यांचे औक्षण करून त्यांना राखी बांधली. त्यावेळी आमदार काळे यांनी मागील वर्षापासून आजपर्यंत मतदारसंघातील ज्या माता-भगिनींनी आपले पती गमाविले आहेत त्या माता भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून तीन महिन्याचे वेतन देणार असल्याचे जाहीर केले. यावेळी ते म्हणाले, रक्षाबंधन हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण आहे. मात्र मागील वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने प्रत्येकाच्या जवळच्या नात्यातील व्यक्ती गमावल्यामुळे प्रत्येक सणाला दुःखाची झालर आहे. ज्या कुटुंबाने घरातील कर्ता व्यक्ती गमावला आहे त्या कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त होऊन त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. महिलांसाठी रक्षाबंधनाचा सण अतिशय आवडता सण असला तरी पती गमावलेल्या महिलांचे दु:ख खूप मोठे आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा सण साजरा करत असताना एक भाऊ, एक मुलगा म्हणून या महिलांच्या मागे उभे राहणे माझे कर्तव्य असून या माता भगिनींसाठी शासनाकडून मिळणारे तीन महिन्यांचे वेतन रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून या माता भगिनींना देत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय प्रत्येक माता-भगिनींची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तुमच्या कुटुंबाचा आधार हरपला असताना तुम्ही सोसत असलेले दु:ख किती मोठे आहे याची मला जाणीव आहे. शासनाच्यावतीने ज्या काही योजना असतील त्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ तुम्हांला मिळवून देईल, अशी ग्वाही देत ज्या माता-भगिनींच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले आहे त्या महिलांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधून लेखी स्वरुपात माहिती द्यावी, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. यावेळी नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगुले, माधवी वाकचौरे, कोरोना पुनर्वसन समितीच्या जिल्हा समन्वयक संगीता मालकर, तालुका समन्वयक उमा वहाडणे, वर्षा आगरकर, नीलम पाटणी, सुधा ठोळे, स्वाती चौरे आदिंसह महिला भगिनी उपस्थित होत्या.
राज्यातील आदर्श समाजकारणी परिवार म्हणून काळे परिवाराकडे पाहिले जाते. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो ही या परिवाराची शिकवण आहे. काळे परिवाराच्या तिसर्या पिढीच्या रूपातून आमदार आशुतोष काळे हा समाजकारणाचा वारसा पुढे चालवत असून त्यामुळे काळे परिवाराचे समाजाशी घट्ट ऋणानुबंध जुळले आहेत.
– संगीता मालकर (जिल्हा समन्वयक कोरोना पुनर्वसन समिती)