रोटरीतर्फे तिरळेपणावर मोफत तपासणीसह शस्त्रक्रिया जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घेण्याचे केले आवाहन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजातील ज्या कुटुंबात मुले-मुली तिरळी आहेत त्यांना व त्यांच्या पालकांना नेहमीच त्याचा न्यूनगंड जाणवत असतो. मुलांना हिनवणे, चिडवणे, त्यांना चुकीचे बोलणे या गोष्टींना कायम तोंड द्यावे लागते. नोकरी, शासकीय सेवांसाठी सुद्धा असे व्यंग अडचणीचे ठरू शकते. विशेषतः ज्यांचे लग्न करायचे आहेत असे उपवर मुला-मुलींसाठी हा दोष अडचणीचा ठरु शकतो. यावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. मात्र या शस्त्रक्रिया फार खर्चिक असल्याने बरेचसे पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करू न शकणार्या या पालकांसाठी रोटरी क्लब संगमनेरच्या माध्यमातून मोफत तपासणी व मोफत शस्त्रक्रियेची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रोटरी क्लब संगमनेर, रोटरी आय केअर ट्रस्टचे ‘दर्शन’ रोटरी नेत्र रुग्णालय, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती अहमदनगर, संगमनेर नगरपरिषद, पंचायत समिती (शिक्षण विभाग) व इतर सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी डोळ्यांचा दवाखाना, नगरपालिका कंपाऊड संगमनेर येथे या तिरळेपणावरील मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने देण्यात आली आहे. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे हे 118 वे तर रोटरी क्लबचे हे 5 वे शिबिर आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील विद्यार्थी, उपवर मुले-मुलींची शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे डॉ. मधुसूदन झंवर व त्यांचे पथक तपासणी करतील व शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या रुग्णांवर 7 व 8 जानेवारी 2023 रोजी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील.
आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना उपस्थित सर्व दिवस मोफत अल्पोपहार, जेवण व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी अंदाजे 50 ते 70 हजार रुपये खर्च येतो, या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. शिबिराचे हे 5 वे वर्ष असून आत्तापर्यंत 619 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सुमारे 199 रुग्णांवर (349 डोळे) मोफत तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शिबिराचा सर्व स्तरातील रुग्णांनी लाभ घ्यावा व नाव नोंदणीसाठी 9623838296, 9420858738 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रकल्प समितीने केले आहे.