वाळूमाफियांना अभय देणार्या अधिकार्यांना तत्काळ निलंबित करा ः झावरे मातुलठाण येथे शासकीय लिलावातून दररोज होतोय बेसुमार वाळू उपसा
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना श्रीरामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे शासकीय लिलावातून बेसुमार अवैध वाळूउपसा सुरू असून त्यावर आर्थिक स्वार्थापोटी जाणूनबुजून डोळेझाक करणार्या तहसीलदार व प्रांताधिकार्यांचे त्वरीत निलंबन करून वाळू लिलाव बंद करावा, अशी मागणी उत्तर नगर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केली आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात झावरे म्हणाले, श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे गोदावरी नदीतून वाळूउपसा करण्याचा लिलाव सुरू असून तो ठेका घेणार्यांनी आजपर्यंत नदी पात्रात अनधिकृत जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर व इतर मशिनरीच्या सहाय्याने दररोज 300 ढंपर वाळू उपसा केला आहे. हा अनधिकृत वाळू उपसा तहसीलदार, प्रांत, मंडलाधिकारी, तलाठी, पोलीस अधिकारी यांच्याशी आर्थिक संगनमत करून केला जात आहे. त्यामुळे शासनाला मिळणार्या महसूलाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होते आहे. लिलावधारकाने अधिकार्यांशी संगनमत करून लिलावामध्ये नमूद केल्यापैकी 100 पट वाळूउपसा केला आहे.
वाळूमाफियांना येथील बड्या राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्यामुळे स्थानिक प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अहमदनगर जिल्हा रेड झोनमध्ये असून श्रीरामपूर येथून 24 तास नदीतून वाळूउपसा सुरू आहे. कोरोना महामारीचा धोका तिथून वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून सदर ठेका बंद करावा. तर किती वाळूउपसा झाला याचे मोजमाप भूजल सर्वेक्षण कार्यालय किंवा भूमापन कार्यालय अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात यावे. लिलावामध्ये नमूद केल्यापेक्षा जास्त किती वाळूउपसा झाला याचे मोजमाप करावे. लिलाव धारकाचे डिपॉझिट तत्काळ जप्त करावे व दंडात्मक कारवाई करावी. तसेच जास्तीचा वाळूउपसा करणार्या वाळू ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी व याला जबाबदार असलेले स्थानिक तहसीलदार व प्रांताधिकार्यांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी झावरे यांनी केली आहे.