ज्येष्ठनेते मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक ‘राष्ट्रवादी’च्या वाटेवर! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खेळी यशस्वी; अकोल्यात राजकीय उलथापालथ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी’ची साथ सोडून ज्येष्ठनेते मधुकर पिचड यांच्यासह भाजपवासी झालेले जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर यांच्या घरवापसीचे संकेत प्राप्त झाले आहेत. उद्या (ता.16) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गायकर पाटील स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या गायकर यांच्याविषयी राग व्यक्त करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गायकर यांचे धुतर फेडण्याची शेलकी भाषा वापरली होती. मात्र वर्षभरातच पवारांनी गायकरांना आपलेसे करीत जिल्हा बँकेत त्यांना बिनविरोध धाडण्याची किमया केली आणि तेथेच अकोले भाजपला सुरुंग लागला. गायकर माजीमंत्री पिचड यांचे निकटवर्तीय समजले जात असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पिचड पिता-पुत्राला मोठा धक्का बसला आहे.


अकोले तालुक्यातील सीताराम गायकर हे मधुकरराव पिचड यांच्यासह ज्येष्ठनेते शरद पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जात असत. गेली कित्येक वर्षे ते अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी बदलत्या राजकारणाच्या प्रवाहात त्यांनी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मधुकर पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन निवडणुकीत दगाफटका झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांचा राग अनावर झाला होता. त्या निवडणूकीच्या वेळी डॉ.किरण लहामटे यांच्या प्रचारसभेत तर अजित पवार यांनी पिचडांना साथ देणार्‍या गायकर यांच्यावर जहरी टीका करतांना ‘त्याचे धोतर नाही फेडलं तर बघा,’ अशी एकेरी आणि शेलकी टीका केली होती.


अलीकडेच शरद पवार अकोले तालुक्यात आले होते. त्यांनी पुन्हा एकदा पिचडांवर टीका करून त्यांचे स्थानिक राजकारण संपविण्याचे आवाहन लोकांना केले. लवकरच अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होणार आहे. ‘हा कारखाना पिचड यांच्या ताब्यातून काढून घ्या, आम्ही तुम्हाला मदत करू’, अशी थेट ऑफरच पवारांनी अकोलेकरांना दिली आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनीच गायकर यांच्याविरोधातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून गायकर यांना बिनविरोध निवडून आणले. यावरून आता पिचड यांच्याविरोधात गायकर यांचा अस्रासारखा वापर केला जाणार असल्याचेे दिसून येते. गायकर यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेवून पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याची विश्‍वसनीय सूत्रांची माहिती आहे. कदाचित उद्याच (ता.16) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ते आपल्या समर्थकांसह स्वगृही परततील असे सांगीतले जात आहे.


पिचड यांचा भाजपमध्ये जाऊन काहीच फायदा झाला नाही. त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणातून बाजूला पडल्यासारखे झाले आहेत. पवारांनी पिचडांना टार्गेट केल्यानंतर मात्र, भाजपने पिचडांना शक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. वैभव यांना आदिवासी समाजाशी संबंधित भाजपच्या राष्ट्रीय संघटनेवर घेण्यात आले आहे. स्थानिक राजकारणात मात्र पिचडांना भाजपची मदत झालेली दिसत नाही. आता त्यांच्या जवळचे कार्यकर्ते फोडून राष्ट्रवादीने पिचडांना एकटे पाडण्याची खेळी सुरु केल्याने अकोल्यात राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे.

Visits: 20 Today: 2 Total: 115157

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *