बिरसा ब्रिगेडला विरोध करण्यासाठी पिचडांच्या नेतृत्वाची गरज नाही! माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांचा ‘सहमती एक्सप्रेस’मध्ये जाण्यास नकार

नायक वृत्तसेवा, अकोले
आदिवासी समाजाला आपल्या मूळ संस्कृती, चालीरिती, रुढी-परंपरा या संस्कृतींपासून बिरसा ब्रिगेड नावाची संघटना समाजाचे लक्ष विचलित करत आहे. सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम करू नका ही आपली मूळ संस्कृती नसल्याचा बागुलबुवा तयार करून बिरसा ब्रिगेड आदिवासी समाजात फूट पाडत आहे असे माजी मंत्री मधुकर पिचड यांचे मत आहे. यावर अनेक आदिवासी नेत्यांनी सहमती व्यक्त करत एकत्रित लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी यास विरोध करत माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाला तीव्र विरोध केला आहे.

बिरसा ब्रिगेडच्या भूमिकेला आळा घालण्यासाठी सामाजिक मुद्दा करत माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील पिचड विरोधक आदिवासी नेत्यांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी रंधा येथील घोरपडादेवी मंदिरात पिचड-भांगरे यांची बैठक झाली. आदिवासी समाजाच्या प्रश्नावर आम्ही एकत्र आलो आहोत अशी भूमिका प्रसार माध्यमांतून दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर शिवसेनेचे नेते मधुकर तळपाडे यांनी देखील या दोन्ही नेत्यांच्या सुरात सूर घालून सहमती एक्स्प्रेसमधे दाखल झाले. मात्र शिवसेनेचे नेते तथा माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाला तीव्र विरोध केला आहे. बिरसा ब्रिगेड संघटना आदिवासी समाजात जाऊन अखंड हरिनाम सप्ताह, दशक्रिया विधी यांसहित आदी धार्मिक कार्यक्रम करू नका असे सांगत आहे. आदिवासी संस्कृतीपासून समाजाचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोप माजी मंत्री पिचड यांनी बिरसा ब्रिगेड संघटनेवर केला आहे. मात्र आजवर या संघटनेकडून अशाप्रकारचे काम झाल्याचे कोणतेही पुरावे व्यक्तिगत आमच्याकडे आले नाहीत. परंतु ही संघटना चुकीच्या गोष्टी समाजात पसरवत असेल तर आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातील आदिवासी समाज या भूलथापांना बळी पडणार नाही.

माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखाली जाऊन विरोध केला पाहिजे असे कोणी सांगितले आहे. अकोले तालुक्यात आमची पिचड विरोधक म्हणून ओळख झाली आहे. जनतेने आम्हांला जी काही आजवर समाजकारणात उंची दिली आहे ती पिचड समर्थक म्हणून नाही तर पिचड विरोधक म्हणून दिली आहे. त्यामुळे प्रश्न कोणताही असो मात्र पिचड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कधी काम करणार नसल्याची स्पष्ट भूमिका मेंगाळ यांनी मांडली आहे. ज्यादिवशी बिरसा ब्रिगेड संघटनेचे असे काही पुरावे मिळतील त्याक्षणी त्या संघटनेच्या भूमिकेला आम्ही देखील विरोध करू. त्यासाठी पिचड यांच्या नेतृत्वाची गरज नसल्याचे मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 115561

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *