समृध्दी महामार्गावर नागपूर ते शिर्डी धावली पहिली एसटी बस! वीस जणांनी केला प्रवास; सात तासात 540 किलोमीटर अंतर कापले


नायक वृत्तसेवा, शिर्डी
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शुक्रवारी (ता.16) नागपूर ते शिर्डी दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. जलद व आरामदायी प्रवाशाचा 20 व्यक्तींनी आनंद घेतला. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून 15 डिसेंबरला रात्री 9 वाजता निघालेली बस (एमएच 09, एफएल 0248) शिर्डी बसस्थानकावर 16 डिसेंबरला पहाटे 5 वाजता पोहचली. ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने निघालेल्या बसला गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यानचे 540 किलोमीटर अंतर कापण्यास सात तास लागले. हीच बस रात्री 9 वाजता शिर्डीहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबरला समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्यातील वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण केले. त्यानंतर शुक्रवारी राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यान धावली. 45 आसन क्षमतेच्या निमआरामदायी बसमध्ये 30 आसने (पुशबॅक पध्दतीची) बसण्यासाठी व 15 शयन आसने उपलब्ध होती. या बसमधून 20 व्यक्तींनी प्रवास केला. त्यापैकी 13 आरक्षित प्रवासी, 6 ज्येष्ठ नागरिक (75 वर्षाच्या पुढील) व 1 अनारक्षित प्रवासी होते. बससेवेसाठी प्रौढव्यक्ती 1300 रुपये इतके प्रवासभाडे आकारण्यात आले. तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली. या बससाठी शैलेश खोब्रागडे व भारत भदाडे असे दोन चालक होते, अशी माहिती या बसचे वाहक मनोज तुपपट यांनी दिली.

‘लालपरीमधून शिर्डीपर्यंतचा प्रवास अत्यंत आरामदायी व जलद झाला. सात ते आठ तासाच्या प्रवासात थकवा जाणवला नाही. अत्यंत कमी वेळेत प्रवास झाला. श्री साईबाबांच्या दर्शनासाठीचा प्रवास आता एसटीमुळे सुखावणारा झाला आहे. समृध्दीच्या रूपाने आता शहरे जवळ आली असून राज्य निश्चितच प्रगतीपथावर जाईल.’
– रामकृष्ण श्रावणखळ (प्रवासी)

‘समृध्दी महामार्गावर ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने बस चालविण्याचा अनुभव आनंददायी होता. साडेसहा ते सात तासात नागपूरहून शिर्डीत बस पोहचली. प्रवासात कोठेही वाहतूक अडथळे नव्हते. त्यामुळे जलद वेगात अपघातमुक्त असा समृध्दीवरील प्रवास आहे.’
– भारत भदाडे (बसचालक)

Visits: 166 Today: 1 Total: 1108917

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *