उसाच्या डबल ट्रॉलीने घेतला विद्यार्थिनीचा बळी! संगमनेरातील दुर्दैवी घटना; चाकाखाली सापडल्याने झाला करुण अंत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
डबल ट्रॉलीतून ऊस वाहतूक करण्यास मनाई असतानाही संगमनेरात मात्र या नियमाची सर्रास पायमल्ली केली जात आहे. त्यातून अपघात घडून निष्पाप नागरिकांचे बळीही जात असतांना आता शहरातूनही असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. आज सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील जुन्या पोस्टासमोर एका एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनीची मोपेड अशाच डबल ट्रॉलीच्याखाली सापडून त्यात त्या विद्यार्थिनीचा बळी गेला. या घटनेनंतर ट्रॅक्टरचालक वाहन सोडून पसार झाला. या घटनेत सदर विद्यार्थिनीच्या डोक्यावरुनच ट्रॉलीचा टायर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. वैष्णवी साहेबराव गुंजाळ असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात असून शहरातून ऊसाची वाहतूक पूर्णतः बंद करण्याची मागणी होवू लागली आहे.
आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घुलेवाडीच्या निर्मलनगर मध्ये राहणारी वैष्णवी साहेबराव गुंजाळ ही अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनी आपल्या मोपेड वरुन घराच्या दिशेने निघाली होती. जुन्या पोस्ट कार्यालयाजवळ तिच्यापुढे चाललेल्या ऊसाच्या ट्रॉलीला ओलांडून ती पुढे जात असताना समोरून अचानक बस आल्याने तिचा गोंधळ उडाला, मात्र डबल ट्रॉली असल्याने चालकाला मात्र काहीच समजले नाही. त्यामुळे तो त्याच्या मस्तीतच आपले वाहन हाकीत राहिला. त्यातून ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूचा धक्का लागल्याने सदर विद्यार्थिनी मोपेडसह खाली पडली आणि तिचे डोके ट्रॉलीच्या चाकाखाली सापडले.
हा प्रकार लक्षात येताच चालकाने ट्रॅक्टर जागेवरच उभा करुन तेथून पळ काढला. हा अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र समोरील दृष्य पाहून अनेकांच्या डोक्याला अक्षरश: झींग आली. सदर विद्यार्थिनीच्या डोक्यावरुनच ट्रॉलीचा टायर गेल्याने त्या निष्पाप जीवाचा अतिशय करुण अंत झाला होता. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्याची कोणतीही संधी शिल्लक नव्हती. या घटनेनंतर शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग ठप्प झाला होता. जमलेला प्रत्येकजण लोकांच्या जीवाशी खेळून सुरु असलेल्या अशा पद्धतीच्या ऊस वाहतुकीवर आगपाखड करीत असल्याचे यावेळी दिसून आले. सदर विद्यार्थिनींचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आला आहे.
Visits: 25 Today: 1 Total: 117568