दोन महिलांना चौघांकडून घातक शस्त्राने मारहाण कासारवाडीतील प्रकार; जखमी महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘तुम्ही दोघांमध्ये भांडणे लावून दिलीत’ असा आरोप करीत रायतेवाडी व गुंजाळवाडी येथे राहणार्‍या चौघांनी फिर्यादी महिलेच्या आईला शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी 27 वर्षीय महिलेने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हातातील लाकडी काठी व गजाने दोघींनाही बेदम मारहाण केली. यावेळी या सर्वांनी त्या माय-लेकींना जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली. या झटापटीत फिर्यादी महिलेच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोतही गहाळ झाल्याच्या कारणावरुन एका महिलेसह चौघांवर घातक शस्त्राने मारहाण करण्यासह शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना शनिवारी (ता.10) दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र यातील फिर्यादी वैशाली नानासाहेब कोठवळ (वय 27, रा.कासारवाडी) ही महिला गंभीर जखमी झाल्याने व त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याने प्रत्यक्ष गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. या बाबत शहर पोलिसांनी रुग्णालयात जावून त्यांचा जवाब नोंदविला असून त्यावरुन रायतेवाडी येथे राहणार्‍या प्रतिभा सोमनाथ थोरात व संदीप लक्ष्मण दिघे यांच्यासह गुंजाळवाडीतील मारुती व सचिन भाऊसाहेब गुंजाळ या दोघा सख्ख्या भावांवर घातक शस्त्रांनी मारहाण करुन जखमी केल्याच्या कलम 324 सह 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार शनिवारी दुपारी वरील चारही आरोपी फिर्यादीच्या कासारवाडी येथील घरासमोर आले. यावेळी घराच्या दारातच असलेल्या फिर्यादीच्या आईला उद्देशून ‘तुम्ही प्रतिभा थोरात व सोमनाथ थोरात यांच्यात भांडणं लावून दिलीत’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी त्यांची आई त्या चौघांनाही समजावून सांगत असताना प्रतिभा थोरात हिने हातातील काठीने तर संदीप दीघे याने लोखंडी गजाने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या गदारोळात त्यांच्यासोबत असलेल्या मारुती व सचिन गुंजाळ या दोघा भावांनीही लाकडी काठीच्या साहाय्याने त्यांना मारहाण केली. या दरम्यान त्या चौघांकडून शिवीगाळ सुरु असताना संदीप दिघे याने फिर्यादीच्या आईला ढकलून देत खाली पाडले व त्या दोघींनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा गदारोळ सुरु असतानाच फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोतही गायब झाली. सर्व प्रकार मनासारखा घडल्यानंतर चौघेही हल्लेखोर तेथून निघून गेले. त्यानंतर जखमी झालेल्या वैशाली कोठवळ यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच पोलिसांनी रविवारी रात्री उशिराने रुग्णालयात जावून त्यांचा जवाब नोंदविला व त्यांनी दिलेल्या माहितीवरुन वरील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *