बोटा परिसरात विद्युत मोटार चोरींचे सत्र थांबेना! शेतकरी संतप्त; पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोटा परिसरात विद्युत मोटारी चोरीचे सत्र थांबण्याचे काय नाव घेईना. एकामागून एक मोटारींची चोरी होत असल्याने शेतकरी आता चांगलेच संतप्त झाले आहेत. नुकत्याच सुमारे 60 हजार रुपये किंमतीच्या मोटारी चोरीस गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी पोलिसांनी लवकरात लवकरात चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बोटा येथील लक्ष्मण बापू शेळके यांच्या विहिरीतून पाणबुडी मोटार चोरट्यांनी चोरून पोबारा केला. यापूर्वीही त्यांची चोरट्यांनी मोटार चोरून नेली होती. आता पुन्हा मोटार चोरून नेल्याने शेळके यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी लक्ष्मण शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 410/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही अज्ञात चोरट्यांनी केळेवाडीचा पाझर तलाव, कचनदी याठिकाणाहून अनेक शेतकर्यांच्या विद्युत मोटारी चोरून नेल्या आहेत. मात्र अद्यापही चोरट्यांचा शोध लागलेला नाही. वारंवार मोटारी चोरी जात असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. एकतर आधीच शेतीमालांना भाव नाही, निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचेही नुकसान होत आहे. त्यात अधिक भर म्हणून चोरटे विद्युत मोटारी चोरुन नेत असल्याने शेतकरी सतत संकटात सापडत आहे. त्यासाठी घारगाव पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्यांतून जोर धरु लागली आहे.
यापूर्वी बोटा परिसरातून अनेक शेतकर्यांच्या विद्युत मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. त्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही. आधीच शेतकरी संकटात आहे. त्यात पुन्हा चोरटे विद्युत मोटारी चोरून नेत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
– संतोष शेळके (माजी पंचायत समिती सदस्य-बोटा)