गाळा घेण्यासाठी विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न! पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; संगमनेरच्या हाजीनगरमधील घटना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आम्हाला व्यवसायासाठी गाळा घ्यायचा आहे, त्या लागणारे पैसे तुझ्या आई-वडिलांकडून घेवून ये तरच नांदायला ये असे म्हणत एकोणावीस वर्षीय विवाहितेचा तिच्याच गळ्यातील ओढणीने जीव घेण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पतीसह कुटुंबातील अन्य सदस्यांनी पैशांसाठी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने सदरील महिला अत्यवस्थ झाली. त्यामुळे रविवारी रात्री तिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, सोमवारी पोलिसांनी रुग्णालयात जावून विवाहितेचा जवाब नोंदविल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती, दीर व सासू-सासर्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह हुंडाबंदी कायद्यातील तरतुदीन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विवाहितेच्या पतीसह तिच्या दिराला अटक करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार संगमनेर शहरालगतच्या कोल्हेवाडी रस्त्यावरील हाजीनगर परिसरात रविवारी (ता.11) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. सानिया नजर पठाण ही एकोणावीस वर्षीय महिला दोन वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर पती, दीर व सासू-सासर्यासह या परिसरात वास्तव्यास होती. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर सदरील विवाहितेच्या सासरच्या मंडळीच्या मनात पैशांची लालसा निर्माण झाली. त्यातून एखादा व्यावसायिक गाळा विकम घ्यावा व त्यातून समृद्धीचा प्रवास करावा असा विचार त्यांनी केला.
मात्र गाळा घेण्यासाठी स्वतःची हिंमत गहाण ठेवून त्यांनी आपलं घरदार सोडून पतीच्या मागे आलेल्या अवघ्या एकोणावीस वर्षीय सानिया पठाण यांना त्रास देण्यास सुरुवात केली. सगळ्यांच्याच संसारात असे दिवस असतात असे समजून त्या विवाहितेने सुरुवातीला होणारा त्रास सहन केला. मात्र सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी केल्या जाणार्या शारीरिक व मानसिक छळामध्ये दिवसेंदिवस वाढ होत राहिल्याने मध्यंतरी सदरील विवाहिता आपल्या माहेरी निघून गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या पतीने सासरवाडीत जावून तिला पुन्हा नांदायला आणले, मात्र परतीच्या प्रवासात ‘गाळा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेवून आली तरच नांदवील’ असा सज्जड इशाराही तिला देण्यात आला.
सासरी आल्यानंतर नेहमीप्रमाणे सुरुवातीचे काही दिवस शांततेत गेल्यानंतर पठाण कुटुंबाने पुन्हा आपला जुना हेका धरला आणि तिच्या आई-वडिलांकडून गाळ्यासाठी पैसे घेवून येण्याचा तगादा लावला. मात्र आपल्या माहेरची आर्थिक परिस्थिती माहिती असल्याने सदरील विवाहितेने निमूटपणे त्यांचा अत्याचार सहन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिच्यावरील अत्याचारामध्येही वाढ झाली. त्यातच रविवारी (ता.11) पैशांसाठीचा हा त्रास इतका शिगेला पोहोचला की तिच्या पतीसह दीर आणि सासू-सासर्याने तिला अक्षरशः लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत अर्धमेली अवस्था झालेली असतांनाही पैशांच्या लालसेने अंधत्त्वाची पट्टी डोळ्यावर चढलेल्या पठाण कुटुंबाने तिच्या गळ्यातील ओढणीचा फास देवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीच्या आवाजाने आसपासच्या नागरिकांनी मध्यस्थी करीत भांडणे सोडविली व अत्यवस्थ झालेल्या त्या विविाहितेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यास भाग पाडले. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेची माहिती सोमवारी पोलिसांना समजल्यानंतर रुग्णालयात जावून जखमी झालेल्या सानिया नजर पठाण यांचा जवाब नोंदविण्यात आला.
त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्यांचा पती नजर रियाज पठाण, दीर अजहर रियाज पठाण, सासरा रियाज ताजखान पठाण व सासू आरिफा रियाज पठाण (सर्व रा.हाजीनगर) यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 307 सह हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम 498 (अ), 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात संबंधित विवाहितेचा पती नजर व दीर अजहर या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांच्याकडे देण्यात आला आहे.