मंत्री शंकरराव गडाखांच्या स्वीय्य सहाय्यकांवर गोळीबार अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू

नायक वृत्तेसवा, नेवासा
शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे खासगी स्वीय्य सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी (ता.22) रात्री हल्ला झाला. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील दोन राजळे यांना लागल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला राजकीय कारणातून झाल्याचा संशय व्यक्त होत असून हल्लेखोर घोडेगाव (ता. नेवासा) परीसरातील असल्याचे सांगण्यात आले. याबाबत विकास जनार्धन राजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये संशयित आरोपींची नावेही देण्यात आली असून त्यांचा शोध सुरू आहे.

राजळे गेल्या काही वर्षांपासून गडाख यांच्याकडे काम करीत आहेत. शुक्रवारी रात्री सोनई येथील काम अटोपून ते घोडेगाव मार्गे आपल्या घरी दुचाकीवरून निघाले होते. राजळे लोहगाव येथील आपल्या घराजवळ येताच पाळत ठेवून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. सुमारे पाच गोळ्या आरोपींनी झाडल्या. त्यातील एक राजळे यांच्या पोटात तर दुसरी डाव्या पायाला लागली आहे. याची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. राजळे यांना अहमदनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. रात्रीच डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून गोळ्या बाहेर काढल्या आहेत. त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली. आरोपी घोडेगाव परिसरात राहणारे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मार्फत कोणीतरी हा हल्ला घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामागे तालुक्यातील राजकीय कारण असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. गेल्या काही काळापासून राजळे मंत्री गडाख यांच्याकडे काम करीत आहेत. गडाख यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. नेवासा तालुक्यात सध्या टोकाची राजकीय स्पर्धा सुरू आहे. त्यातूनच हा प्रकार झाल्याचा संशय घेतला जात आहे. यामागे वैयक्तिक अगर इतर कारण असल्याची शक्यता राजळे यांच्या निकटवर्तीयांनी फेटाळून लावली आहे. हल्ल्याची घटना घडल्यानंतर मंत्री गडाख यांनीही यामध्ये लक्ष घातले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकार्‍यांना तपासाच्या सूचना दिल्या. संशयित आरोपींची नावे पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Visits: 41 Today: 1 Total: 118984

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *