शहरातील रस्त्यांची गटारगंगा; नगरपालिकेचे सपशेल दुर्लक्ष!

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून त्यामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. खड्डयात रस्ते की रस्त्यात खड्डे अशी काहीशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. सण – उत्सव सुरू असूनही संगमनेर नगरपालिका या रस्त्यांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. त्यामुळे हे रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी संगमनेरकरांनी केली आहे.

जिल्ह्यात स्वच्छ व सुंदर अशी संगमनेर शहराची ओळख आहे. परंतु हे शहर आता खड्डुड्यांच्या विळख्यात सापडले आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गणेश उत्सव काळामध्ये नगरपालिकेच्या वतीने शहरातील छोटे – मोठे खड्डे बुजवले होते. मात्र पुन्हा पाऊस झाल्याने वरच्या वर बुजविण्यात आलेले खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून पुन्हा खड्डे झाले आहेत. त्याचबरोबर शहरातील इतर रस्त्यांवर देखील खड्डे झाले आहेत.

या रस्त्यांवर नागरिकांना वाहन चालवतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वयोवृद्धांसह, महिला व युवकांना पाठीचा त्रास उद्भवू लागला आहे. पालिका प्रशासनाला याबाबत वारंवार सांगून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. सध्या सण उत्सव सुरू आहेत. त्यामुळे खरेदीसाठी व इतर कामांसाठी नागरिकांना शहरात फिरावे लागते. दुचाकीवर जात असतांना अनेक नागरिकांना खड्यात पावसाचे पाणी साचले असल्याने खड्डे किती खोल आहेत याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेक अपघात होत आहे. या अपघातांमध्ये अनेक नागरिक जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. या घटनांना सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार आहे.

पालिकेच्या वतीने स्वच्छेतेचे अभियान मोठ्या जोमाने सुरू असलेले दिसते. पण रस्त्यांचे काय? शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे एखाद्याचा जीव गेल्यावर पालिका प्रशासनाला जाग येणार आहे का? संगमनेर शहरातील नविन नगर रस्ता. जाणता राजा मार्ग, बी. एड. कॉलेज रस्ता, अकोले बायपास रस्ता, अकोले नाका परिसर, पावबाकी रस्ता, अभिनव नगर, कोल्हेवाडी नाका रस्ता त्याचबरोबर इतर गल्ली बोळांमध्ये खड्डेच खड्डे झाले आहेत. सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने खड्डे तात्पुरत्या पद्धतीने दुरुस्त न करता चागल्या पद्धतीने दुरूस्त करण्यात यावेत अशी मागणी देखील नवरात्र उत्सव मंडळ यांच्यासह संगमनेरकरानी केली आहे. पालिकेने यापूर्वी अनेक ठिकाणी डांबरीकरण केले असले तरी ते काही महिन्यांतच उखडून पडले. यामुळे दर्जाहीन काम आणि ठेकेदारांच्या संगनमताचा आरोप नागरिकांकडून सर्रास केला जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांची अशी अवस्था होत असेल, तर प्रशासनाचे नियोजन नेमके कुठे आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

उपनगरातील अनेक रस्त्यावर उखडलेले डांबर, खोल खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे वाहनधारकांची अक्षरशः वाट लागली आहे. दररोज कामानिमित्त शहरात येणारे ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा यामुळे त्रस्त झाले आहेत. या रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून जिवीतहानीची शक्यता निर्माण झाली आहे. पालिकेला मात्र या प्रश्नाकडे बघायलाही वेळ नाही. नागरिकांच्या आरडाओरडीनंतरही जबाबदार प्रशासनाने दुरुस्तीची कोणतीही हालचाल केलेली नाही. यामुळे नागरिकांचा संताप उफाळून आला असून ‘कर गोळा करताना तत्पर असलेली पालिका मूलभूत सुविधा देताना ठप्प का होते?’ असा थेट सवाल जनतेकडून केला जात आहे.स्थानिक नागरिकांनी पालिकेविरोधात निषेधाचे सूर लावले असून, लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था गंभीर स्वरूप धारण करत असताना नगरपालिकेच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रत्येक वर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा खर्च दाखवला जातो, तरीही नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा सामना का करावा लागतो? असा सवाल जनतेतून पुढे येत आहे.

ठिकठिकाणी खड्डेमय रस्ते असल्याने शहरात होणारी वाहतुकीची कोंडी, अपघातांची भीती आणि वेळेचा अपव्यय यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र पालिका अद्यापही ठोस पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत असून, नगरपालिकेच्या निष्क्रीय कारभारावर बोट ठेवले जात आहे.शहराच्या मध्यवर्ती भागापासून ते उपनगरांपर्यंत प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यानंतर या खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. दुचाकी, चार चाकीच नव्हे तर सार्वजनिक वाहतुकीची साधनेदेखील या खड्डेमय रस्त्यांमुळे धोक्यात आली आहेत.

रस्त्यांची दुरुस्ती किंवा खड्डे बुजविण्याचे काम झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात दर्जाहीन कामामुळे काही दिवसांतच रस्ते पुन्हा उखडून पडतात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही शहरातील नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागतो, यामागे ठेकेदार व प्रशासनातील संगनमत असल्याचा आरोप नागरिकांमधून सर्रास होऊ लागला आहे. एकीकडे शहराचे स्मार्ट सिटी, विकासकामे आणि आधुनिक सुविधांचे गोडवे गाणारे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, तर दुसरीकडे खड्डेमय रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन प्रवास करणारे सामान्य नागरिक असे विसंगत चित्र सध्या दिसून येत आहे.पालिकेने तातडीने रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरुवात करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा वाढणारा संताप आंदोलनाच्या स्वरूपात उफाळून येण्याची शक्यता आहे.

दुचाकी असो वा चारचाकी, प्रत्येक प्रवासी या खड्डेमय रस्त्यांवरून जाताना अक्षरशः धडपडतोय. अपघातांचा धोका प्रचंड वाढला असून लहान–मोठ्या घटना होण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामीण भागातून शहरात येणारे लोक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. वाहतुकीची कोंडी, वेळेचा अपव्यय आणि दैनंदिन त्रास यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.

नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत असल्या तरी नगरपालिकेने या प्रश्नाकडे सपशेल दुर्लक्ष केलेले दिसते. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते दुरुस्त झाल्याचे दाखवले जाते पण काही महिन्यांतच डांबर उखडून खड्डे निर्माण होतात. यामुळे कामाचा दर्जा व प्रशासन-ठेकेदार संगनमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एका बाजूला स्मार्ट सिटी, विकासकामे आणि आधुनिक सोयींची गोड गाणी गाणारे लोकप्रतिनिधी तर दुसऱ्या बाजूला खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना जीव धोक्यात घालणारे सामान्य नागरिक असे विरोधाभासी चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

Visits: 52 Today: 2 Total: 1110169
